गुरु सान्निध्य
जीवनात बदल घडवून आणण्याचे काम मनातील शक्तीला शक्य होते. जर गुरूंचे सान्निध्य मिळाले
तर दुधात साखर मिसळल्यासारखे होईल. सर्वांना गुरुसान्निध्य प्राप्त होत नाही. ज्यांना
गुरुसान्निध्य प्राप्त होत नाही त्यांनी एकलव्यासारखे वागले पाहिजे. प्रत्येक मनुष्यात
अंगभूत शक्ती असते. तिचा त्यांना विकास करता आला पहिजे. गुरू द्रोणाचार्य यांच्याकडून
पांडवांना व कौरवांना धनुर्विद्या, शस्त्रविद्या शिकविली जात असे. एकलव्य हा शूद्र
होता. त्याच्या मनात ही धनुर्विद्या शिकायची तीव्र इच्छा होती. त्याने गुरू द्रोणाचार्यांचा
पुतळा समोर ठेऊन ती विद्या हस्तगत केली. मनात निश्चय असला की मग कार्य होत असते. निश्चय
असला की शक्ती जागृत होते.
मी तुम्हाला काही न सांगता तुम्ही केले तर त्याला कर्तृत्व म्हणता येईल. मात्र तुमच्या
ठिकाणी निश्चय असला पहिजे.
गुरुमुखातून एखादे वेळेस लहर आली की, काही बोलले जाते व शिष्याची शक्ती उदयास येते.
लहर नसली की काही बोलणार नाही. गुरुसहवास मिळाला की मग त्याचा हळूहळू परिणाम शिष्यावर
होत असतो व हळूहळू शक्ती उदयास येत असते.
गुरुमंत्रामुळे शिष्याच्या ठिकाणी जी सुप्त शक्ती असते ती जागृत होत असते. गुरुमंत्रामुळे
कुणी मोक्षाला जात नाही. मोक्षाला कोण लायक आहे याची जाणीव गुरूंना असते.
काही लोकांच्या मनात अनेक प्रकारची आवरणे असतात. त्यांना गुरुसान्निध्य सापडत नाही.
पारमार्थिक जीवन कसे सफल होईल? आपण कसे वागले पाहिजे? आपण काय केले पाहिजे? हे तुमचे
तुम्हाला ओळखता आले पाहिजे, ही माझी तुमच्या विषयी रास्त अपेक्षा आहे.
गुरू आपल्या भक्तांची नेहमी परीक्षा करीत असतात. त्यांच्या मनात किती निष्ठा आहे हे
तपासून पाहत असतात. म्हणूनच ते आपल्या शिष्यांना हलवून हलवून पक्के करत असतात. त्यांच्यापुढे
ढोंग चालत नाही. शिष्यामध्ये गुरूंबद्दल नितांत भाव पाहिजे. ते केव्हा तरी तुमचा भाव
तपासून पाहतात.
गुरूंच्या मनात शिष्यांना त्रास देण्याचा हेतू कधीच नसतो, ते त्रास देणारसुद्धा नाही.
शिष्यांना कमी लेखण्याचे कारण काय? त्यांचा राग व द्वेष करण्याचे कारण नाही. उलट गुरू
प्रेम करणारे असतात. ते एकाद्या वेळेस रागावले तरी प्रेम तेच करतात. गुरुदेव म्हणतात,
माझा राग हा त्या वेळेपुरताच असतो. मी तुमच्यात भेदभाव करत नाही, तुम्ही मला सर्व सारखे
आहात. तुमची परिस्थिती, तुमचा हुद्दा, तुमचे वय पाहण्याचे मला कारण नाही. तुमचे माझे
नाते गुरुशिष्याचे नाते आहे.
एखादे वेळेस परीक्षा करण्यासाठी एखाद्या व्यक्तीशी महिना महिना बोलत नाही, त्याच्याकडे
पाहत नाही. त्यातून तो टिकला तर चांगले आहे. जर तो निघून गेला तर माझ्यावरचे एक ओझे
कमी झाले असे मी समजतो.
काही भक्तांना वाटते की महाराज आमचेशी बोलत नाही. मी सर्वांशी बोलू शकणार नाही. प्रत्येक
व्यक्तीशी बोलणे शक्य नाही. मी जरी एकाला उद्देशून बोलत असलो तरी ते सर्वांसाठी असते.
गुरू जन्माला येतात, ते येतांना मागच्या पुण्याचा संचय घेऊन येतात. ते कार्य घेऊन आलेले
असतात.
शिष्य ठोकून ठोकून तयार करावे लागतात. त्यांच्या अनेक परीक्षा पाहाव्या लागतात. त्याला
आहो काहो असे न म्हणता तयार करावे लागते. त्याशिवाय शिष्याकडे कृपादृष्टीने पाहता येत
नाही. टेंबे स्वामींचे एक उदाहरण सांगतो; ते स्वामी नर्मदा काठी होते. त्यावेळी महाराष्ट्रातील
एक महापुरुष त्यांच्या दर्शनासाठी आले. त्यावेळी टेंबे स्वामी यांनी त्यांना पुन्हा
भेटू नका असे सांगितले. त्यांनी असेही सांगितले की तू माझा शिष्य नाहीस, नाही तर उद्या
भेट असे सांगितले असते.
आम्ही आमच्या भक्ताची परिपक्वता तपासून पाहतो. आमच्या प्रेमात आपलेपणा असतो. परंतु
आम्ही आमच्या भक्ताची परीक्षा पाहत असतो. गुरुभक्ती हे मोक्षाचे लक्षण असते. ज्यांना
गुरुभक्ती करावीशी वाटते तो मार्गी लागला असे समजले पाहिजे. ज्यांना गुरूबद्दल अत्यंत
निष्ठा असते त्यांना गुरूंशिवाय अन्य काही माहीत नसते. त्यांच्या मनात कुठेही संशय
नाही, कुठेही बाधा नाही. अतिपक्व चित्ताने गुरुसेवा करीत असतात.
।। श्री गुरुदेव दत्त ।।
गुरू स्वत:च्या भक्ताला कशी मदत करतात ?
भक्ताची पात्रता वाढली तर त्याच्या व्यवहारातील अडथळे दूर करतात, आलेल्या संकटातून
मार्ग दाखवतात व येऊ घातलेली संकटे, अडथळे भक्तांना जाणीव न देता बाहेरच्या बाहेर नाहीशी
करतात. ज्या सद्गुणी मित्रांची भक्तांना गरज व आवश्यकता आहे, अशा लोकांशी त्यांचा संपर्क
वाढवतात व मित्र बनवतात, व जे लोक भक्तांना त्रास देतात व भविष्य काळात अडथळे आणणार
आहेत अशा लोकांना सोयीस्कर रीत्या दूर करतात, ही सर्व ईश्वराच्या व सद्गुरूंच्या कृपेची
लक्षणे आहेत.
संकलन – रसिकलाल लक्ष्मीचंद संघराजका
अहमदनगर
परम पूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकण
प्रश्न १: गुरूंना देवरूप का मानावे ?
उत्तर : वरील प्रश्नाला मार्गदर्शन करतांना प. पू. महाराजांनी सांगितले की, "तुमच्या
मध्ये जे चैतन्य आहे तेच सत्पुरुषामध्ये निरनिराळ्या ठिकाणी प्रकटपणे दिसून येते आमच्याकडे
असलेली अफाट बुद्धिमत्ता व चेहऱ्यावरील तेजस्वी भावाद्वारे हे चैतन्य प्रकट होत असते.
आपल्या गुरूंनी ज्या नेत्रांनी ज्या दिव्य प्रकाशाचे म्हणजे ईश्वराचे दर्शन घेतले आहे
त्याच कृपाळू व दयाळू नेत्रांनी आपल्याकडे पाहावे म्हणून प्रत्येक भक्ताने गुरूंचे
दर्शन घेणे आवश्यक असते.
ईश्वराचे अधिष्ठान इतर कोणत्याही ठिकाणी प्रवेश करत नाही परंतु ज्यांचे शरीर
व मन आतून व बाहेरून शुद्ध झालेले असे अशाच ठिकाणी प्रवेश करून वास करते म्हणून भक्ताने
अतिशय नम्र होऊन गुरूंना देवरूप मानून दर्शन घ्यावे. एकदा जरी गुरूने त्या विशिष्ट
नजरेने भक्ताकडे पहिले की, भक्ताचा उद्धार निश्चित होतो. गुरूंची मर्जी संपादन करण्याकरिता
प्रत्येकाने गुरूंची सेवा करावी व त्या कृपा दृष्टीचा लाभ केव्हा होतो हे स्वीकारण्याच्या
तयारीत असावे. यासाठी वेगळी परीक्षा नसते गुरूची ही कृपा कशी होईल, केव्हा होईल व कोणावर
होईल यासाठी निश्चित नियम नाहीत. ज्यांचा दृढ भाव, पूर्ण विश्वास झाला असेल तेच भक्त
गुरूंना ईश्वररूप मानतात बाहेर इतर गुरू शिष्यांना काहीही शिकवतात. त्यामुळे त्यांना
काहीही साध्य होत नाही, त्यांचे श्रम व मेहनत वाया जाते. मी भक्तांना कधीही चुकीचे
शिकवणार नाही तुम्ही गुरूंना देवरूप मानले तरच तुम्हा भक्तांचा फायदा होईल; ह्यावरून
गुरूंना देवरूप का मानावे हे लक्षात आले असेलच”.