आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


“गुरूपौर्णिमा (२०१६)”


।। तस्मै श्री गुरवे नमः ।।

।।श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू: गुरुर्देवो महेश्वर:।
गुरु:साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।।

हा सर्वज्ञात, सुपरीचित आणि बहूतेक मुखोद्गत असा श्लोक! पण गुरुपरंपरा हा कदाचित नवपरिचित अथवा प्रथमच वाचनी आलेला शब्द असू शकेल. या श्लोकाचा आणि या शब्दाचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे,याची कल्पना फार कमी जणांना असेल. जे या परंपरेशी निगडीत आहेत. त्यांच्या दृष्टीने हा परिचयाचा असू शकतो. परंतु *एकेकाळी समग्र जीवन व्यापलेल्या आणि केवळ आयुष्य नव्हे तर मनुष्य जन्मात अत्यंत महत्वाचे असलेले गुरुस्थान आणि त्यांची अव्याहत सुरु असणारी गुरुपरंपरा* याचा समाजास विसर पडलेला दिसतो.
आज व्यासपौर्णिमा अर्थातच गुरुपौर्णिमा! गुरुंना वंदन करण्याचा, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस़! पण मूळात गुरुंची गरज काय? दैनंदिन जीवनात गुरु असण्याचा फायदा काय? शाळा, महाविद्यालये आणि इतर अनेक शाखांची शिक्षणे देणा-या अद्ययावत आणि अगणित संस्था असताना तसेच संपर्काची व माहितीचा प्रचंड स्फोट करणारी अत्याधुनिक साधने असताना गुरुंची गरज काय? असा सर्वसामान्य प्रश्न पडणे साहजिकच आहे. नव्हे तो पडलाच पाहिजे. तरच गुरु का असावेत? याचं उत्तर शोधता येईल.
मनुष्य जीवनाला दोन बाजू असतात - एक श्रेयसाची आणि दुसरी प्रेयसाची! श्रेयस् आणि प्रेयस् हे शब्द जरी नवीन वाटत असले आणि अर्थ जरी उमगत नसला तरीही दैनंदिन जीवन आपण या दोनच गोष्टींसाठी व्यतीत करतो. आणि ह्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी दोन मार्ग आहेत! एक भोगाचा आणि दुसरा त्यागाचा! श्रेयसाची इच्छा करणारे त्यागाचा मार्ग अवलंबतात तर प्रेयसाची इच्छा करणारे भोगाचा मार्ग पत्करतात.भारत ही अध्यात्मप्रधान भूमी! अध्यात्म हाच या भूमीचा आत्मा! ज्ञान आणि त्यातून जन्म घेणारे विज्ञान यांचा समतोल धार्मिक संस्कारात साधून विवेकी जीवन व्यतीत करणा-या लोकांचा हा देश! त्यामुळे ज्ञानोपासना हा या देशवासियांचा मूळ पिंड! कितीही आक्रमणे झाली कितीही पाश्चात्य संस्कृतींचे आक्रमण झाले तरी "श्रेयसाची" कास धरणारा हा समाज आहे.

