।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।
(अश्विन वद्य १३ ते कार्तिक शुद्ध २)
दीपावलीचा उत्सव अश्विन वद्य १३ पासून म्हणजेच धनत्रयोदशीपासून सुरु होतो व कार्तिक
शुद्ध द्वितीया म्हणजेच यमद्वितीया (किंवा भाऊबीज) ह्या दिवसापर्यंत चालतो. धनत्रयोदशीपासून
यमद्वितीयेपर्यंत खरे म्हणजे ५ तिथी येतात. परंतु त्यातल्या काही तिथींचा लोप होतो,
तर कधी एकाच दिवशी दोन तिथ्या लागतात, असे दरवर्षी होत असल्यामुळे दीपावलीचा हा उत्सव
प्रत्यक्षात ५ दिवस कधीच करायला मिळत नाही, तो ३ किंवा ४ दिवसच उपभोगायला मिळतो.
पावसाळा संपून नवीन पिके हाती आलेली असतात आणि आल्हाददायक शरद ऋतूचे आगमन झालेले असते,
अशा वेळी ह्या शरद ऋतूच्या मध्यावर हा सण येतो. आश्विन महिन्याच्या सुरुवातीला नवरात्रोत्सवापासूनच
आनंद साजरा करायला सुरुवात झालेली असते. त्या आनंदाचा अत्युच्च बिंदू म्हणजे हा दिवाळीचा
उत्सव असे म्हणायला हरकत नाही.
काहींच्या मते प्रभू रामचंद्र, सीता व लक्ष्मण ही तिघेजण वनवास संपवून अयोध्येला आली
ती ह्याच सुमाराला; त्यामुळे अयोध्येतील लोकांनी जो दीपोत्सव साजरा केला तोच पुढे दीपावलीचा
उत्सव म्हणून रूढ झाला. अश्विन महिन्याच्या कोजागिरी पौर्णिमेपासून तो कार्तिक महिन्याच्या
त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत पितरांना प्रकाश व आनंद देण्यासाठी आकाशकंदील टांगले जावेत
असा शास्त्रादेश आहे.
१) दिवाळीच्या वेळी घरी आणि भोवती दिवे लावून प्रकाश उजळविला जातो. तसेच फटाके उडवूनही
अग्नी प्रज्वलित होतो. धुराखेरीज अग्नी नसतो. अग्नी धुराला मागे सारून प्रज्वलित होतो.
म्हणजेच तेजाची पूजा होते. हा प्रकाश म्हणजे चैतन्य. एकमेकांच्या हृदयातही ते फैलावते.
वातावरण आनंदी होते. म्हणजेच तेजाची पूजा होते. शिवाय फटाक्यांच्या धुराने सृष्टीतील
अनावश्यक व अपायकारक जीवजंतूंचा नाश होतो. फटके जरुर उडवावेत पण अतिरेक करू नये.
२) या दिवशी घरासमोर शेणाचा सडा टाकून रांगोळ्या घातल्या जातात. पृथ्वीच्या पृष्ठावर
अशाप्रकारे सजावट करून पूजन केले जाते.
३) घरालाही विविध प्रकारच्या फुलांनी सुशोभित करून घर स्वच्छ करून रंगरंगोटी करून एकप्रकारे
वास्तू पूजाही केली जाते.
४) या दिवाळीच्या दिवसात गोवत्सद्वादशी, गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन
(अमावस्या), बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे दिवस महत्वाचे मानले जातात.
*गोवत्सद्वादशी*- या दिवशी गोमातेची वत्सासहित पूजा केली जाते. तिला
हार घालून गोड पदार्थ खायला घालून औक्षण केले जाते. गायीला आपण अतिशय पवित्र मानतो.
ती आपणास अन्न देते. तिच्या पोटामध्ये ३३ कोटी देव आहेत अशी आपली श्रद्धा आहे. याचाच
अर्थ ती सात्विक असून मानवास कल्याणकारी आहे . तिचे दूध, तूप, दही, गोमुत्र आणि गोमय
हे आरोग्यदृष्ट्या मानवास कल्याणकारी आहे. तिच्या शेणाचा सडा दारासमोर टाकला तर त्या
वासाने नाग सापासारखे भयंकर प्राणी घरात येत नाहीत. गायीच्या गोवरीचा धूर केला की,
डासांसारखे किडे नष्ट होतात. गायीच्या शेणावर तूप टाकून धूप घालून धूर केला तर दुष्ट
शक्ती नाहीशी होते. अयोग्य ठिकाणी अशुभ जागेत गाय राहतच नाही. तिला साधू (सात्विक प्रवृत्तीची)
माणसे लगेच कळतात. तसेच गाय जी जमीन हुंगेल ती जमीन वसुंधरा होण्याच्या प्रतीची असते.
गायीला गोग्रास घातला तर घराण्याचे दोष नाहीसे होतात. अशा मानवी जीवाला उपकारक असलेल्या
गायीचे हार घालून पूजन केले जाते. मिष्टान्न खाऊ घालून सवत्स औक्षण केले जाते.
*गुरुद्वादशी*- याचं दिवशी दत्तात्रेय अवतारातील श्रीपाद श्रीवल्लभ
स्वामी गुप्त झाले तो दिवस गुरुपूजन, गुरुचिंतन, स्मरण, दर्शन अशा अनेक मार्गांनी गुरूंच्या
विषयी आपला भाव व्यक्त करण्याचा दिवस आहे.
*धनत्रयोदशी*- धनतेरस
अ) यमदीप पूजन - या दिवशी प्रदोष काळी दक्षिणेकडे तोंड करून घराबाहेर
दीप लावला जातो. हळद घालून कणिक माळून दिवा केला जातो व तिळाच्या तेलाचा हा दिवा दक्षिणेकडे
तोंड करून लावला जातो. या दिव्याचे यमरूप समजून पूजन केले जाते. यावेळी घराण्यातील
अपमृत्यू टाळावेत म्हणून यम देवाकडे प्रार्थना केली जाते. एरव्ही आपण दक्षिणेकडे तोंड
करून दिवा लावणे निषिद्ध समजतो पण या दिवशी खास यमासाठी दक्षिणेकडे दिवा लावला जातो.
ब) धन्वंतरी जयंती - देवांचे वैद्य “धन्वंतरी”
ह्यांच्या सन्मानार्थ ही तिथी साजरी केली जाते. देवांनी आणि दानवांनी जेव्हा समुद्रमंथन
केले तेव्हा त्यातून निघालेल्या अमृताचा कुंभ घेऊन प्रथम धन्वंतरी बाहेर आले. स्वतः
धन्वंतरी हे सुद्धा समुद्रमंथनातून बाहेर आलेले रत्नच होते. धन्वंतरींनी आयुर्वेद सांगितला.
अखिल भारताचे वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात व त्याच्या गौरवार्थ उत्सव
साजरा करतात.
*धनपूजन*- व्यापारी लोक ह्या दिवसाला “धनतेरस”
असे म्हणतात. दुकानांची, तसेच घराची साफसफाई, दिवाळीची खरेदी, घराची किंवा दुकानांची
सजावट, ह्या गोष्टी ह्या दिवसापासून सुरु होतात.
*नरकचतुर्दशी*- सामान्य लोकांच्या दृष्टीने दिवाळीची खरी सुरुवात
ह्या दिवशीच होते. लोक भल्या पहाटे उठतात, दिव्यांचा झगमगत करतात, सुगंधी उटणे अंगाला
लावून स्नान करतात व स्नान करताना पायाखाली कारीन्टे चिरडून, आपण नरकासुरालाच पायाखाली
चिरडले आहे असे मानतात. फटाके वाजवून, दिवाळीचे विविध पदार्थ खाऊन हा दिवस साजरा करतात.
श्रीकृष्णाकडे जेव्हा नरकासुराविषयी अनेकदा तक्रारी आल्या. तेव्हा त्याने नरकासुराचा
वध करण्याचा निश्चय केला. त्याने नरकासुराचा वध करण्यासाठी आपली पत्नी सत्यभामा हिला
घेतले व तिच्या हातून अश्विन वद्य चतुर्दशीच्या पहाटे नरकासुराचा वध केला. मरताना नरकासुराने
वर मागून घेतला की, “या दिवशी सर्वांनी पहाटे मंगलस्नाने करावी व हा दिवस
दिवे लावून साजरा करावा.” कृष्णाने “तथास्तु”
म्हटले व तेव्हापासून दिवे लावून दिवस साजरा करण्याची प्रथा पडली.
*लक्ष्मीपूजन* (अमावस्या)- आश्विन अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजनाचा
कार्यक्रम असतो. व्यापारी लोक आपल्या दुकानातील जमाखर्चाच्या व देण्याघेण्याच्या वह्यांची
पूजा करतात. घरोघरी लक्ष्मीची पूजा व प्रार्थना केली जाते.
वामनाने बळीराजाला पाताळात गाडून लक्ष्मीची सुटका ह्या अमावास्येच्या दिवशी केली, म्हणून
लक्ष्मीच्या सुटकेचा आनंदोत्सव ह्या दिवशी साजरा केला जातो.
*बलिप्रतिपदा* (पाडवा)- ह्या दिवशी विक्रम-संवत सुरु होतो.
म्हणून ह्या दिवसालादेखील नववर्षाची सुरुवात करण्याची प्रथा आहे. व्यापारी
लोक ह्या दिवसापासून आपल्या नवीन व्यापारी वर्षाची सुरुवात करतात व नवीन जमाखर्चाच्या
वह्या नववर्षासाठी उघडतात. अत्यंत पवित्र मानलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक आहे.
मुलीच्या लग्नानंतर येणारी पहिलीच दिवाळी असेल तर, जावयाचा सन्मान करण्यासाठी व त्याच्या
जवळच्या नातेवाईकांनाही प्रसन्न करण्यासाठी मुलीचे वडील ह्या दिवशी जावयाचा दिवाळसण
साजरा करतात आणि जावई व त्यांचे जवळचे नातेवाईक यांना जेवायला बोलावून त्यांना भेटवस्तू
देतात. ह्या दिवशी पत्नीने पतीला ओवाळायचीदेखील प्रथा आहे. तिच्या ओवाळणीत पतीने तिला
प्रिय असलेली वस्तू टाकावी व परस्परांचे प्रेम वृद्धिंगत व्हावे अशी ह्या ओवाळण्यामागे
अपेक्षा असते.
बळी राजाला वामनाने पाताळात गाडले, परंतु त्याच्या दानशूरपणावर वामन (म्हणजेच विष्णू)
इतके प्रसन्न झाले की ते बळीला म्हणाले- “तुझा अलौकिक दानशूरपणा पाहून मी
अतिशय प्रसन्न झालो आहे. मी तुला पाताळाचे राज्य देतो व तुझी सेवा करण्यासाठी मी स्वतः
तुझ्या महालाचा द्वारपाल होतो. एवढेच नव्हे, तर लोक आजच्या ह्या दिवसाचे तुझ्या नावाने
स्मरण करतील व त्याला बलिप्रतिपदा असे म्हणतील.” तेव्हापासून हा
दिवस “बलिप्रतिपदा” ह्या नावाने साजरा होऊ लागला.
*यमद्वितीया* (भाऊबीज)- ह्या दिवशी बहिण भावाला ओवाळते व भाऊ तिच्या
ओवाळणीत भाऊबीज म्हणून काही पैसे किंवा तिला आवडणारी भेटवस्तू ठेवतो. ह्या दिवशी भावाने
आपल्या घरी पत्नीच्या हातचे न जेवता बहिणीच्या घरी जेवले पाहिजे, असा शास्त्रादेश आहे.
यमीचे बंधुप्रेम सूचित करण्यासाठी भाऊबीज साजरी करण्याची प्रथा पडली. आपलाभाऊ यमपाशातून
वाचावा ही ह्या दिवशी प्रत्येक बहिणीची मनोमन प्रार्थना असते. यमुना नदीत ह्या दिवशी
स्नान करणे अत्यंत पवित्र समजतात. भाऊ नसल्यास चंद्राला भाऊ मानून त्याला ओवाळण्याची
प्रथा आहे. दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने घरात नवीन वस्तू येतात, घरातील माणसांच्या
अंगावर नवीन कपडे वा अलंकार चढतात, गोडधोड खायला मिळते, नातेवाईकांच्या भेटीगाठी होतात
आणि जीवनात एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होते.
*त्रिपुरारी पौर्णिमा* (कार्तिक पौर्णिमा)- दिवाळीनंतर थोड्याच दिवसांनी
येणारी ही पौर्णिमा. ह्या दिवशी घरत व देवळातही दिव्यांचा झगमगाट केला जात असल्यामुळे
काही लोक ह्या दिवसाला “मोठी दिवाळी” असेही म्हणतात.
स्त्रिया ह्या दिवशी नदीच्या पाण्यात दिवे सोडतात, दिवे दान म्हणून देतात, तसेच कोहळ्याचेही
दान करतात. “त्रि+पुर” म्हणजे तीन नगरे; त्यांच्यावर
राज्य करणाऱ्या राक्षसाचा वध ह्या पौर्णिमेच्या दिवशी झाला, म्हणून ह्या दिवसाला
“त्रिपुरी पौर्णिमा” असे नाव पडले. शंकराचा मुलगा “स्कंद”
ह्याचा ह्या दिवशी जन्म झाला, म्हणून त्याचा वाढदिवस म्हणूनही त्रिपुरी पौर्णिमेचा
दिवस साजरा करतात. दक्षिण भारतात त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवाला “कृत्तिका”
असेही म्हणतात.