“गुरूपौर्णिमा (२०१४)”
॥श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ॥
"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरूर्देवो महेश्र्वर:
गुरु: साक्षात परब्रह्म तस्मैश्रीगुरवेनम:"
ब्रह्मा, विष्णू, शिव ह्या तिन्ही देवता समान गुरूदेवांना कोटी कोटी प्रणाम. गुरूपौर्णिमा
म्हणजे गुरूंचे पूर्णत्व पाहण्याचा दिवस. आपल्या गुरूंना त्यांच्या गुरूंकडून आलेल्या
उपदेशातून परमार्थ साधून पूर्णत्व आले; या पूर्णत्वाला मनोभावे शरण जाण्याचा दिवस.
त्वंनो माता त्वंपिता प्तो धिपस्त्वं
त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम
त्वंसर्वस्वंनो प्रभो विश्र्वमूर्ते
घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते
मातेप्रमाणे माया करणारे, पित्याप्रमाणे चांगल्या वाईटात खंबीरपणे उभे राहणारे, प्रापंचिक
आयुष्याची जबाबदारी घेऊन पारमार्थिक प्रगती घडवून आणणाऱ्या परंपरेतील सद्गुरुंना शरण
जाण्याचा दिवस म्हणजे गुरूपौर्णिमा. आपले सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज हे
मूळ म्हणजे शिव परंपरेतील असून त्यांनी आपणा सर्वांना दयेने त्यांच्या चरणापाशी जागा
देऊन ह्या परंपरेत सामावून घेतले आहे. गुरूपौर्णिमा हा दिवस गुरूपूजन, गुरूसेवा व त्याही
पेक्षा गुरूभेटीचा आहे. त्यांनी केलेल्या उपदेशाचे श्रवण, मनन, चिंतन करून आपण आपल्या
आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या हातून जे काही चांगले वाईट घडलेते अर्पण
करून नव्याने विधायक संकल्प अर्पण करण्याचा हा दिवस. पुरूषांना ह्या पौर्णिमेला गुरूदेवांचे
चरण स्पर्शाचा अमृततुल्य योग घडत असे. आम्हां स्त्रियांना प्रत्यक्ष चरण स्पर्श नसला
तरी मानस पूजेत ते नक्कीच त्यांचे चरण समक्ष ठेऊन पूजा करवून घेतात. चरणांना स्पर्श
होताच सद्गुरुंशी मानस संवाद सुरू होतो. ह्रदयातील गुरूंवरील प्रेम व निस्सीम गुरूभक्ती
डोळ्यांतूंन वाहू लागते व ह्याचाच अभिषेक पावलांना घडतो; ह्याच्या शिवाय आम्ही पामर
भक्त आणखी काय देणार! ह्या दिवसाची प्रत्येक भक्त आतुरतेने वाट पाहत असतो, त्या चरणांना
स्पर्श करण्यासाठी आसुसलेला असतो. त्या माऊलींच्या स्पर्शाने, कटाक्षाने सारं शरिरच
नव्हे तर पुढील सारं आयुष्यच सद्गतीत होते. गुरूदेव आपणा सर्वांना लौकिक म्हणा पारमार्थिक
म्हणा साऱ्यांच बाजूंनी भरभरून देत आहेत. मग आपल्याकडून काय अपेक्षित असेल, तर गुरूस्वरूप
समजून घेण्याचा प्रयत्न करणे. आपल्या ह्रदयात निस्सीम भाव उत्पन्न करून अहंकार नाहीसा
करण्याचा निश्चय केला पाहिजे. ह्या मानवी जीवनात गुरूसेवेच व्रत घेऊन जेवढी सेवा सद्गुरुचरणी
अर्पण करता येईल तेवढी करावी.
गुरूदेव आपणा सर्वांना लौकिक म्हणा पारमार्थिक म्हणा सार्यांच बाजूंनी भरभरून देत
आहेत. मग आपल्याकडून काय अपेक्षित असेल, तर गुरूस्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करणे.
आपल्या ह्रदयात निस्सीम भाव उत्पन्न करून अहंकार नाहीसा करण्याचा निश्चय केला पाहिजे.
ह्या मानवी जीवनात गुरूसेवेच व्रत घेऊन जेवढी सेवा सद्गुरुचरणी अर्पण करता येईल तेवढी
करावी. गुरूदेवांनी गुरूपौर्णिमेनिमित्त प्रत्येकाने निदान एक तरी संकल्प करावा व तो
सातत्य राखून पूर्णत्वास न्यावयास सांगितले आहे. गूरूदेव म्हणतात की आपल्यातील दुर्गुण
हे प्रयत्नपूर्वक काढावे लागतात. आपल्या ठिकाणी असलेले दोष हे गुरुपूजनाने नाहिसे झाले
पाहिजे, आपल्या मनातील प्रेमाचा, श्रद्धेचा भाग अधिकाधिक वाढला पाहिजे, आपली भक्ती
अधिक ज्ञानयुक्त झाली पाहिजे, आपले मन गुरूचरणी निसंशय होऊन एकनिष्ठ राहिले पाहिजे.
गुरूदेवांच्या उपदेशाला स्मरून आपण सर्वांनीं ह्या दिवशी सद्गुरूचरणीं नतमस्तक होताना
एखादा संकल्प जरूर करूया व त्याचे अनुसंधान राखुया. ह्यातील जे विधायक आहे ते गुरूदेवांचे
आहे; काही चुका असल्यास गुरूदेव क्षमा असावी.