आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


चिंतन


||श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः||

अज्ञानतिमिरांधस्य, ज्ञानांजनशलाकया ।
चक्षुरुन्मीलितंयेन, तस्मैश्रीगुरवेनमः ॥-श्रीगुरुगीता


"अज्ञानरूपी अंधाराने अंध झालेल्या जिवाच्या नेत्रांत ज्याने ज्ञानस्वरूपी अंजन घालून दिव्य चक्षू उघडले आणि त्याला आत्मस्वरूपाचा महानिधि दाखविला त्या श्रीगुरुंना नमस्कार असो"

खरंच माझं अज्ञान नष्ट झाले आहे का? माझ्या डोळ्यांत ज्ञानरुपी अंजन पडले आहे काय? जर पडले असेल तर त्याचा काय परिणाम झाला? मी श्री दत्त देवस्थानात कसा आलो? का आलो? ज्या उद्देशाने आलो तो उद्देश साध्य झालाय का? ह्या स्थानात आल्यापासून माझ्यात काही बदल झालाय का? तो इतरांना जाणवतोय का? माझ्या प्रापंचिक अडचणी सुटल्यानंतर मी श्रीगुरुकार्य हाती घेतले आहे का? असे अनेक प्रश्न वारंवार पडतात! ह्याचे कारणही तसेच आहे! परमपूज्य गुरुदेव कोण आहेत? त्यांचे खरे स्वरुप काय? त्यांचे खरे कार्य काय? आणि माझे सद्यस्थितीतील आचरण हे त्या कार्याशी सुसंगत आहे काय? हा विचार करण्याचा हा काळ आहे!

परमपूज्य गुरुदेवांनी १९९९ साली आपला देह विसर्जित केला आणि तेव्हा पासून कलीचा प्रभाव वाढला! कली काय करतो? तर जेथे चांगले चालले आहे तिथे अडथळे आणतो! त्याला तसं वरदान आहे हे परमपूज्य गुरुदेवांनी वारंवार सांगितले आहे! कली निरनिराळी रुपे धारण करतो अन्मूळ ध्येयापासून बाजूला करतो व बुद्धी भ्रमित करतो! त्यात वेदोच्चार हा कलीसाठी सर्वात मोठा धोका! मला ह्या कलीने ग्रासलेले नाही ना?

माझी बुद्धी संमोहित तर झाली नाही ना? किंवा त्याही पुढे जाऊन मला गुरुकार्याचा विसर तर पडला नाही ना? गुरुस्वरुप आणि श्री गुरुदेवांचा ईश्वरी साक्षात्कार ते नीलवर्णकांतीचा प्रवास ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत! तसेच रायतळे येथील छोट्याश्या जन्मस्थळापासून श्री दत्तदेवस्थान महासंस्थानच्या त्रिभूवन सुंदर इमारतीत निवासापर्यंतची एक व्यावहारिक बाजूहा एक स्वतंत्र विषय आहे! सद्यस्थितीत ह्या बाजू समजून घेण्यात काही जणांची गल्लत होत आहे! व त्यातूनच ब-याच अंधश्रद्धा वा अफवा तसेच काहीवेळा दंतकथा जन्माला येत आहेत! इथेच कलीची झलक दिसून येते! ही बाजू कधीही आपल्या समोर येत नाही किंवा अशा बाजूने विचार करण्याची बुद्धीच होत नाही! परमपूज्य गुरुदेवांना वयाच्या ७ व्या वर्षीच ईश्वरी दर्शन झाले! व तेथून त्यांचे अलौकिक चरित्र घडावयास सुरुवात झाली! या अवस्थेचे वर्णन करताना माऊली म्हणतात

मोटकी देहाकृती उमटे|
मग निजज्ञानाची पहाट फुटे|
सूर्यापुढेप्रगटे|प्रकाशुजैसा||ज्ञानेश्वरी अ६-४५२


ज्याप्रमाणे सूर्यापुढे प्रकाश प्रकट व्हावा तसे अशा विशिष्ट कार्यासाठी जन्मलेल्या व्यक्तींना आत्मज्ञान जन्मतःच असते त्यांना वयाची वाट पहावी लागत नाही!

तैसी दशेची वाट न पाहता|
वयसेचिया गावा न येता|
बाळपणीच सर्वज्ञता | वरी तयांते ||- ज्ञानेश्वरी अ६-४५३


समग्र शास्त्रेही ओठांवर येऊन उभी राहिलेली असतात! वाणीतून सारस्वत पाझरत असते! त्यांची दृष्टी देखील सात्विक आणि देह हा केवळ दर्शनातून समाधान देणारा असतो!

हे झाले स्वरुपाविषयी थोडेसे!

आता विचार अजून थोडे व्यापक करुया! परमपूज्य गुरुदेवांचा जन्म हा क्षीरसागर घराण्यातच! आई राधा व वडील कृष्णाजी यांच्याच पोटी का झाला? आपल्याच घरात का झाला नाही? याचे कारण की तसेच आहे! या घराण्यात पीढ्यान्पीढ्या उपासना सुरु होती त्याचे फलित म्हणून परमपूज्य गुरुदेवांचा जन्म ह्या घराण्यात झाला! अशा व्यक्तींच्या जन्माने त्या घराण्यातील मागील सर्व पीढ्यांचा उद्धार होतो! आमच्या घरात अशा व्यक्तींनी अद्याप जन्म घेतलेला नाही यातच आमच्या मर्यादा स्पष्ट होतात! आमचे पूर्वजन्माचे देणे घेणे अद्याप संपलेले नाही, मुख्य म्हणजे भगवंतांनी जन्म घ्यावा इतकी पुण्याई आमच्या घराण्याची जमा झालेली नाही! गुरुदेवांनी देह ठेवून १५-१६ वर्षे होऊन सुद्धा आजही श्री दत्तात्रेय निवासातील मूर्तींच्या चैतन्यात जराही न्यूनत्व नाही! उलट ते प्रतिपश्चंद्रलेखेव वृद्धिंगत होत आहे! हे परमपूज्य गुरुदेवांनी आपली आत्मज्योत श्री दत्तात्रेय निवासात ठेवली असल्याची ह्याहून दुसरी कोणती साक्ष हवी? श्री दत्तदेवस्थानात जाणारे आपण व येतानाचे आपण! हा आपल्यात होत असणारा बदल येथील शक्तीची साक्ष देऊन जातो! ह्या मूर्तींमध्ये चैतन्य अबाधित राखण्यासाठी कडक पावित्र्यात त्रिकाल पूजा होत असते! त्यामूळेच हे चैतन्य आपणास अनुभवाला येते! प्रत्यक्ष भगवंतानी आपल्या अवतार कार्यासाठी ह्या कुटुंबाची निवड केली असल्यानेच इतके कडक सोवळे पाळणे त्यांना शक्य होते! आणि आमची मात्र रोजच्या देवपूजा ठरलेल्या वेळी सुरु होऊन ठरलेल्या वेळी संपत नाही! त्यामुळे ह्या गुरुगृहाचे आपण सदैव ॠणी असायला हवे!

आपला व गुरुदेवांचा संबंध हा गुरु-शिष्य वा गुरु-भक्ताचा आहे! गुरुगृहाशी कृतज्ञतेचा संबंध आहे! गुरुदेवांचा व त्यांच्या घराण्यातील लोकांचा संबंध हा त्यांचा वैयक्तिक संबंध आहे! ईश्वरी साक्षात्कार झाला असला तरी तपश्चर्येचा काळ हा अतिशय खडतर होता! घरची अत्यंत हलाखीची त्यात बालपणीच पितृछत्र हरपलेले असल्याने घरची अत्यंत गरीब परिस्थिती! हा काळ गुरुदेवांचा गौप्यकाल असल्याने त्यांचे स्वरुप कुटुंबियांच्या लक्षात येत नव्हते! ही भगवंताचीच माया असते! परिणामी घरातील हलाखीच्या परिस्थितीत गुरुदेवांनी बाहेर जाऊन करुन काम करुन पैसे घरात आणावेत ही सर्वसामान्य अपेक्षा आजिबात चूकीची नव्हती! आपण त्या जागी असतो तर आपणही हेच केले असते ही वस्तूस्थिती आहे! हे सर्व सांगायचे तात्पर्य इतकेच की त्यांच्या कौटुंबिक जीवनात आपण एक भक्त वा शिष्य म्हणून डोकावणे हे कदापि अशोभनीयच! कुणी कितीही जवळचा असला तरी एका ठराविक मर्यादेपलिकडे आपल्या वैयक्तिक आयुष्यात डोकावलेले कुणालाही आवडत नाही!

"आत्मनः किम्इति दुःखम्न परेषांसमाचरेत् |"

आपणाला जे क्लेशकारक वाटते ते इतरांबाबत आपण वागूच नये!

गुरुदेवांचे मूख्य कार्य काय? त्यांचा अवतार कशासाठी आहे? तर परमपूज्य स्वामी श्री नरसिंहसरस्वती यांनी जेव्हा गुरुदेवांवर अनुग्रह केला, तेव्हां त्यांचाकडे जे कार्य आले ते म्हणजे "धर्म सांभाळणे, धर्म समजून सांगणे आणि वेदांत विचारांवर आधारित धर्माची स्थापना करणे."

वेदकार्य:- परमपूज्य गुरुदेवांनी ईश्वरी आज्ञेने वेदविद्येच्या संरक्षणाचे व संवर्धनाचे कार्य हाती घेतले. वेदांचा विस्तार व्हावा, वेदांची महती सामान्य जनांना कळावी, वेद सामान्य जनांपर्यंत पोहोचावेत, हे महत्त्वाचे कार्य आहे. ह्या कार्याचे मूळ लक्षात घेतले तर ते हेच कि, लोकांना सुबुद्धी व्हावी, लोकांना या कार्याचे ज्ञान व्हावे आणि ह्या संगतीत आल्यावर त्यांच्या मनाला शांती लाभावी. वेदमंत्राच्या पठणाद्वारे शक्ती पुन्हा व्यक्त रुपाने दिसायला लागते. गुरुदेवांनी वेदपठणाची परंपरा सुरुकरण्याचे मूळ कारण हेच आहे. त्यासाठी नाना प्रकारची पुस्तके तयार करून व विद्यार्थी वर्ग निर्माण करून वेदांचे हे कार्य करायचे आहे. वेदांचे अखंड पठण चालले तर परमेश्वर अवतार घेण्याची शक्यता आहे. वेदांमुळे मानवांच्या बुद्धीला चालना मिळते आणि तेच मानवाचे कल्याण करतात. जर वेदांचे उच्चार थांबले तर कठीण प्रसंग येईल. नंतर त्याला पर्याय शोधणे कठीण जाईल. या भूमीला वसुंधरेचे रूप आले पाहिजे. वेदोच्चारातून ज्या लहरी निर्माण होतात त्यांची शक्ती उपयोगी पडणारी आहे. भारतावर ओढवलेली अनेक संकटे नाहीशी झाली ती वेदांच्या उच्चारामुळेच. सद्यःस्थितीत वेदांच्या उच्चारणामुळे, लहरीच्या प्रभावाने हजारो लोकांचे मन आणि बुद्धि यात परिवर्तन घडून ते या मार्गाकडे वळू लागले आहेत. वेदविद्येच्या अध्यापनासाठी “वेदांत” ही भव्य वास्तू श्री दत्तात्रेय निवासाशेजारी उभारली असून आज सुमारे १०० छात्रांची गुरुकुल पद्धतीने शिक्षणाची सोय होईल अशी व्यवस्था केली आहे. या वेदपाठशाळेच्या बीजाचे वेदांत विद्यापीठाच्या प्रचंड वटवृक्षात रूपांतर होणार आहे. ट्रस्टतर्फे येथील छात्रांची जेवणाखाण्याची, राहण्याची, कपड्या-लत्त्याची. पुस्तकांची व शिक्षणाची विनामूल्य सोय उपलब्ध केली आहे. वेदविद्येचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जतन करणाऱ्या घनपाठी ब्राह्मणांचा ट्रस्टतर्फे इ. स्.१९८१ पासून दत्त जयंतीला महावस्त्र व दक्षिणा देऊन सत्कार करण्यात येतो. ट्रस्ट तर्फे अनेक दुर्मिळ धार्मिक ग्रंथ उपलब्ध करण्यात येणार आहेत. दुर्मिळ धार्मिक हस्तलिखितेव ग्रंथ यांचे मुद्रण व पुनर्मुद्रण करण्याचे कार्य हाती घेतले आहे. वैदिक ग्रंथालय, वैदिक वस्तू संग्रहालय, भक्तनिवास व वैदिक संशोधन केंद्र यांचे निर्माण कार्य सुरु आहे.(संदर्भ- गुरुवाणी जुनी प्रस्तावना)

वेदांत वास्तूही वेदविद्येच्या संवर्धनासाठी सुरु झालेली असून ती केवळ वास्तू नव्हे तर वेदांत विद्यापीठ आहे! सद्यस्थितीत अजूनही ती केवळ पाठशाळाच आहे! वास्तविक पाहता ह्या विद्यापीठाच्या शाखा निरनिराळ्या ठिकाणी निघून त्यांना ट्रस्ट तर्फे आचार्य सवेतन पुरवून अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे ह्याच विद्यापीठा तर्फे दिली जावीत अशी गुरुदेवांची तीव्र इच्छा होती हे"यदा यदा हि धर्मस्य" या सांद्रमूद्रिकेत (सीडी) गुरुदेवांनी बोलून दाखविले आहे! त्यात आम्ही किती यशस्वी झालो? २० सत्संग मंडळांपैकी स्वतःच्या शहरात वा गावात श्री दत्तदेवस्थानाच्या संस्कारांना साजेशी व परमपूज्य गुरुदेवांना अभिप्रेत अशी वेदपाठशाळा सुरुकरण्याचे सामर्थ्य निश्चितच आहे! प्रसार सेवेच्या माध्यमातून प्रचंड निधी जमा होतो! ह्याचा विनियोग अशा विधायक कार्यासाठी करता येणार नाही का? परदेशातील पैसा हा ह्या कार्यासाठी पूर्णपणे निषिद्ध! भारताबाहेरील भूमी ही भोग भूमी असल्याने तेथे कलीचे साम्राज्य आहे! त्यामुळे असा पैसा ह्या पवित्र कार्यात कोठेही वापरला जाऊ नये नव्हेतर असा पैसा स्वीकारुच नये ही गुर्वाज्ञाच मानून कार्यरत राहता येणार नाही का? गुरुदेवांना बाहेरुन निधी आणणा- यापेक्षा देवस्थानचा पैसा वाचविणा-याचेजास्त कौतुक असे हेही या निमित्ताने सांगावे वाटते!

देवस्थानची शिस्त व पावित्र्य हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे! हा संन्यासाचा आश्रम व भगवान दत्तात्रेयांचे निवासस्थान आहे! त्यामुळे घराला लागू असणारे सर्व नियम व संन्यस्त व्यक्तीच्या आश्रमास लागू असणारे सर्व नियम येथे काटेकोरपणे पाळले जातात! आपण ही ते काटेकोरपणे पाळून पावित्र्य राखण्यास मदत करावी व स्वतःच्या उदाहरणाने ते इतरांच्या अनुभवाला आणून द्यावे! ही नवीन येणा-या भक्तांसमोर वा दर्शनार्थीं समोर आपल्या गुरुंचे श्रेष्ठत्त्व प्रकट करण्याची न कळत मिळालेली संधी समजावी!

उदा-
१) स्त्री व पुरुष भक्तांचा पोशाख पूर्ण व अध्यात्मिक वातावरणास साजेसा असावा! स्त्रीयांचे केस बांधलेले असावेत!

२) आपण ज्यांना माहिती सांगून या स्थानात पाठवितो त्यांना ह्या स्थानाच्या पावित्र्याची व शिस्तीची पूर्वकल्पना द्यावी

३) दर्शनास येताना कांदा-लसूण, अभक्ष भक्षण वा मद्यपान करुनये या विषयी आवर्जून सांगणे!

४) दर्शनाच्या वेळा ह्या योग्य सांगणे!

५) भोजनप्रसादास पूर्व परवानगी घेणे

६) दत्तात्रेय निवास व श्री दत्तक्षेत्राची योग्य व खरी माहिती सांगणे!

असेकाही सहज पाळता येतील असे नियम जरुर सांगावेत! श्रीगुरुंचे स्वरुप ओळखण्याचा प्रयत्न करण्यातच जीवनाचे सार्थक आहे! अन्यथा कली आपला बुद्धी भेद करण्यास तयार आहेच !

"श्रीरामकृष्ण" चरणरज

।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy