आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवापरमपूज्य स्वामी श्री नरसिंहसरस्वती यांनी जेव्हा गुरुदेवांवर अनुग्रह केला, तेव्हां त्यांचाकडे जे कार्य आले ते म्हणजे धर्म सांभाळणे, धर्म समजून सांगणे आणि वेदांत विचारांवर आधारित धर्माची स्थापना करणे.

१) श्री दत्तात्रेय निवास:-“श्री दत्त देवस्थान ट्रस्ट” ह्या ट्रस्टची स्थापना परमपूज्य गुरुदेवांनी ११ मार्च १९७४ रोजी केली. दर्शनाला येणाऱ्या भक्तांचा सतत वाढता ओघ लक्षात घेऊन सद्गुरूंनी नगर येथील मनमाड रस्त्यावर “श्री दत्तात्रेय निवास“ ही वास्तू १९७४ साली उभी केली. हे अखंड जागृत धर्मस्थान आहे.

२) वेदकार्य:- परमपूज्य गुरुदेवांनी ईश्वरी आज्ञेने वेदविद्येच्या संरक्षणाचे व संवर्धनाचे कार्य हाती घेतले. वेदांचा विस्तार व्हावा, वेदांची महती सामान्यजनांना कळावी, वेद सामान्य जनांपर्यंत पोहोचावेत, हे महत्त्वाचे कार्य आहे. ह्या कार्याचे मूळ लक्षात घेतले तर ते हेच कि, लोकांना सुबुद्धी व्हावी, लोकांना या कार्याचे ज्ञान व्हावे आणि ह्या संगतीत आल्यावर त्यांच्या मनाला शांती लाभावी. वेदमंत्राच्या पठणाद्वारे शक्ती पुन्हा व्यक्त रुपाने दिसायला लागते. गुरुदेवांनी वेदपठणाची परंपरा सुरु करण्याचे मूळ कारण हेच आहे. त्यासाठी नाना प्रकारची पुस्तके तयार करून व विद्यार्थी वर्ग निर्माण करून वेदांचे हे कार्य करायचे आहे. वेदांचे अखंड पठण चालले तर परमेश्वर अवतार घेण्याची शक्यता आहे. वेदांमुळे मानवांच्या बुद्धीला चालना मिळते आणि तेच मानवाचे कल्याण करतात. जर वेदांचे उच्चार थांबले तर कठीण प्रसंग येईल. नंतर त्याला पर्याय शोधणे कठीण जाईल. या भूमीला वसुंधरेचे रूप आले पाहिजे. वेदोच्चारातून ज्या लहरी निर्माण होतात त्यांची शक्ती उपयोगी पडणारी आहे. भारतावर ओढवलेली अनेक संकटे नाहीशी झाली ती वेदांच्या उच्चारामुळेच. सद्यःस्थितीत वेदांच्या उच्चारणामुळे, लहरीच्या प्रभावाने हजारो लोकांचे मन आणि बुद्धि यात परिवर्तन घडून ते या मार्गाकडे वळू लागले आहेत. वेदविद्येच्या अध्यापनासाठी “वेदांत” ही भव्य वास्तू श्री दत्तात्रेय निवासाशेजारी उभारली असून आज सुमारे १०० छात्रांची गुरुकुल पद्धतीने शिक्षणाची सोय होईल अशी व्यवस्था केली आहे. या वेदपाठशाळेच्या बीजाचे वेदांत विद्यापीठाच्या प्रचंड वटवृक्षात रूपांतर होणार आहे. ट्रस्टतर्फे येथील छात्रांची जेवणाखाण्याची, राहण्याची, कपड्या-लत्त्याची. पुस्तकांची व शिक्षणाची विनामूल्य सोय उपलब्ध केली आहे. वेदविद्येचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जतन करणाऱ्या घनपाठी ब्राह्मणांचा ट्रस्टतर्फे इ.स्.१९८१ पासून दत्त जयंतीला महावस्त्र व दक्षिणा देऊन सत्कार करण्यात येतो. ट्रस्ट तर्फे अनेक दुर्मिळ धार्मिक ग्रंथ उपलब्ध करण्यात येणार आहेत. दुर्मिळ धार्मिक हस्तलिखिते व ग्रंथ यांचे मुद्रण व पुनर्मुद्रण करण्याचे कार्य हाती घेतले आहे. वैदिक ग्रंथालय, वैदिक वस्तू संग्रहालय, भक्तनिवास व वैदिक संशोधन केंद्र यांचे निर्माण कार्य सुरु आहे.

३) धर्मकार्य हे समाजकार्यच:- गुरुदेव भक्तांना म्हणत, ”तुम्ही येथे दर्शनाला येता. तुमची मानसिक दुःखे बरीच कमी होतात. हे सुद्धा समाजकार्यचं आहे मनुष्याचे मन, अंतःकरण सद्धर्मनिष्ठ होणे, तसा सतत पर्यटन करणे, स्वतःच्या प्रयत्नाने ते इतरांच्या अनुभवला आणून देणे, हे खरे समाजकार्यच आहे.” गुरुदेव धर्मकार्याबरोबरच अनाथांना आधार देतआले. त्यांनी जनकल्याणकारी, सेवाभावी अशा शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक संस्थांना, तसेच दुष्काळ पीडित, भूकंपग्रस्त व दंगलग्रस्त यांना आर्थिक व वैद्यकीय मदतही केली आहे. आजही ति केली जात आहे.

४) शिकवण:- भक्तांच्या कल्याणासाठी ईश्वरसेवेत अखंड रममाण असलेल्या गुरुमूर्तीचे जीवन दिव्य, उदात्त, व त्यागमय होते. आपल्या भक्तांच्या शंकांचे निरसन करताना त्यांच्या उत्स्फूर्त उपदेशामृताच्या वाक्गंगेचा ओघ सहजपणे वाहू लागे. यामध्ये अवताररूपी गुरूंनी आपले सामर्थ्य ओतलेले असे आणि हे सर्व ज्ञान भगवत् प्रेरणेनेच भक्तांच्या ओंजळीत टाकले जाई. ईश्वरभक्तीने भरलेल्या हृदयातून हे बोल येत असतं. गुरुदेवांची शिकवणूक म्हणजे “सहज बोलता करती उपदेश” अशीच होती. गुरुदेव बोलत ते साधे मोकळे. त्यात भारंभार ग्रांथिक संदर्भ नसत. तर्ककर्कशत नसे. असे फक्त आंतरिक उमाळा सारे सह्तेने प्रकटत असे. ग्रंथाभ्यासातून, पुर्वतयारीतून स्मरणाने केलेले हे कथन-निवेदन नसे, तर जागृत झालेल्या प्रज्ञेतूनमुखवटे उत्तरे आपोआप बाहेर पडत. ते नेहमी सांगत कि, “तुमचा प्रपंच तुमच्या प्रारब्धाने होतो, पण अध्यात्मिक प्रगती मात्र तुमच्या कृतीने होते. त्यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक आहे.” ते सांगत कि, “मी तुमचा अध्यात्मगुरु आहे. कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसून कुरमुरे मागू नका तर पूर्व सुकृताने मिळालेल्या संधीचा फायदा घ्या व आत्मोन्नती साधा” या दिव्य वाणीतून निघालेल्या ज्ञानपुष्पांचा गुच्छ भाविकांना, जिज्ञासूंना उपलब्ध व्हावा हासुद्धा ईश्वरी संकेतच आहे. यातील बोल अधिकारी मूर्तींचे आहेत. वरून जेवढे सरळ, सोपे वाटतात त्यापेक्षा त्यांत खोल गुढार्थ आहे. तो सतत वाचनाने, मनाने आणि चिंतनाने उलगडला जाईल.

।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy