आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा



आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. चार युगांपैकी सध्या शेवटचे कलियुग चालू आहे आणि आपण एकविसाव्या शतकात आहोत. सांप्रत काळ हा तंत्रज्ञान- विज्ञान यांचा अत्याधुनिक असा मानला जातो. अशा ह्या काळात मानव तांत्रिक आणि वैज्ञानिक निर्मितीमध्ये रमलेला दिसतो. अर्थात, ही काळाची गरज आहे. परंतु सतत चिकित्सेच्या आणि विज्ञानाच्या शोधात राहिल्यामुळे तो स्वतःचे मनःस्वास्थ्य मात्र गमावून बसला आहे. सुसंस्कृत जीवनाची शाश्वत मूल्येच तो हळूहळू विसरत चालला आहे. धर्माची बंधने त्याला नकोशी वाटतात. धर्माचे अधिष्ठानच सुटत चालल्यामुळे अनियंत्रित वासनांचा स्वैराचार सर्वत्र दिसून येतो आहे. शारीरिक सुखासीनता वाढल्यामुळे पैसा आणि प्रसिद्धी यांचे महत्त्व वाढत आहे. म्हणून भ्रष्टाचार, गुन्हेगारी यांसारख्या प्रवृत्ती समाजात प्रकर्षाने आढळत आहेत. या कलियुगात सर्व भौतिक सुखे मिळूनसुद्धा आजचा मानव हा मानसिक सुखाला वंचित होत आहे. तसेच त्याची निर्भयता कमी होऊन तो सतत चिंतेने ग्रासलेला दिसून येतो. अशा ह्या कलीच्या गोंधळाच्या काळात मानवी मनाला आधार आणि शाश्वत आनंद देण्यासाठी, उत्तम धर्माचरण कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यासाठी प्रातःस्मरणीय अशा सत्पुरुषांची नितांत गरज असते. श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री रामदास स्वामी, श्री रामकृष्ण परमहंस अशा साक्षात्कारी पुरुषश्रेष्टींनी समाजाला, जीवनात धर्माचे अधिष्टान कसे महत्त्वाचे आहे हे स्वतः प्रत्यक्षपणे जगून दाखवले आहे व त्याप्रमाणे मार्गदर्शन केले आहे. अध्यात्मक्षेत्रात गुरुपरंपरा ही सर्वश्रेष्ठ परंपरा मानली जाते. ही परंपरा मूलतः शिवापासून सुरू झालेली असून ज्ञान, त्याग आणि वैराग्य हे तिचे वैशिष्ट्य आहे. श्रीमद्जगद्गुरू आद्य श्रीशंकराचार्य हे या परंपरेतील विभूतिमत्व धर्मकार्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी होऊन गेलेले आहे. अशा सर्वश्रेष्ठ परंपरेत सध्याच्या काळात परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर हे लौकिक नाव धारण केलेले साक्षात्कारी पुरुष अहमदनगर येथे धर्मकार्यात मग्न होते. परमपूज्य गुरुदेव श्री क्षीरसागर महाराज यांचा जन्म फाल्गुन शुद्ध तृतीया शके १८५५ (१६ फेब्रुवारी १९३४) या दिवशी नगर जिल्ह्यात, पारनेर तालुक्यात रायतळे येथे झाला. घरची अत्यंत गरीब परिस्थिती, त्यात बालपणीच पितृछत्र हरवलेले, त्यामुळे सगळे कुटुंब नगर येथे वास्तव्यास आले. गुरुदेवांचा जन्मच ईश्वरी कार्यासाठी, धर्मरक्षणासाठी आणि सामान्यजनांना जीवनात आधार देण्यासाठी झालेला असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन वयाच्या अवघ्या सातव्या वर्षीच झाले. सात वर्षांचे असताना एके दिवशी घराच्या दारात बाल गुरुदेव उभे होते आणि आकाशातून एक व्यक्ती त्यांच्याकडे पाहत होती. त्यांचे सहज तिकडे लक्ष गेले आणि 'आपल्याकडे हे कोण पाहतेय' असा विचार करेपर्यंत ती शक्ती, ते स्वरूप गुप्त झाले, आणि त्या क्षणापासून, त्या दिवसापासून गुरुदेवांना आपले जीवन कशाकरता आहे याची कल्पना आली. सुमारे सहाशे वर्षांपूर्वी श्रीशैल्य येथे गुप्त झालेल्या परमपूज्य श्रीनृसिंहसरस्वती स्वामी यांनी गुरुदेवांना वयाच्या दहाव्या वर्षी स्वप्नदृष्टांत देऊन श्रीक्षेत्र गाणगापूर येथे बोलावून घेतले; साक्षात मानवरूपात दर्शन देऊन अनुग्रहित केले आणि “तू आता येथून पुढे तपश्चर्या करायची आहेस”, असे सांगितले. वयाच्या दहाव्या वर्षी गुरुदेवांच्या तपश्चर्येला सुरुवात झाली. तदनंतर १५-१६ वर्षांनी या तपश्चर्येच्या काळात गुरुदेवांना पांडुरंगाचे दर्शन झाले. एक दिवस रात्रभर जागेच असताना पहाटे दोनच्या सुमारास हवेत तरंगत असलेली अशी पंढरपूरच्या पांडुरंगाची सालंकृत मूर्ती त्यांना दिसली. त्यावेळी गुरुदेवांनी डोळ्यांनी देवाला पाहिले आणि देवही त्यांचेकडे पाहत होते. अशी ही अवस्था अवघी दोन-तीन सेकंद टिकली. त्या वेळेपासून गुरुदेवांची पहाटे दोन वाजता साधना सुरु झाली. तपश्चर्येच्या या एकूण पंचवीस वर्षांच्या काळात त्यांची प्रचंड निंदा, कुचेष्टा झाली. अत्यंत हालअपेष्टा, अपमान सगळे काही अतोनात सोसावे लागले. कलियुगाचा महिमा असल्यामुळे प्रत्यक्ष ईश्वरी दर्शनाचा अनुभव येऊनसुद्धा गुरुदेवांना शांत बसावे लागले. मौन धरून सारे सोसत राहणे ही गुरूंची आज्ञा होती. पंचवीस वर्षे गुप्ततेत काढल्यानंतर पुन्हा गुरुदर्शन झाले आणि “मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे”, अशी गुर्वाज्ञा झाली. यानंतर परिस्थिती हळूहळू बदलू लागली. गुरुदेवांचे वेदकार्य, सामान्यजनांना मार्गदर्शन आणि आधार देणे सुरू झाले. त्यांना जाणणारे लोक येऊ लागले. कर्तृत्ववान, कर्तबगार, बुद्धिनिष्ठ, हुशार असा भक्तपरिवार वाढू लागला. गुरुदेवांनी हाती घेतलेल्या वेदकार्यात अनेक भक्त सामील होऊ लागले. दर्शनाला येणाऱ्या भक्तांचा सतत वाढता ओघ लक्षात घेऊन परमपूज्य गुरुदेवांनी “श्री दत्तात्रेय निवास” ही वास्तू १९७४ साली उभी केली. या वास्तूत आपले परमगुरू श्रीनृसिंहसरस्वती स्वामी यांच्या प्रसादपावलांची त्रिकाळ पूजा होत असते. श्री क्षेत्र गाणगापूर-नृसिंहवाडीप्रमाणे नगरही आता क्षेत्रच झाले आहे. परमपूज्य गुरुदेवांच्या तपश्चर्येचा काळ पन्नास वर्षांपेक्षा जास्त होता. वयाच्या साठाव्या वर्षापासून गुरुदेवांचे अलौकिक चरित्र घडावयास सुरुवात झाली. ईश्वरी दर्शनाने आणि त्याच्या कृपेच्या प्रभावाने गुरुदेवांच्या ठायी प्रज्ञाजागृती पूर्णत्वाने आली. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीमध्ये ठिकाणी ऋषित्व आणि देवत्व एकत्र पहावयास सापडते त्यावेळी तिच्या ठायी चैतन्य (ब्रह्मतेज) वास करत असते. अशा चैतन्यमयी पुरुषांच्या केवळ दर्शनाने दर्शनार्थीच्या मनाला शांतता आणि स्थिरता लाभते. परमपूज्य गुरुदेवांची ही अवस्था वाढत जाऊन हळूहळू विदेही अवस्थेकडे वाटचाल झाली. त्यांच्या देहातून नीलकांती प्रकट होत असे आणि उत्तरोत्तर ती वाढत गेली. अशी अवस्था पूर्वी श्री चैतन्य महाप्रभूंना आली होती. शृंगेरी पीठाचे श्रीशंकराचार्य यांनी तर “गुरुदेव हे दत्तावतारी आहेत आणि नगर हे आम्हाला शृंगेरीच आहे”, असा गौरव केला आहे. परमपूज्य सद्गुरू श्रावण वद्य १४ शके १९२१ (दि.८.९.१९९९) रोजी, बुधवारी मानवदेह सोडून ब्रह्मरूप झाले. त्यांनी आपली आत्मज्योत “श्री दत्तात्रेय निवासा'' त ठेवली आहे. हे तीर्थक्षेत्र सर्वांचे मंगल करणारे झाले आहे. सद्गुरूंचे सर्वांना अखंड आशीर्वाद आहेत. “गुरुवाणी''तूनही त्यांच्या आशीर्वचनाचा लाभ सर्वांना होतच आहे.

।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy