आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा




|| गीतेचे महत्त्व ||


गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः ।
गुरु साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥


आधी मोबाईल मग, वॉटस् अप, फेसबूक, ट्विटर, हाईक इत्यादी अनेक संवादाची साधने आज बाजारात उपलब्ध आहेत. आपण कित्येक जण कदाचित् ह्याच माध्यमाद्वारे एकमेकांशी संवाद साधतो व माहितीची देवाण घेवाण करतो! म्हणजेच ही सर्व माहिती संप्रेषणाची साधने आहेत. अभाव आहे तो ज्ञानाचा! हे कसं शक्य आहे? असा प्रश्न मनात उपस्थित होणे साहजिक आहे. कारण आपण दररोज हजारो माहिती व संदेश ह्या सर्व संपर्क माध्यमांद्वारा एकमेकांना पाठवितो इतकी माहिती मिळते! तरी देखील ज्ञान होत नाही. म्हणण्याचे कारण सरळ आहे! आम्हाला ज्ञान आणि माहिती ह्यातील फरकच माहित नाही! आम्ही ज्ञानाला पर्यायी शब्द म्हणून माहिती हा शब्द वापरतो! परंतु हाच सर्वात मोठा भ्रम आहे आणि इथूनच मार्ग भरकटायला सुरुवात होते. उदाहरणच द्यायचं झालं तर कल्पना करा! यापूर्वी तुम्ही कधीही साखर खाल्ली नाही. तेव्हा साखर गोड आहे हे कुणीतरी केवळ सांगणं ही झाली "माहिती" अन् प्रत्यक्षात तुम्ही साखर खाऊन तिची गोडवी अनुभवणं हे झालं ज्ञान! हाच नियम सर्व क्षेत्रात लागू आहे! अध्यात्म मार्ग हा असाच साखरे सारखा आहे जो चाखून पाहतो त्यालाच त्याची गोडवी अनुभवास येते इतरांना नाही! म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या प्रारंभीच जेव्हा नमन केले तेव्हा अगदी पहिल्याच वाक्यात हे सूत्र स्पष्ट केलंय!


ॐ नमोजी आद्या| वेद प्रतिपाद्या|
जय जय स्वसंवेद्या| आत्मरुपा||


म्हणजेच अध्यात्म हा ज्याने त्याने अनुभवण्याचा विषय आहे. हे थोतांड आहे, असे म्हणण्याचा अधिकार कुणालाही नाही!
संवादातून ज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर केवळ गुरुशिष्य संवाद हाच ज्ञान करुन देणारा आहे इतर मात्र विसंवाद अथवा वाद वाढविणारे आहेत! गुरुशिष्य संवादातून अज्ञानाचा नाश होतो! भ्रम दूर होतात! अहंकार हळूहळू निवळू लागून लीनता येते! विद्या शुद्ध होते, प्रवाही बनते! विवेक जागृत होतो! सदाचरणाकडचा कल वाढतो! व या भासमान जगातील स्वतःच्या क्षणभंगूर अवस्थेची जाणीव होऊन ईश्वरचिंतनाकडे मन वळू लागते! वृत्ती सात्त्विक होऊन भोगातून त्यागाकडे वाटचाल सुरु होते! ही काही प्रमुख लक्षणे सुसंवादाची आहेत! आता थोडासा तटस्थ राहून विचार करा की आताची संपर्क माध्यमे यातील कोणत्या गोष्टी साध्य करुन देतात! याचे उत्तर स्वतः शोधलेले बरे!


आता ह्या सगळ्या प्रस्तावनेचा गीतेशी काय संबंध? आणि गीता ही तरुणपणीच का वाचावी? याचा कारण देखील गीता स्वतःच सांगते! गीतेचा प्रसंग सर्वज्ञात आहे! कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडवांचे धर्मयुद्ध सुरु होण्यापूर्वी कोणा कोणाशी युद्ध करायचे हे पाहण्यासाठी अर्जून भगवान श्रीकृष्णांना त्याचा रथ हा दोन्ही सेनांच्या मधोमध नेण्यास सांगतो. व समोर आपले आप्तेष्ट पाहून हातपाय गाळतो व हे युद्धच करायचे नाही म्हणून हातातील शस्त्रे टाकून देतो! ह्या प्रसंगाचा थोडा बारकाईने विचार केला तर गीता का सांगावी लागली ह्याचं नेमकं कारण लक्षात येईल! अर्जूनाचे हे पहिलेच युद्ध होते का? तर नाही! ह्या आधी त्याने अनेक युद्धे केली होती! अनेक रथी महारथी, राक्षसांना यमसदनी पाठविले होते! त्याच्या नातेवाईकांसोबत देखील त्याचे हे पहिले युद्ध नव्हते! या आधी देखील त्याने भीष्म, द्रोणादि गुरुश्रेष्ठांसोबत युद्ध करुन त्यांना पराभूत केले होते! विशेष म्हणजे या आधीच्या एकाही युद्धात भगवान श्रीकृष्ण त्याच्या सोबत नव्हते! म्हणजे या आधीही त्याने श्रीकृष्णाशिवाय आपला पराक्रम गाजविला होता! मग ह्याच युद्धाच्या वेळी असा कोणता प्रसंग निर्माण झाला ज्याने अर्जूनास त्याचे खुद्द अग्निदेवतेने दिलेले गांडीव धनुष्य खाली ठेवण्यास भाग पाडले? ज्याचा टणत्कार ऐकून हजारो योद्ध्यांच्या हृदयात धडकी भरत असे! पण प्रसंगच तसा होता! आताचे युद्ध हे निर्णायक युद्ध ठरणार होते! या युद्धात एकतर कौरव रहाणार होते किंवा पांडव! याला कारण एकच होते ते म्हणजे कर्तव्य आणि भावना यातील गल्लत! चित्तात उत्पन्न झालेला आप्तेष्टांबद्दलचा मोह! स्वतः एक त्रिभूवन विख्यात श्रेष्ठ धनुर्धर! खुद्द भगवान श्रीकृष्ण ज्याच्या पाठीशी नव्हे तर प्रत्येक संकटांना थोपविण्यासाठी त्रिलोकाचा भार घेऊन रथावर आरुढ झालेले! अग्निदेवतेने दिलेला दिव्य रथ तर चित्ररथ गंधर्वाने दिलेले अत्यंत वेगवान घोडे! व परम तेजस्वी गांडीव धनुष्य हाती असताना देखील अर्जूनाच्या चित्ताला विषाद झाला! मग आम्हा पामरांची काय कथा?


अचानक घडलेल्या घटनेने आम्ही विचलित होतो! नातेसंबंध जपण्यासाठी वा तथाकथित खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी आमच्या कडून अधर्माचरण होते! प्रापंचिक गोष्टींमधे धर्मसंकटांना सामोरे जातो! अशी एक ना अनेक युद्धे आमच्या मनाच्या रणांगणात सुरु असतात! म्हणून अर्जूनाला आम्ही आमचा प्रतिनिधी मानतो! कारण त्याला पडलेले प्रश्न हे आमचे देखील रोजचे प्रश्न असतात! अर्जूनाने श्रीकृष्णाशी संवाद साधला अन् अज्ञानाचा नाश करवून घेतला! पण आमचे काय? आम्ही जो व जशा प्रकारचा संवाद साधतो त्यातून अज्ञान खरंच नष्ट होते काय? आम्हाला जीवनात सद्गुरु भेटले आहेत काय? त्यांच्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष झालेल्या संवादातून माझे अज्ञान नष्ट होते आहे काय? याचे चिंतन जरुर व्हावे!

माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेतच ....! ...


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy