श्री गणेश हे आपले आराध्य दैवत आहे. प्रत्येक कार्यास आरंभ करताना आपण प्रथम ‘श्री गणेशाचे’
स्मरण करतो. प. पू. श्री. रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामीं यांनी श्री गणेश यांचे
स्वरूप, प्रतिष्ठापना, आराधना याविषयी मार्गदर्शन केले आहे.
"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ॥
निर्विघ्नम्कुरूमेदेव सर्वकार्येषुसर्वदा” ॥
" श्री गणेश स्वरूप "
आपल्याकडे श्री गणेशाला
फार मोठा मान आहे. प्रत्येक कार्यात त्याची स्थापना प्रथम करीत असतो. भाद्रपद महिन्यात
श्री महाविष्णूंनी गणपतीचे रूप धारण करून सिंदुरासूर दैत्याचा वध केला. त्यामुळे गणपतीला
विष्णूरूपही मानलेले आहे. गणेश उपासना ही विष्णूउपासना आहे. गणपती हा देव, मनुष्य व
राक्षसगणांचा अधिपती आहे.
हत्ती हा हुषार प्राणी आहे म्हणून गणपतीला त्याचे मुख बसवलेले आहे.
घ्राणेंद्रिये अतिशय तीक्ष्ण असतात. गजमुख हे शक्तीचे स्वरूप दाखवते, सोंड हे शक्तीचे इंद्रिय
असल्याने सूक्ष्म अथवा अवजड वस्तू उचलणे व कोणते कार्य केव्हा करायचे ह्याचा विवेकही त्याला
असतो. कर्ण सुपासारखे मोठे असतात, त्यांना शूर्पकर्ण म्हणतात. शूर्पकर्ण व बारीक डोळे हे बुद्धिमत्तेचे
लक्षण आहे.
पुराणात असे सांगितले आहे, की सिंदुरवदन राक्षसाने पार्वतीच्या गर्भात जाऊन
बाळाचे छेदन केले. प्रसूतीनंतर बिनडोक्याचे बाळ अतिशय विद्रूप दिसू लागले. श्री शंकरांने हत्तीचे डोके कापून
या बाळाला चिकटवले म्हणून त्याला गजवदन म्हणतात. बुद्धिमत्ता, शांतताप्रियता, एकाग्रता,
त्रीव्र ग्रहणशक्ती व सामर्थ्य असलेले हे गणपतीचे गजस्वरूप आहे.
गणेशाच्या प्रत्येक हातातील
निरनिराळ्या वस्तूधारण करण्यामागे निरनिराळा उद्देश आहे. हातातील मोदक स्वतः खाण्यासाठी
नसून दुसऱ्याला देण्यासाठी आहे, अकुंश धर्माविरूद्ध वागणाऱ्याला शिक्षा करण्यासाठी
आहे, परशूधर्माला अनुसरून वागणाऱ्याचे रक्षणार्थ आहे तर एक हात आशीर्वाद देणारा आहे.
त्याचे उदर मोठे असते कारण शरणागतांचे अपराध तो पोटात घालतो. क्षमा करण्याची, दया दाखवण्याची,
मायाममता करण्याची वृत्ती उदरातून जन्म घेते. म्हणून श्री गणेशाला सुखकर्ता, दुःखहर्ता
व विघ्नहर्ता संबोधले जाते.
" श्री गणेश मूर्ती "
श्री गणेशाची मूर्ती बहुतेक सर्वांच्या
देवघरात असते परंतु भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला पूजावयाची मूर्ती पार्थिव असावी
व तिचे विसर्जन करावे. श्री गणेश ही मंगलमूर्ती आहे. ती प्रसन्न चेहऱ्याची असावी. गणपतीचे रूप
दर्शनीय असावे, त्यात कोणताही ओंगळपणा नसावा. तिचे रूप खाणारी मूर्ती असे दाखवले जाते, ते योग्य
नाही. मूर्ती उभी नसून नेहमी पद्मासन घातलेली असावी. मूर्तीचा आकार खाली बसून पूजा
करता येईल एवढाच असावा. मणी, मोती, साबुदाणा, शेंगदाणे, रूद्राक्ष यापासून बनवलेली
मूर्ती घरात ठेवू नये. नर्तन करणारी, खाली पाय सोडलेली, पशुपक्ष्यांवर बसलेली मूर्ती
असू नये. मूर्तीच्या हातात आयुधे कमी असावी, म्हणजे ती 'विघ्नहर्ता' मूर्ती असते. मूर्तीच्या
एका उजव्या हातात परशू तर दुसरा उजवा हात आशीर्वाद देणारा असावा, एका डाव्या हातात पाशांकुश
तर दुसऱ्या हातात मोदक असावा. मूर्ती डाव्या सोंडेची असून दृष्टी नासिग्राकडे असावी.
मस्तकावर टोप असावा व गळ्यात जानवे असावे. रोज सकाळ, संध्याकाळ आरती म्हणावी व देवाला
गोडाचा नैवेद्य दाखवावा. घरातील वातावरण मंगलमय असावे.
कुटुंब विभक्त झाल्यावर प्रत्येकाच्या
घरी पूजेत गणपतीची वेगळी मूर्ती नित्य पूजेकरीता असावी. मूर्तीमध्ये चैतन्य आपल्या शुद्ध
संस्कारांनी निर्माण होते व ती मूर्ती प्रभावी होऊ शकते. मूर्ती स्थापन केल्यानंतर आपण
आपले आचरण किती शुद्ध ठेवतो व किती एकाग्रतेने देवाची सेवा करतो यालाही महत्त्व आहे.
"प्रतिष्ठापना श्रीगणेशाची"
गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना जमिनीपासून वर करावी. मूर्ती
कधीही खोलगट भागात ठेऊ नये. गणपतीचे आसन उच्च असून आसनावर ठेवण्यापूर्वी खाली तांदूळ
पसरावेत.
मुर्तीची प्रतिष्ठापना दहा वर्षाच्या आतील लहान मुलाकडून करून घ्यावी; कारण
त्यांचे मन निरागस व निर्विकार असुन मनाला विषयाचा स्पर्श झालेला नसतो. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना
करताना त्या व्यक्तीचे विचार त्यात सामावले जातात. मोठ्या माणसाने प्राणप्रतिष्ठापना केली
तर त्याचे मन आनंदी ठेवावे. मनात चांगले विचार ठेवावेत. विचार चांगले असतील तर घरात मांगल्य
निर्माण होते. सेवा फलदायी होते. ब्राह्मणांना बोलावून मंत्रोच्चाराद्वारेच व्यवस्थित
प्राणप्रतिष्ठापना करावी. ध्वनिफित लावू नये; कारण त्यात फक्त आवाज असतो, मंत्रसामर्थ्य
नसते.
गणपती आपला अतिथी असल्याने त्यांना "यथा देहे तथा देवे" हे जाणून उत्तम प्रकारची
फळे, सुवासिक व लाल फुले, दुर्वा अर्पण कराव्या. दुर्वांची जुडी डोक्यावर न ठेवता एक
एक दुर्वा चरणांजवळ वाहताना 'ॐ गंगणपतयेनमः' असे म्हणावे. दुर्वा थंड असुन पित्तहरण
करण्याऱ्या आहेत. ह्या उत्सवाच्या दिवसांत एकदा तरी एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा.
मोदक हे आनंदाचे प्रतिक मानले आहे. मोद म्हणजे आनंद. मोदकात भरलेले सारण गुळ-खोबरयाचे असते;
हे दोन्हीही पदार्थ गुणकारी आहेत. जे जे आपल्याला लागते, ते त्याला अर्पण करावे.
अशा रीतीने योग्य
प्रतिष्ठापना, पूजा, प्रार्थना, उपासना केल्याने त्यांचे चांगले फळ मिळते.
"श्री गणेशाची आराधना "
पंचायतन पूजेत गणपती ही प्रधान देवता मानलेली आहे. ही देवता संकट निवारणार्थ
व ज्ञान देण्याकरीता उत्पन्न झालेली आहे. ज्ञानाद्वारे मनात धैर्य व आत्मविश्वास निर्माण
करणे म्हणजे संकट निवारण होय. कित्येक कुटुंबाची गणपती हे कुलदैवत आहे, त्यांनी तर त्याची
उपासना करावीच पण इतरांनी ही गणेशाची उपासना करून त्यांना प्रसन्न करून घ्यावे.
गणपती ही बुद्धीची देवता आहे. तिच्या उपासनेचे नियम फार कडक आहेत व ते पाळणे आवश्यकही आहे. आहारावर
नियंत्रण असावे; मद्य, मांस वगैरे संपूर्ण वर्ज करावे. आपले आचरण शुद्ध असावे.
आपल्या देवघरात नर्मदेतील स्वयंभूगणपती पूजेत असल्यास त्यावर शक्य असेल तर रोज व शक्य नसल्यास
संकष्टीला दुधाचा अभिषेक व्हायला पाहिजे. गणपतीची आराधना केल्याने वाणीला वक्तृत्व येते.
गणपतीच्या आराधनेसाठी अथर्वशीर्षाची आवर्तने करतात. अथर्वशीर्ष म्हणताना देवाच्या मूर्ती वरच
अभिषेक व्हायला पाहिजे. अथर्व म्हणजे शांत व शीर्ष म्हणजे डोके. अथर्वशीर्ष हा वेदमंत्र
आहे. त्याचे उच्चारण व्यवस्थित झाले पाहिजे. कित्येक लोकांना पूजेसाठी व अथर्वशीर्ष म्हणण्यास
वेळ नसतो म्हणून ते स्वतः स्नान करताना अंगावर पाणी घेत अथर्वशीर्ष म्हणतात; म्हणजे स्वतःच
स्वतःला अभिषेक घेतल्यासारखेव गणपतीची मूर्ती राहते बाजूला, हे काही योग्य नाही. तसेच
ओलेत्याने अथर्वशीर्ष म्हणू नये. आजकाल घरोघरी सहस्त्रावर्तने करण्यात येतात पण उच्चारण
व आचरण याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे संकटे ओढवली जातात. ईप्सित फळ मिळण्यासाठी आचरण
महत्वाचे असते; म्हणून योग्य ब्राह्मणांकडून त्यांचे उच्चारण करून घ्यावे.
गणपती राहूची देवता आहे. ज्यांना राहूची पीडा आहे त्यांनी गणेश उपासना अवश्य करावी. राहूचा दोष पिढ्यांनपिढ्या
चालू राहातो, तो लवकर संपत नाही. हा घराण्याचादोष असतो व तो कुडंली पाहिल्यावर लगेच
लक्षात येतो. अपत्य न होणे, विकलांग होणे, अपत्य न जगणे, स्त्री गरोदर असतानाच गर्भ
गळून पडणे हे सर्व राहूचे दोष आहेत. यासाठी गणपतीची उपासना अवश्य करावी.
"श्री गणेश मूर्तीचे विसर्जन"
गणेशोत्सवात गणपतीचे आवाहन दहा दिवसापुरतेच मर्यादित असावे. दहा दिवस तिला व्यवस्थित
सांभाळून गणरायांना निरोप देणे आवश्यक असते.
मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करते वेळी पूजेचा
ठराविक कालावधी सांगितला जातो; त्यामुळे त्या कालावधीनंतर प्राणप्रतिष्ठा आपोआपच तेथून
निघून जाते. म्हणूनच आपण अशा मूर्तींचे पाण्यात विसर्जन करीत असतो.
काही घराण्यांत
मागच्या वर्षीचा गणपती या वर्षी तर या वर्षीचा पुढील वर्षी विसर्जित करतात. ही प्रथा
चूकीची आहे. दहा दिवसांनंतर पार्थिव गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करावे. घरात गणेशोत्सव
चालू असताना एखादी स्त्री गरोदर असेल तो प्रसूत होईपर्यंत गणेशाचे विसर्जन करू नये. प्रसूतीनंतर
वृद्धी संपली की लगेच विसर्जन करावे.
मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी, त्यांच्याजवळ त्यांनी
जी सेवा आपल्याकडून करून घेतली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, तसेच आपल्याकडून कळत
नकळत काही चुका झाल्या असल्यास त्यांची मनःपूर्वक क्षमा मागावी. त्यांच्या बरोबर शिदोरी
देऊन त्यांना 'पुनरागमनायच' अशी विनंती करून धीरगंभीर वातावरणात निरोप द्यावा. गणरायांचे आगमन
होताना आपण आनंदाने गुलाल उधळणे, नाचणे हे योग्य आहे. पण विसर्जनाच्या वेळी आपले नाचणे याचा
अर्थ जर गणरायांनी 'बरं झालं ब्याद गेली, असंया लोकांना वाटतंय', असा घेतला तर केवढा
अनर्थ होईल.
विसर्जनाआधी आरती करून खिरापत (खारीक, खडीसाखर, खिसमिस, खोबरेव खसखस) वाटतात.
तसेच अनंतचतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या वेळी मोदकांचा व पंचखाद्याच्या (डाळ,
चुरमुरे, खारीक, खोबरे, साखर) नैवेद्य दाखवून प्रार्थना करावी. त्यानंतर मूर्तीचे विसर्जन
करावे. नदीत किंवा विहीरीत मूर्ती तशीच न सोडता एखाद्या खोक्यात घालून हळूच पाण्यात
सोडावी. अशा रीतीने योग्य आचरणाने गणेशाचे पूजन व विसर्जन करावेतरच मनाला आनंद मिळेल.
संदर्भ रामकृष्ण उवाच पान क्रं. ३०४, १५२, १५३, १५४, १६४
।। श्री गुरुदेव दत्त ।।