आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा



*।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।*


Dattatray Nivas


१) *श्री दत्तात्रेयांचे निवासस्थान*- भारतात अनेक देवतांची अत्यंत प्राचीन अशी देवस्थाने आहेत. त्याचबरोबर भगवान श्री दत्तात्रेयांची अनेक क्षेत्रे प्रसिद्ध आहेत. परंतु इथे मात्र भगवान श्री दत्तात्रेयांनी निवास केल्याने या त्रैलोक्य पावन अशा स्थानाचे *श्रीदत्तात्रेय निवास* हे नाव सार्थ ठरते. याची प्रचिती शृंगेरी पीठाचे शंकराचार्य अभिनवविद्यातीर्थांनाही आली व त्यांनी हे स्थान त्यांना प्रतिश्रृंगेरी असल्याचे गौरवोद्गार देखील आपल्या भेटी दरम्यान काढले.
भगवान श्री दत्तात्रेयांचे *निवासस्थान* असल्याने कोणत्याही निवासस्थानास लागू होणारे सर्व नियम या स्थानास लागू होतात. कडक पावित्र्य आणि तशीच शिस्त हे या स्थानाचे वैशिष्ट्य व शक्तीची प्रचिती येण्याचे कारण देखील.


Dev


Gurudev


२) श्रीदत्तात्रेय निवासातील मूर्ती- श्रीदत्तात्रेय निवासात प्रवेश केल्याबरोबरच *भगवान श्रीदत्तात्रेय, श्री महालक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांच्या सालंकृत मूर्तींचे दर्शन होते. तसेच स्वयंभू गणेश आणि स्वयंभू शिवलिंग हे देखील गाभा-यात विराजमान आहेत.

मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्तपाणियुगुले डमरूत्रिशूले |
यस्यस्त उर्ध्वकरयोः शुभशंखचक्रे,वन्दे तमत्रिवरदं भुजषटकयुक्तम् ||

श्री दत्तात्रेयांची मूर्ती ही ह्या श्लोकाचे मूर्त स्वरूप आहे. अर्थात्
आपण जसे ध्यान करतो त्याप्रमाणे ही मूर्ती असल्याने आपण करत असलेली उपासना लवकर फलद्रूप होते. ह्या मूर्तीच्या हातातील त्रिशूल आणि सुदर्शनचक्र ही आयुधे डाव्या हातात आहेत त्यामुळे ती *अभय मूर्ती* आहे.
या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भगवान श्री दत्तात्रेयांची मूर्ती ही सालंकृत आहे. जी इतर ठिकाणी आपणांस वैराग्य स्वरुपात पहावयास मिळते.

३) क्षेत्राच्या ठिकाणी असणा-या ईश्वरी अस्तित्वाच्या खुणा- *जेथे ईश्वरी अस्तित्वाच्या खुणा असतात ते स्थान क्षेत्र म्हणून उदयास येते.*

अ) चिंतामणी पादूका- आपल्या आश्रमात श्रीगुरूंचे चिंतामणी चरण उमटलेले आहेत. हा चमत्कार नसून हि वस्तूस्थिती आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्रीगुरूंनी आपल्या आश्रमात या चरणांच्या रूपानं वास्तव्य केलं आहे. ज्याप्रमाणे श्रीनृसिंह वाडी व श्रीक्षेत्र गाणगापूर या ठिकाणी श्रीगुरूंनी स्वहस्ते पादुका स्थापन केल्या आहेत व त्या रुपात भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी वास्तव्य करून आहेत तीच साक्ष श्रीगुरूंनी आश्रमात ठेवली आहे. याचा दुसरा अर्थ असाही आहे कि, *श्रीगुरूंचे चरित्र आजमितीपर्यंत चालू आहे.* - परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज

ब) कल्पवृक्ष- श्रीदत्तात्रेय निवासाच्या मुख्य मंदीराच्या पाठीमागे एक मूळी उगवली होती. परमपूज्य श्री गुरुदेवांच्या आज्ञेने ती तिथून काढून आश्रमाच्या मागील बाजूस लावली असता एकाच मूळीतून *वड, औदुंबर आणि पिंपळ* हे तीनही देववृक्ष त्या एकाच मूळीतून आले. हे जगातील आश्चर्य आहे. ईश्वरी कृपेशिवाय अशा गोष्टी होत नाहीत अशी ग्वाही देखील राहूरीच्या कृषीविद्यापीठाने दिली. आपल्या संस्कृतीत *वड हे ब्रह्मदेवाचे, पिंपळ हे भगवान श्री विष्णूंचे तर औदुंबर हे भगवान श्रीशिवाचे प्रतिक आहे.* या वृक्षाची सेवा केली असता इच्छित मनोकामना पूर्ण होते अशी परंपरा आहे.

क) निर्वैर भूमी- या भूमीत भक्तांनी अनेकवेळा नैसर्गिक हाडवैरी असणारे साप आणि मुंगूस एकत्र पाहिले आहेत. ही भूमी निर्वैर असून क्षेत्र होण्यास योग्य असल्याचा हा कौल आहे. श्रीदत्तात्रेय निवासात प्रवेश केल्यावर उजव्या प्रवेशद्वारावर श्रीपादश्रीवल्लभांचे सुरेख छायाचित्र रेखाटलेले असून श्रीगुरुंसमोर एका बाजूने नाग व दुस-या बाजूने मुंगूस हे नैसर्गिक हाडवैरू गुरुचरणांशी एकत्र आलेले दर्शविले आहे. याचाच अर्थ गुरुकार्य करताना आपले वैयक्तिक स्वार्थ, शत्रुत्त्व, द्वेषादि भावना जर विसरण्यात आपण यशस्वी झालो *तरच* श्रीगुरु भेटतील, असा त्याचा अर्थ असू शकेल. या आधी श्रीमद्आद्य श्रीशंकराचार्यांना श्रृंगेरीचा मठ स्थापन करताना अशाच निर्वैर भूमीचा प्रत्यय आला होता.

ड) परमपूज्य श्री गुरुदेवांची आत्मज्योत (शक्ती)- आपले अवतार कार्य पूर्णत्वाला गेल्यावर परमपूज्य सद्गुरुंनी आपला देह विसर्जित केला तेव्हा आपली *आत्मज्योत* ही श्री दत्तात्रेय निवासात ठेवली आहे. (संदर्भ- जुनी गुरुवाणी प्रस्तावना) परमपूज्य श्री गुरुदेवांच्या खडतर तपश्चर्येने या स्थानात निर्माण झालेले चैतन्य या स्थानात शरणागत भावनेने येणा-या प्रत्येकाच्या अनुभवास येते.

इ) कडक पावित्र्य व त्रिकाल पूजा- श्री दत्तात्रेय निवासातील सर्वच देव हे परमपूज्य श्री गुरुदेवांच्या घराण्यातील देव असून केवळ दयेपोटी जवळ केलेल्या भक्तांच्या कल्याणासाठी, सर्वांना अध्यात्मिक आधार प्राप्त तसेच गुरुकार्य करताना सर्वांनाच शक्तीप्राप्त व्हावी या उद्देशाने त्यांची श्री दत्तात्रेय निवासात प्रतिष्ठापना केली आहे. या स्थानाचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी परमपूज्य *श्री गुरुदेवांच्या घराण्यातील लोक* शास्त्रोक्त सर्व कडक आचार, आहार, आणि विहाराचे बंधन पाळून परमपूज्य श्री गुरुदेवांनी घालून दिलेल्या शिस्तीत रोजची त्रिकाल पूजा-अर्चा आणि सणवार-उत्सवादी सर्व विधी कोठेही ऋतू-काल आणि वेळेची पर्वा न करता सांभाळत आहेत. यामुळेच परमपूज्य श्री गुरुदेवांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची प्रचिती चैतन्यरुपाने आजही अनुभवास येते.

*दत्तात्रेय निवास हे केवळ देवस्थान नसून जणू एक शक्तीपीठ आहे. या स्थानातून अधिकाधिक ज्ञानी व्यक्ती निर्माण होवोत अशी माझी इच्छा आहे. व्यवहार हा स्वतंत्र विषय आहे, पण धर्म ही मूलतःच अंतर्गत बाब आहे. धर्मपालनाने मनुष्याची उन्नती होते हे अनुभवाने पटावे यासाठी या स्थानाची निर्मिती झाली आहे.
ज्या ठिकाणी मूर्ती असते त्याला देवस्थान म्हणतात.पण ज्या ठिकाणी ईश्वराचे चिह्न असते त्याला क्षेत्र म्हणतात. आमचे परमपाद श्रीगुरु यांच्या पावलांचे चिह्न दत्तात्रेय निवासात उमटलेले आहे म्हणून दत्तात्रेय निवास हे क्षेत्रच आहे.
आपल्या आश्रमात श्रीगुरुंचे चिंतामणी चरण उमटलेले आहेत हा चमत्कार नसून वस्तूस्थिती आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्रीगुरूंनी आपल्या आश्रमात या चरणांच्या रुपाने वास्तव्य केले आहे कि ज्याप्रमाणे नृसिंहवाडी आणि श्री क्षेत्र गाणगापूर येथे श्री गुरूंनी स्वहस्ते पादुका स्थापन केल्या आहेत आणि त्या रुपात भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तेथे वास्तव्य करून आहेत. त्याचा दुसरा अर्थ असा आहे कि श्रीगुरूंचे चरित्र आजमितीपर्यंत चालू आहे.
या स्थानाचा मोठा विस्तार होणार आहे आणि तो विस्तार झपाट्याने होणार आहे म्हणून आम्ही सत्संगाला परवानगी दिली आहे आणि आम्ही आशीर्वादही पाठवतो. यातूनच जबाबदार माणसे तयार झाली पाहिजेत. कालांतराने या सत्संगाचे स्वरूपसुद्धा पंथासारखे होईल. पंथ याचा अर्थ समाज असा घ्यायला हरकत नाही.*

- परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज



।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy