आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


"श्रीमद्भगवद्गीता वाचण्यापूर्वी "


|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||

यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः । 
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥ १८-७८ ॥

अर्थ
-*जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा पार्थ (अर्थात पृथापुत्र अर्जुन) आहे, तेथेच श्री, विजय, भूती आणि अचल नीती आहे, असे माझे मत आहे.*
(गीतेचा संदर्भ- महाभारताच्या १३ व्या भीष्मपर्वात अध्याय क्रमांक- २५ ते ४२ यामधे गीतेचे १८ अध्याय आले आहेत.)
*श्रीमद्भगवद्गीता* भारतीय अध्यात्मविद्येतील  नित्य नवीन अर्थातच *सनातन* असणारा ग्रंथ!! सनातन या अर्थाने की आजपर्यंत अनेकांनी गीतेचा अभ्यास केला ! भाष्य केले! टीका लिहिली! तरीही प्रत्येक वेळी प्रत्येकाला नवीन अर्थच प्रत्ययास येतो. गीतेमध्ये प्रामुख्याने ४ पात्र दिसतात. ज्याला विषाद झाल्यामुळे श्रीमद्भगवद्गीता भगवंतांनी सांगितली तो अर्जुन (८४श्लोक), स्वतः भगवंत (५७४श्लोक), संजय (४१ श्लोक) आणि *युद्धास कारण ठरलेला धृतराष्ट्र (१ श्लोक) ! * 
तरीही या गीतेची पार्श्वभूमी समजून घेताना/ गीतेचे वाचन करताना काही गोष्टी कदाचित लक्षात आल्या असतील वा नसतीलही त्या नमूद करणं महत्वाचं वाटतं!
१) अर्जुनाचे आभार- प्रचलित कादंब-या आणि दंतकथांनी अर्जुन नावाचं पात्र जितकं भित्र किंवा अन्यायी वगैरे रंगवलंय तितकं ते आजिबात नाही. कर्णाचं उदात्तीकरण करणा-या काही काल्पनिक कादंब-या अर्जुनाबद्दल व श्रीकृष्णाबद्दल नकारात्मक मतप्रवाह निर्माण करतात. पण तो कल्पनेचा भाग आहे तो इतिहास होऊ शकत नाही. 
*भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ* हेच गीता वारंवार सांगते. आणि आपण नेमके याच्या विरुद्ध वागतो म्हणून गीता लवकर पचनी पडत नाही. गीता ही सूर्य प्रकाशाइतकीच सत्य आहे. गीता समजण्यासाठी आधी अर्जुन समजून घ्यावा लागतो असं मला वाटतं!
अ) अर्जुन विषाद- *विषाद* म्हणजे दुःख़ ! असा मर्यादित अर्थ इथे घेता येत नाही! दुःख़ हे कोणत्यातरी गोष्टीच्या अपेक्षाभंगातून अथवा अपेक्षित वस्तु न मिळाल्याने होतं! अनेकवेळा एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा केली आणि ती मिळाली नाही की दुःख़ होतं. पण अर्जुनाचं जे दुःख आहे ते *कारुण्यातून* जन्माला आलेलं आहे. पांडवांकडे कृपा, अनुकंपा, करुणा, अनृशंसता, सरलता, क्षमा आणि सत्य हे पाच सद्गुण होते. 
त्याला दुःख़ ह्यासाठी झालं होतं की ह्या माझ्या आप्तेष्टांना मारुन रक्तरंजित ऐश्वर्याचा (जे नश्वर आहे त्याचा) काय फायदा! अर्थात् इथे तो स्वार्थासाठी नव्हे तर परहितासाठी दुःख़ करीत होता. स्वतःचं वाईट होऊ नये म्हणून झटणारे लोक पावलोपावली सापडतील पण इतरांचे वाईट होऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे किती असतील हे थोडंसं आपल्याच आजूबाजूला न्याहाळलं की चटकन लक्षात येतं. अर्जुन हा या परहितासाठी झटणा-या लोकांच्या गटातील आहे. म्हणून हे दुःख़ नसून हा विषाद आहे. आणि हाच विषाद गीतेला कारण ठरला.
ब) शिष्य भाव- अर्जुन व श्रीकृष्ण हे एकमेकांचे नातलग होते. पृथा म्हणजेच कुंती ही भगवान श्रीकृष्णांची आत्या! तसेच भगवान श्रीकृष्ण व अर्जुन हे एकमेकांचे घनिष्ठ मित्र देखील होते. हे इतकं सगळं असूनही त्यांच अजून एक नातं होतं ते म्हणजे गुरुशिष्याचं! माणसाचा *विवेक* जागृत असेल तर कसा फायदा होतो याच उदाहरण म्हणजे अर्जुन! त्यांच कितीही मित्रत्वाचं नातं असलं कितीही घनिष्ठ संबंध असले तरी भगवंत हे श्रीगुरुस्वरुप असल्याने त्या क्षणी अर्जुनाने 
*शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्‌ ॥ २-७ ॥* हा शिष्यभाव जर दाखवला नसता म्हणजेच जर तो त्या क्षणी मित्र किंवा नातेवाईक म्हणून वागला असता तर कदाचित भगवंतांनी गीता सांगितलीच नसती. त्यामुळे श्रीगुरुंसमोर शरणागताचा भावच उपयुक्त ठरतो. 
गीता हा केवळ श्रीकृष्णार्जुन संवाद नसून तो *श्रीगुरुशिष्यसंवाद* आहे. 
सांगायचं तात्पर्य हेच की अर्जुन हा आपल्या सर्वांचा प्रतिनिधी तर आहेच शिवाय आदर्शही असायला हवा!
२) भारत ही न्यायभूमी- भारतभूमी ही सर्व विश्वाकरिता पूर्वापार कुतूहलाची भूमी ठरली आहे. पृथ्वीवरील कोणत्याही भूभागापेक्षा वेगळं असणारं पावित्र्य! तिचा अध्यात्मिक वारसा! ज्ञानोपासना! आणि अद्यापही कुतूहलाची आणि अध्ययनाची विषय ठरलेली अनेक शास्त्रे. जगाचं एक आश्चर्य वाटतं! ज्या गोष्टीवर अंधश्रद्धा म्हणून सुरुवातीला टीका केली तेच आता शास्त्र म्हणून स्वीकारलंय! 
*भा* म्हणजे ज्ञान/ तेज आणि *रत* म्हणजे रमलेला! अर्थातच *जो ज्ञानोपासनेत/ तेजोपासनेत रमला आहे तो भारत! इथे अज्ञानाचा, अविद्येचा समूळ नाश करणारं ज्ञान मिळतं. त्यामुळे अवास्तव किंवा काल्पनिक गोष्टीला दुय्यम स्थान! तळहातावरील आवळ्याप्रमाणे लख्ख ज्ञान करुन देणारी ही जगातील एकमेव भूमी!
जशी ही तपोभूमी आहे! आर्षभूमी आहे तशीच ती न्यायभूमी आहे. आजपर्यंत अनेक राजसत्ता उदयास आल्या येथेच बलाढ़्य आणि काही उन्मत्त देखील झाल्या पण *धर्मसत्तेपुढे* यांना शरणागती पत्करावीच लागली. मग तो हिरण्यकश्यपू असो! रावण असो! कंस असो! जरासंध,शिशूपाल वा कौरवसेना असो!! या सर्वांना धर्मसत्तेपुढे नतमस्तक होणे भाग पडले आहे. 
याची दुसरी बाजू अशी की जो धर्माने वागतो त्याच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतः प्रत्यक्ष भगवंत घेत असल्याचा प्रत्यय हा इतिहासाने वेळोवेळी दिला आहे आणि या ही पुढे देत राहील. या लेखाच्या *सुरुवातीला* जो श्लोक आहे तो गीतेतील शेवटचा श्लोक आहे, व तो संजयाच्या मुखातून आलेला आहे. *ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत याचाच अर्थ जेथे त्यांचे अधिष्ठान ठेवून कार्याला आरंभ होतो, जेथे धनुर्धारी अर्जुन आहे म्हणजे ज्या ठिकाणी अर्जुनाच्या अंगी असलेली शरणागतवृत्ती, सत्य जाणून घेऊन ते आचरण्याची सिद्धता व शिष्यत्त्वाची भावना आहे त्याचठिकाणी श्री (सन्मार्गाने मिळालेले ऐश्वर्य), विजय, भूती (समृद्धी) आणि अचल नीती आहे.* 
प्रत्येक देशात गेल्यावर तेथे आचरणाचे काही नियम असतात. त्या देशात प्रवेश देण्याअगोदर त्या सर्व नियमांचे पालन करण्याची हमी आपल्याकडून सरकारी आज्ञापत्रावर लिहून घेतली जाते. तेथे जाऊन नियमांचे उल्लंघन झाले तर तेथील कायद्यांप्रमाणे शासन हे होतच असते. तद्वत् भारत ही एक न्यायभूमी आहे ! या भूमीत आचरणाचे काही नियम आहेत. जे वैश्विक स्तरांचे आणि सहिष्णू आहेत. त्याप्रमाणे आचरण करणा-याला ईश्वरी सहाय्य आणि ते नियम मोडणा-यास शासन हे होतच असते. विशेष म्हणजे योग्य कृतीला ईश्वरी सहाय्य आणि अयोग्य कृतीस शासन हे त्याच्याच चूकीच्या कृतीने होत असते. यात ईश्वरी शक्ती हस्तक्षेप कधीच करत नाही. 
व्यवहारातील उदाहरण द्यायचं झालं तर ट्रॅफिक सिग्नलवर लाल दिवा लागला असताना रस्ता ओलांडू नये असा नियम आहे, तो असूनसुद्धा ट्रॅफिक पोलिस हा आपल्या मदतीसाठी हातवारे करुन थांबण्यास सांगून आपला जीव तर वाचवतोच शिवाय नियम मोडण्यापासून परावृत्त करत असतो. पण सिग्नल तोडल्यावर मात्र हाच पोलिस पावतीपुस्तक घेऊन तुम्हाला दंड करण्यासाठी सज्ज असतो. 
या भूमीत आचरणाची जी आदर्श नियमावली आहे ती म्हणजे *श्रीमद्भगवद्गीता* 
श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन आणि चिंतन हे जीवनाच्या प्रवासास सुरुवात करतानाच (*तारुण्यातच*) वाचावेत, जीवनयात्रा संपत आल्यावर (*म्हातारपणी*) रहदारीचे नियम वाचून काय फायदा? 
श्रीमद्भगवद्गीतेवर आजवर अनेकांनी भाष्य केले आहे,तिच्याविषयी सखोल मार्गदर्शन केले आहे. इथे मी केवळ गीतावाचनाविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने प्रत्येक श्लोकाची माहिती देण्याचा अल्पसा प्रयत्न करणार आहे. श्रीगुरुकृपेने जे स्फुरेल ते मांडण्याचा प्रयत्न असेल! यातील ज्या त्रुटी असतील त्या माझ्या मानवी मर्यादेमुळे तर उदात्तता ही *श्रीगुरुकृपा* आहे!
।। श्रीरामकृष्णार्पणमस्तु ।।


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy