आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।
मुळात “अव्यक्तातून व्यक्त होण्याची स्थिती” म्हणजे अवतार. अवतार जेव्हा होतात त्या आधी मनुष्याचे अधःपतन झालेले असते, दुष्टांचा सुकाळ झालेला असतो, सज्ज्जनांचा छळ होतो, धर्माची जेव्हा पूर्ण पायमल्ली होते तेव्हा सज्ज्जनांच्या रक्षणाचा विचार करतात आणि अव्यक्तातून व्यक्त होतात. 
भगवान श्रीकृष्ण जेव्हा गोकुळात होते तेव्हा तेथे पूर्ण समरस झाले होते. ते एकदा गोकुळ सोडून गेल्यानंतर परत गोकुळाला गेले नाहीत. तसेच द्वारकेला गेल्यावर मथुरेची आठवण काढली नाही. हे सर्व विसरणे व मायेत न अडकणे हे भगवान श्रीकृष्णांकडून शिकण्यासारखे आहे. 
भगवान श्रीकृष्ण हे बालपणापासून निर्वाणापर्यंत एकाहून एक चढत्या वाढत्या भूमिका जगत गेले आहेत. मानवी जीवनातील सर्व भूमिका ते पूर्णत्वात, यशस्वितेत जगले आहेत. बाळकृष्ण, गोपालकृष्ण, गोपीकृष्ण, राधाकृष्ण असं होत होत राजाधिराज श्रीकृष्ण, महायोद्धा चक्रपाणी श्रीकृष्ण आणि अखेर उपनिषदांचे दोहन करणारे, गीतोपनिषद गाणारे, परमश्रेष्ठ तत्वदर्शी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण अशी कृष्णरूपे परिपूर्णतेकडे जाताना दिसतात. भगवंतांनी श्रीकृष्ण अवतारातच लोकांना मोक्ष दिला आहे. पूर्णावतार याचा अर्थ की याहून अधिक परिणत असा अवतार होणे शक्य नाही ही त्याची सीमा आहे. परमसीमा आहे. 
म्हणून गीता हे अंतिम तत्वज्ञान आहे. हेच खरं. यापेक्षा आणखीन कुठल्याही ग्रंथाची आवश्यकता नाही. 
भगवान श्रीकृष्णांना समज अतिशय मोठी होती. त्यांची वृत्ती अतिशय शांत तसेच ज्ञानप्राप्ती अत्यंत श्रेष्ठ दर्जाची होती. ते ज्ञान मार्गाने जाऊन दुसऱ्यांची मने कशी बदलता येतील, दुसऱ्यांना ते समजावून कसे सांगता येईल यावर त्यांचे लक्ष असे. काही वेळेला असे प्रश्न निर्माण होतात की जिथं चर्चा करण्याची आवश्यकता नसते तर तिथे युद्धच करावे लागते, पण भगवान श्रीकृष्णांच्या जीवनात तसं ते दिसत नाही. असे दिसून येते की, दर वेळेला माघार घेणे, कौरवांकडे जाणे, कौरवांना समजावून सांगणे की, “शक्यतो तुम्हाला युद्ध टाळता आलं तर पाहा” त्यांचा संहार न होईल याची काळजी घेणे हे भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रात आपल्याला दिसून येते. ही पूर्णावताराची लक्षणे आहेत की दया, क्षमा, शांती आणि नंतर अटळ म्हणून शिक्षा. कौरव जेव्हा शिक्षेला पात्र ठरले त्याच वेळेला युद्ध करण्याची तयारी दाखवली. जोपर्यंत ते पात्र ठरत नव्हते, तोपर्यंत अनेक वेळेला चर्चा केलेल्या आहेत. कौरवांकडे गेलेले आहेत, कौरवांना भेटलेले आहेत. शिष्टाई केलेली आहे. वास्तविक त्यांना हे दाखवता आले असते की, “मी पूर्णावतार आहे. जन्माने आठवा आहे.” पण ते त्यांनी केले नाही. कौरवांना ते तत्क्षणी मारून टाकू शकत होते. कौरवांनी पांडवांचे अतोनात हाल जरी केले तरी पांडवांची बाजू एकदम न घेता ज्ञानाच्या मार्गांनी, बुद्धीच्या मार्गांनी ते गेले. पण ज्यावेळेला असे दिसून आले की कौरव हे कुठल्याच विचाराला तयार नाहीत, आपला तमोगुण सोडायला तयार नाहीत, त्या वेळेलाच युद्धाचा प्रसंग आला. 
भगवान श्रीकृष्णांला “रणछोडदास” असेही म्हणतात. त्याचा अर्थ असा की, श्रीकृष्णाने केव्हातरी माघार घेतली होती. ज्या हातात सुदर्शन चक्र आहे, अशा अवतारी पुरुषाने माघार घेतली याचा अर्थ समजायला पाहिजे. अनुकुलता नसली की माघार घ्यावी लागते. अशा वेळी योग्य निर्णय घ्यावा लागतो. हे सर्व भगवंताचे गुण आहेत. भगवंत मनुष्य रूपाने जन्माला आल्यानंतर मनुष्यांप्रमाणे त्यांना जगावे लागते. 
द्वारका येथील श्रीकृष्ण मंदिरातील भगवंतांची मूर्ती गंडकी पाषाणाची आहे. या गंडकी पाषाणाचे वैशिष्ट्य हे की पाषाणाला फार चकाकी असते. गंडकी नदीचे दुसरे नाव नर्मदा नदी आहे. यातील काळ्या पाषाणाची मूर्ती हे विष्णूंचे रूप समजले जाते. आदी शंकराचार्यांचे कुलदैवत श्रीकृष्ण होते. त्यांनीच या मूर्तीची स्थापना केली आहे. येथे भगवान श्रीकृष्णांना “द्वारकाधीश” म्हणतात. द्वारकाधीश म्हणजे सर्वांना एकत्र आणणारा. 
भगवान श्रीकृष्णांच्या टोपामध्ये मोरपीस आहे, त्याचा अर्थ असा आहे की, नाना रूप धारण करणारा, नाना रंग घेणारा असा जो भगवान त्याचं “मोरपीस हे प्रतिक आहे.” भगवान श्रीकृष्णाने टोपामध्ये मोरपीस का घातले तर त्याचा अर्थ ज्ञानी जनांना किंवा सामान्य जनांना कळावा याकरिता त्यांनी ते धारण केले आहे. 
परमात्म्याची विविधता या मोरपिसाच्या प्रतीकातून लक्षात यावी हा विचार त्या रंगसंगतीत केलेला आहे. नाना रूप धारण करत असला तरी शेवटी तो एकच आहे. 
भगवंतांना श्रीराम अवतारात असताना ज्या ज्या ऋषीमुनींनी ओळखले होते त्या सर्वांनी त्यांना आलिंगन देण्याची इच्छा प्रकट केली होती. तेव्हा भगवंतांनी राजपुत्राच्या अवस्थेत असल्याने आलिंगन देऊ शकत नाही म्हणून समजावले होते. पुढे श्रीकृष्ण अवतारात येथे आले तेव्हा पूर्वजन्मातील सर्व ऋषीमुनी या गोपकन्या म्हणून जन्माला आल्या, त्यांचेबरोबर किशोर अवस्थेपर्यंत रासक्रीडा केल्या, त्यांना आलिंगने दिली, या घटना सर्वांनाच ठाऊक नसतात. 
भगवंत आपल्या समोर विविध रूपांमध्ये येतो. कधी चक्रधारी नारायण, कधी मुरली मनोहर श्रीकृष्ण, कधी धनुष्यधारी श्रीराम, तर कधी निर्लेप, निर्विकार सदाशिव अशी त्यांची अनेक रूपे आहेत. सात्विक भक्तांसाठी मुरलीधर, दुष्टांच्या पारिपत्यासाठी चक्रधर व धनुष्यधारी, तर निर्लेप करण्यासाठी सदाशिव, अशी कार्यपरत्वे रूपे त्यांने धारण केलेली आहेत. उत्तम कर्म करणाऱ्यांचा तो सखा, माता, पिता, भ्राता होतोच पण दुष्कर्म करणाऱ्यांच्या नाशासाठीही आपल्याला त्याच्याकडे शरणागत होऊन जावे लागते.


श्रीकृष्ण जयंती (गोकुळाष्टमी)
भगवान श्रीकृष्णांनी ज्या दिवशी अवतार घेतला त्या दिवसालाच जन्माष्टमी म्हणतात. हा दिवस श्रावण वद्य अष्टमी आहे. भगवान श्रीकृष्णांनी श्रावण महिन्यामध्ये जन्म घेऊन श्रावण महिन्याला परिपूर्णता आणलेली आहे. या अवताराचे स्मरण म्हणून सर्व भक्त मोठ्या भक्तिभावाने त्याची उपासना करतात. या दिवशी उपवास करतात व दुसऱ्या दिवशी सोडतात. भगवान श्रीकृष्णांचा जन्म रोहिणी नक्षत्रावर, श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला झाला आहे. त्या काळात घड्याळ नसल्याने “मध्यरात्र” असे संबोधले जाते. आपण फक्त अष्टमीची रात्र व रात्री १२ वाजले की जन्म साजरा करणे योग्य नाही. तेव्हा रोहिणी नक्षत्रही असणे जरुरीचे असते. आपल्या आश्रमातील जन्माष्टमी उत्सव द्वारकेच्या परंपरेप्रमाणे ठरविला जातो. जन्माष्टमीनिमित्त सर्व भक्त आश्रमात जमतात, उत्सव साजरा करावा हा पवित्र हेतू असतो, त्याबरोबर गुरुदर्शन व्हावे ही मनामध्ये विशेष भावना असते. श्रेष्ठ पुरुषांची जयंती साजरी केल्याने त्यांची विश्वव्यापकता वाढते. जयंतीच्या दिवशी त्यांची स्तुती करावी, त्यांच्या चरित्राचा अभ्यास करावा. भगवान श्रीकृष्णांचा आदर्श नजरेसमोर ठेवावा. 


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy