धृतिः क्षमा दमोSस्तेयं शौचं इन्द्रियनिग्रहः |
धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम् ||
म्हणजेच धैर्य, क्षमा, संयम, चोरी न करणे, पावित्र्य, इंदियांवर ताबा, बुद्धिमत्ता,
विद्या, सत्य आणि क्रोध न करणे ही धर्माची दहा लक्षणे आहेत असे
मनुस्मृती सांगते. सध्याचा काळ हा कलीचा आणि त्याच्या गोंधळाचा
काळ आहे. नित्याने होणारी तांत्रिक प्रगती मानवाचे जीवन सुखकर तर बनवते पण ते हितकर
राहिलेले नाही. म्हणजेच सर्व भौतिक सुविधा असून देखील मनुष्य मानसिक सुखाला वंचित झाला
आहे. याचं एकमेव कारण म्हणजे धर्माचरणाचा अभाव होय.
पाश्चात्य शिक्षण पद्धती आणि संस्कृतीच्या प्रभावाने धर्म म्हणजे नेमकं काय या बाबत
नेहमीच संभ्रम मनात चाललेला दिसतो. परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी धर्माची
अगदी सोप्पी व्याख्या सांगितली- धर्म हा धृ या धातूपासून निर्माण झालेला आहे. धृ
म्हणजे धारण करणं धर्म म्हणजे चांगले विचार धारण
करणे व ते प्रत्यक्षात आचरणात आणणे. ज्या विचारांनी आपला अभ्युदय
होईल तो धर्म व ज्या विचारांनी आपला उत्कर्ष होणार नाही तो अधर्म होय.
धर्म जास्ती वाढावा म्हणून धर्मध्वज फडकवावा. द्वारका हे धर्माचे उत्तम ठिकाण आहे.
धर्म वाढावा, ध्वजाकडे पाहून धर्माची आठवण व्हावी या हेतूने श्री दत्तदेवस्थानाच्या
वास्तूवर धर्मध्वज फडकवण्यात आलेला आहे. तो द्वारकेहून
मुद्दाम आणलेला आहे. वेदकार्य हे धर्मकार्यच आहे आणि हा धर्मध्वज फडकावणं म्हणजेच धर्मकार्याचा
आरंभ होणं.
श्री दत्तदेवस्थानावरील धर्मध्वजा एकसंध आहे. ती चंद्र, सूर्य तसेच स्वस्तीकाने युक्त
आहे. स्वस्तिक हे सुदर्शनचक्राचे प्रतिक आहे. अनेक्त्वाकडून एकत्वाकडे नेणारी असल्याने
ती त्रिकोणी आहे. भोगाकडून त्यागाकडे नेणारा तिचा वर्ण आहे. ध्वजाचा आकार हे हिंदू
धर्माचे प्रतिक आहे. ज्यामुळे त्रिशूळासारखी अवस्था उत्पन्न होते. त्रिशूळ हे तिन्ही
लोकांसाठी आहे. तिन्ही लोकांना आधार मिळावा या उद्देशाने हा ध्वज केलेला आहे. ह्याला
भगवद्ध्वज असेही म्हणतात. भगवा किंवा भगवी हा त्याचा अपभ्रंश आहे. तो मुळात भगवंताचा
ध्वज असल्याने धर्मक्षेत्रात जास्ती महत्व आहे. धर्माच ज्ञान व्हावं, धर्माचा विस्तार
व्हावा, धर्माची सतत आठवण राहावी या उद्देशाने हा धर्मध्वज या ठिकाणी फडकवण्यात आला
आहे. आपला धर्मध्वज हा सदैव फडकत राहिला पाहिजे.
।। श्री गुरुदेव दत्त ।।