८४ लक्ष योनींचा प्रवास करुन आत्मा मनुष्यदेहात ठराविक कालावधीसाठी पृथ्वीतलावर येतो. यात त्याला श्रेयसाची आणि प्रेयसाची सांगड घालून मोक्षाकडे वाटचाल करायची असते. म्हणून तो चरितार्थासाठी नोकरी/ व्यवसाय करतो तर वैयक्तिक जीवनात नित्य उपासना करीत असतो. म्हणजेच एका बाजूला तो अध्यात्म आचरुन श्रेयसाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करत असतो तर चरितार्थाद्वारे इच्छित उपभोग्य वस्तु आणि जीवनावश्यक गरजांची पूर्तता करत असतो. म्हणजेच आता श्रेयस् आणि प्रेयसाची थोडीफार कल्पना आपणास आली असेल.
आपला धर्मच पुनर्जन्माच्या वास्तवतेवर आधारलेला आहे. त्यामुळे *आत्मा* हा नित्य, सनातन आणि शाश्वत आहे हे ओघाने आलेच! हे सत्य नाकारणा-याच्या वाट्याला सुद्धा हे वास्तव येतेच हे वेगळे सांगावयास नको! कारण सूर्य उगवला म्हणजे सर्वांनाच तो दिसतो पण काही लोक डोळे बंद करुन घेतील तर काही जन्मतःच अंध असतील अशांना ह्या सूर्याचे दर्शन होत नाही. याचा अर्थ त्या व्यक्तींनी सूर्यच नाही किंवा तो उगवतच नाही असा काढला तर ज्याप्रमाणे त्यांना मूर्खात काढले जाईल किंवा हसे होईल. त्याचप्रमाणे पुनर्जन्म आणि आत्मा ह्या संकल्पना नाकारणा-यांचे !
इथेच श्रेयस् आणि प्रेयसाच्या द्वैताला प्रारंभ होतो. श्रेयसाची उपासना करणारा आयुष्यभर नित्य आणि शाश्वत गोष्टी मिळवण्यातच धन्यता मानतो तर प्रेयसाची इच्छा करणारा नश्वर गोष्टींमधे गुंतून पडतो. कर्मसिद्धांत हा कोणासही चूकलेला नाही. आजचे आपले कर्म हे उद्याचे प्रारब्ध असते याचा विसर मनुष्याला काळाच्या ओघात व यशाच्या धुंदीत पडतो.तो विसरतो की सत्ता, संपत्ती, जमीन-जुमला, नोकर-चाकर इत्यादी सर्व गोष्टी इतकंच काय पण स्वतःचा देह देखील क्षणिक आणि नित्य परिवर्तनशील आहे. मनुष्याला जन्म होण्याआधी ९ महिने अगोदरच कल्पना मिळते मात्र मृत्यूची नाही. कोणाचा मृत्यू कधी, कुठे, कसा होणार याची सुतराम कल्पना मनुष्याला नसते. जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत तो आपण अमर आहोत अशा आविर्भावात जगत असतो. ह्या धुंदीत तो हे विसरतो की ज्या (प्रेयस) गोष्टी तो अथक परिश्रम करुन लालसेपोटी मिळवतो आहे, मग तो पैसा असो,घर असो, सत्ता असो,पद असो वा नातेवाईक असो ! मृत्यू आल्याक्षणी हे सारं काही त्याच क्षणाला इथेच या जगात सोडून जायचं आहे. जे माझं माझं म्हणून कमवलं त्यातलं काहीच सोबत येणारं नाही! अंगावरील वस्त्रे सुद्धा लोक अंतिमक्षणी काढून घेणार आहेत. गतप्राण देहाला *प्रेयसाची* सोबत फार तर चितेपर्यंतच! एकदा देह हा अग्नीच्या स्वाधीन केला की मग तिथून पुढचा प्रवास केवळ आपले धर्माचरण आणि आपले सत्कर्मासह! अर्थातच *श्रेयस्कर* वाटचाल
जीवनात झालेली योग्य गुरुंची भेट हा *श्रेयसाबद्दलचा* विवेक जागृत ठेवते. अनंत जन्मांच्या प्रवासाने मानवी मनांवर अनेक दोषांची आवरणे आणि पशु जन्मातील संस्कार झालेले असतात. हे संस्कार पुन्हा पुन्हा उफाळून वर येतात. मनुष्य योनीव्यतिरिक्त इतर योनी या भोग योनी आहेत. केवळ इंद्रिय तृप्ती, उदरभरण आणि प्रजनन हेच पशुंचे गुण आहेत. विवेक हा एकमेव सद्गुण मनुष्याला इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ ठरवतो. आणि हा “विवेक” केवळ श्रीगुरुंच्या सत्संगातुनच येतो. तेव्हा आपल्या सत्संगाने नराचा नारायण करण्याची किमया गुरु करतात. जीवनात सद्गुरुंची भेट हा त्या व्यक्तीच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण ठरतो. हजारो वर्षांपासून ही गुरुपरंपरा आजतागायत अव्याहत सुरु आहे. याची जाणीव कलीच्या प्रभावाने होत नाही. हा कली ओळखावा कसा? आणि त्यापासून आत्मसंरक्षण कसे करावे याचे यथार्थ मार्गदर्शन आणि मार्गदर्शनाप्रमाणे आचरण करण्याचे सामर्थ्य केवळ गुरुचऱणीच प्राप्त होईल. आधी ज्ञान मग विज्ञान अशी वस्तुस्तिथी ही फार अनादि कालापासून अव्याहत आहे. अर्थातच ही *अतिप्राचीन गुरुपरंपरा ज्ञानोपासनेवर* आधारलेली आहे. ज्ञान, त्याग, वैराग्य हे या परंपरेचे मूळ वैशिष्ट्य!
खरं पाहिलं तर अज्ञान, असत्य आणि अंधार ह्या अस्तित्वहीन गोष्टी ! कारण यांना स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वंच नाही! एखाद्या अंधःकारमय खोलीत दीप प्रज्वलित केला की अंधार आपोआप दूर होतो,सत्य कळल्यावर असत्याचा आपोआप नाश होतो तद्वत ज्ञान झाले की अज्ञानाचा नाश आपोआप होतो. अंधार, अज्ञान व असत़्य यांना दूर करण्याच्या वेगळ्या प्रक्रिया नाहीत!
त्यामुळे *शिष्याचे सर्वप्रकारे अज्ञान दूर करुन त्याला आत्मोन्नतीच्या मार्गाला लावण्याचे कार्य* ही *गुरुपरंपरा* करत आली आहे. *मनुष्य ही निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती!त्याला *मन, बुद्धी, वाचा आणि विवेक* दिला आहे. ज्यामुळे तो *इतर प्राण्यांपेक्षा वेगळा* ठरतो. तरीही तो हळू हळू शिकणारा प्राणी आहे. षड्रिपू (काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर) हे त्याच्या देहासोबतच येतात. त्यामुळे तो अज्ञानाच्या अंधारात चाचपडत राहतो. मायामय अशा या जगात सत्ता, संपत्ती, खोटी प्रसिद्धी, शारीरिक सुखासिनता यांनाच तो सर्वस्व मानू लागतो. या सर्वातून मार्ग दाखविण्यासाठीच व हे शाश्वत सुख नसून मधूर सुखाच्या यातना आहेत याचा अनुभव देण्यासाठी परमेश्वर स्वतः "गुरुस्वरुपात" अवतार घेतो.
"शिवं ज्ञानोपदेष्टारं विष्णूं धर्मोपदेशकं विधी वेदप्रवक्तारं। अशी त्रैमूर्तींची परंपरा आहे. म्हणून गुरु हे ब्रह्मा विष्णू व महेश्वर स्वरुपी मानले जातात! या तीनही देवतांची शक्ती गुरुंच्या ठिकाणी एकवटलेली आहे म्हणून देवतांच्याही आधी श्रीगुरुंना वंदन करण्याचे महत्वं आहे.
गुरु गोविंद दोऊ खडे काके लागुं पांय।
बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो बताय ।। असं कबीरांनी सार्थ वर्णिलं आहे.
खुद्द भगवंतानेच या परंपरेचा आदर्श घालून दिला आहे. श्रीराम अवतारात त्याने महर्षी वसिष्ठांना गुरु केलं तर भगवान श्रीकृष्णावतारात त्याने महर्षी सांदीपनींना गुरु केलं आणि या परंपरेचं महत्वं स्वतः आचरणातून या भूमीत रुजवलं.ही परंपरा कुचकामी विचारांवर आधारलेली नाही. आजकाल समाजात दांभिक गुरुंचे पीक आलेले दिसते. हे लोक सामान्य माणसाच्या अज्ञानाचा किंबहूना भाबड्या श्रद्धेचा फायदा घेऊन त्यांना लुबाडताना दिसतात. पण खरे गुरुस्वरुप हे कधीही नश्वर गोष्टींची अपेक्षा ठेवत नाहीत. त्यांची या सर्व विषयातील आसक्ती संपल्यामुळेच ते या पदावर पोहोचलेले असतात.
गुरु हे जन्मालाच यावे लागतात. म्हणूनच अशा गुरुंना वयाच्या दहाव्यावर्षापर्यंत ईश्वरी साक्षात्कार झालेला असतो. त्यामुळे भौतिक सुखांबद्दल ते उदासीन असतात. म्हणूनच ते निःस्पृह आणि त्यागीवृत्तीचे असतात. दयाळू वृत्तीमुळे सर्वच जीवांना समान दृष्टीने ते पाहू शकतात. अर्थातच जातीभेद, वर्णभेद व धर्मभेद अशा गुरुंच्या ठिकाणी दिसत नाही. (*समाजातील अवतारी पुरुष, सत्पुरुष तसेच संत ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे अधिकारी व्यक्तींना कोणतेही व्यंग नसते व ते कधीही प्रसिद्धीच्या मागे नसतात* - परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज {अमृतकण क्रमांक- २०३, पृष्ठ क्रमांक- ६, दि- १५/१२/१९९६})
परंपरेतील गुरुंचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या शिष्यांना मार्गी लावून सोडून देत नाहीत तर त्यांच्याकडून कर्तव्य करुन घेतात.अशा प्रकारच्या मार्गदर्शनामुळे भक्त अध्यात्म आचरणातून श्रेयसाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतो. व जीवन गुरुसेवेत व्यतीत करण्यातच धन्यता मानतो आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने यावर चिंतन जरुर व्हावे. आपणास जीवनात सद्गुरुंचा लाभ झाला आहे काय? झाला असल्यास त्याचा आपणांस आजवर काय फायदा झाला? गुरु हे परीसासारखे असतात. सत्संगतीत येणा-या प्रत्येकाचे ते सुवर्ण करतच असतात. पण आपले सुवर्ण होण्यासाठी आपणही लोखंड असणे गरजेचे असते. आजचे युग हे माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे युग आहे. माहिती ही सहज कुठेही उपलब्ध होऊ शकते. ती कुणीही कधीही, कुठेही, कुणालाही देऊ शकतो.पण ज्ञानाचे तसे नाही. ते अनुभवातूनच प्राप्त होईल. आणि कोणतीही कृत्रिम साधने ही ज्ञान देण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे खरे ज्ञान जर कुठे प्राप्त होईल तर ते केवळ श्रीगुरुंच्या चरणीच!. भारत हा ज्ञानोपासनेचा देव्हारा आहे. याच्या गाभा-यात अखंड तेजोमय असणा-या गुरुमूर्तीची प्रत्येक भारतीयाच्या हृदयात प्रतिष्ठापना झाल्यासच हा देश तरुन जाईल.

।। श्रीगुरुदेव दत्त ।।

-“श्रीरामकृष्ण”चरणरज


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy