आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा



पंढरीचा विठ्ठल


भगवंताच्या रुपांमध्ये फक्त पांडुरंगाचेच रूप असे आहे की त्यांच्या हातात शस्त्र नसून ते हात त्यांनी कमरेवर ठेवलेले आहेत. मूर्तीच्या अंगावर ईश्र्वरी चिन्हे आहेत. येथे ईश्र्वरी शक्ती जाणवते. पंढरपूरमधील पांडुरंगाची मूर्ती पाण्यातून वाहत आलेली आहे. या मूर्तीमध्ये शिव व विष्णू या दोन्ही शक्ती एकत्र आहेत. अशा रुपाला "बौद्धरूप" असे म्हणतात. या पांडुरंगाच्या मूर्तीचे दर्शन घेतले की मनात चांगली भावना उत्पन्न होते.

पंढरपूरला पांडुरंग दोन्ही हात कमरेवर ठेवून उभे आहेत. ते आपल्याला सांगतात की, कमरेपर्यंतच 'भवसागर' आहे व तुम्ही सर्वांनी कमरेखालचा भाग विसरा म्हणजे विषय वासने पासून दूर राहा. कमरेच्या वरची बाजू ईश्वरी कार्यासाठी उपयोगात आणा तेव्हाच तुमच्या सर्वांचा उद्धार होईल. पांडुरंगालाच 'विठ्ठल' असेही दुसरे नाव आहे. 'विठ्ठल' हा तसा पाहिला तर तालुस्वर आहे, पण त्याचा सदैव उच्चार करीत राहिल्याने हृदयाला पाझर फुटत असतो. विठ्ठल हे भगवंताचे नि:शस्त्र रूप आहे म्हणूनच ते दयाळू आहे. तेथे जाणारी भक्तमंडळी त्याच्या पायावर डोके ठेवीत असतात. आपल्याकडे विठ्ठलाचे वर्णन करताना 'सावळा' म्हणतात. त्याचाही मूळ शब्द 'सहा आवळा' असा आहे. त्याचाच अर्थ त्याने सर्व षडरिपूंना आवळलेले आहे.

पांडुरंगाची मूर्ती वालुकामय असून ती भीमा नदीतून प्रगट झाली आहे. भगवंताची मूर्ती वालुकामय आसल्याने मस्तकावर केवळ पाण्याचा अभिषेक करतात. मूर्तीला चांदीचे पाय लावून त्यावर पंचामृताचा अभिषेक करतात. भगवान श्रीकृष्ण हे महाभारतातील कौरव-पांडवांच्या युद्धानंतर विश्रांती घेण्यासाठी म्हणून प्रथम कर्नाटकात आले व तेथून पुढे येथे आले आहेत. या मूर्तीचे वैशिष्टय म्हणजेते मंदिरात 'एकटेच' उभे आहेत व त्यांच्या पाठीमागच्या मंदिरात श्रीरुक्मिणी (रखुमाई), श्रीसत्यभामा व श्रीराही यांच्या मूर्ती आहेत. त्यांच्या मूर्ती या गंडकी पाषाणाच्या आहेत. भगवंतांना सदैव भक्तांची व त्यांच्या भक्तीची ओढ लागलेली असते म्हणूनच ते भक्तांसाठी त्यांचे सर्व 'गोत' सोडून पुढे आले आहेत व त्यांना पाहण्यासाठी या तिघी देवी त्यांचा शोध घेत येथे आलेल्या दिसत आहेत.

संत नामदेवांना, संत ज्ञानेश्वरांना व संत तुकारामांना पांडुरंगाचे दर्शन त्याच मूर्तीतून लाभलेले आहे. नामदेवांनी, विठ्ठलाजवळ त्याच्याच पायरीवर कायमस्वरूपी स्थान मागून घेतले आहे. कारण भगवंताचे लक्ष समोरच्या पायरीकडे, भक्तांकडे असते. मंदिराच्या कळसाकडे नसते.

।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy