“गुरूपौर्णिमा (२०१७)”
*गुरु: साक्षात् परब्रह्म.. !*
।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवोमहेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।।
आपल्या भारतभूमीत गुरुपूजनाची परंपरा ही दैवीगुरुंच्या परंपरेतून निर्माण झालेली आहे.
गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरुंचे पूर्णत्व पाहण्याचा दिवस! गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा
याचा अर्थ असा आहे की संन्याशाची परंपरा! जे संन्यासी आहेत! त्यांच्या परंपरेत जे आहेत
त्यांची पूजा करण्याचा अधिकार अखिल मानवाला आहे. गुरुपौर्णिमेला शिष्याचं मुख्य कर्तव्य
म्हणजे गुरुदर्शन, गुरुपूजन आणि उपदेशग्रहण !
गुरुपूजनाचे अनेक प्रकार आहेत- गुरुसंबंध, गुरुआश्रमवास, गुरुतीर्थप्राशन, गुरुप्रसाद,
गुरुगुणगान, गुरुसेवा, गुरुचरणस्पर्श!
परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज हे याच परंपरेतील आहेत. भगवान शिवापासून
सुरु झालेल्या या परंपरेतील गुरुदेव असल्याने ते प्रत्यक्ष शिवस्वरुप आहेत. आपण गुरुंना
ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर या देवतांचं स्वरुप मानतो, नव्हे त्या गुरुंच्या ठायीच
एकवटल्याचं मानतोे याचं कारण असं की "शिवं ज्ञानोपदेष्टारं विष्णुं धर्मोपदेशकं । विधिंवेदप्रवक्तारं
।" अर्थात् ज्ञानाचा उपदेश करणारे भगवान शिव,धर्माचा उपदेश करणारे भगवान विष्णु आणि
वेदोपदेश करणारे ब्रह्मदेव हे तिन्ही गुरुंच्या ठिकाणी सामावलेले असतात. म्हणून अशा
गुरूंच्या केवळ स्मरणानेच ज्ञान आपोआप उत्पन्न होते, धर्माचरणाची बुद्धी होते आणि त्यांच्या
गुरुवाणीला वेदोच्चाराचे महत्वं आहे म्हणून भारतात गुरुपरंपरा ही अत्यंत महत्वाची मानली
आहे.
गुरु हे जन्मालाच यावे लागतात तर शिष्य हे तयार करावे लागतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी
गुरुंचे स्वरुप आपण ओळखण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या पूर्वकर्मानुसार जे गुरु
आपणांस लाभले आहेत त्यांच स्वरुप काय? त्यांचा दर्जा काय? त्यांचा अधिकार काय आहे?
यावर चिंतन करणे व गुरुंचे महत्व आणि गुरुंची स्तुती करणं हे प्रत्येक शिष्याचं कर्तव्य
आहे. गुरुंना वंदन म्हणजे केवळ त्या मानवी देहाकाराला वंदन नव्हे तर आपण ज्यांना वंदन
करीत आहोत ते प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णु आणि महेश्वर स्वरुप तर आहेतच शिवाय अत्यंत
दैवदूर्लभ असे ईश्वरदर्शन हे गुरुंच्या माध्यमातूनच आपणांस घडत आहे असा भाव चरणस्पर्श
घेताना असावा.
गुरुस्वरुप आपण ओळखे । एेसे ज्ञान देई सुखे ।
या परते न मागे आणिके। म्हणोनि चरणी लागला ।।
परमपूज्य गुरुदेवांच्या बाबत एक गोष्ट प्रकर्षाने इथे सांगावीशी वाटते की या आधी
जी ईश्वरी दर्शनाची परंपरा आहे ती आधी तपश्चर्या आणि मग ईश्वरी दर्शनाची आहे. गुरुदेव
मात्र याला अपवाद आहेत. वयाच्या केवळ सातव्या वर्षी ईश्वरी दर्शन गुरुदेवांना झाले.
त्याक्षणापासून स्वतःच्या जीवनकार्याची कल्पना आली. वयाच्या दहाव्या वर्षी
त्यांच्या गुरुंची म्हणजेच श्री नृसिंह सरस्वतींची प्रत्यक्ष भेट गाणगापूरला झाली आणि
इथून पुढे वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांच्या तपश्चर्येला प्रारंभ झाला. आपण जर
त्यांना गुरुस्थानी मानत अाहोत तर त्यांच्या ईश्वरी दर्शन ते नीलवर्णकांती (विदेही)
अवस्थेपर्यंतच्या खडतर प्रवासाची तसेच या काळात सोसलेल्या प्रचंड त्रासाची जाणीव आपल्याला
असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यांच्या केवळ स्मरणाने (स्मर्तूगामी) आपल्यावरील संकटे दूर
होतात, त्यांनी अशी अवस्था प्राप्त करण्यासाठी किती यातना सहन केल्या याची जाणीव जोपर्यंत
आपल्यात निर्माण होत नाही, या चरणांच्या प्राप्तीचे महत्वं जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत
आपल्या "गुरुकार्याला" खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला असे म्हणता येणार नाही.
सद्गुरुंनी आपले संपूर्ण आयुष्य गुरुंकडून झालेल्या वेदकार्य विस्तारासाठी खर्च केले.
हे करत असताना त्यांनी प्रचंड निंदा सहन केली, अपमान सोसावा लागला. सर्वकाही कळत असून
सर्व काही बदलण्याची क्षमता असून कधीही नियतीमधे हस्तक्षेप केला नाही. वयाच्या केवळ
१० व्या वर्षी परमगुरु श्री नृसिंह सरस्वतींनी साक्षात् मानवरुपात दर्शन देऊन गुरुदेवांना
अनुग्रहीत केले व तपश्चर्येला प्रारंभ करण्याची आज्ञा केली. हा काळ साधारण १९४४ असावा.
१९७४ साली 'श्री दत्तात्रेय निवास' ही वास्तू सर्वप्रथम उभी राहिली. १९४४ ते १९७४ ह्या
काळाचा विचार केला तर तब्बल ३० वर्षांचा हा काळ थोडाथोडका नाही. या काळात पितृछत्र
हरपलेले होते, आर्थिक परिस्थिती हलाखीची, त्यात आपले खरे स्वरुप घरी कळू द्यायचे नव्हते.
ईश्वरी दर्शन झालंय म्हटल्यावर आता तरी परिस्थिती बदलेल असा घरातील लोकांचा अंदाज खोटा
ठरल्याने टीका होऊ लागली. यामागे ईश्वरी योजनाच होती, हा भागही दूर्लक्षित करण्यासारखा
नाही. परमपूज्य गुरुदेवांनी त्यांच्या रौप्यतुलेच्यावेळी ही परिस्थिती विशद केली आहे.
याकाळात अनेक देवतांची दर्शने होत होती. उपासनेत आजिबात खंड पडू दिला नाही. अगदी काटेकोरपणे
श्रीगुरुंची सेवा आणि उपासना सुरुच होती. श्री दत्तात्रेय निवास ही वास्तु उभी राहिल़्यानंतर
देखील वेदांत इमारत, महालक्ष्मी मंडप व त्यानंतर श्री दत्तक्षेत्र प्रकल्प साकारण्यासाठी
अविरत कार्यरत राहिलेले आहेत. हे सर्व करत असताना सर्व हिशोब आणि कागदपत्रे चोख
ठेवण्याचा त्यांचा कटाक्ष होता. व्यवहारात व्यर्थ पैसा वाया घालवलेला
त्यांना कधीच आवडला नाही. निधी संकलीत करुन आणणाऱ्यापेक्षाही निधी वाचवणाऱ्याचं
त्यांना जास्त कौतुक असे! तोच नियम जागेच्याबाबतीत! उपलब्ध झालेल्या जागेचा
जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याबद्दल गुरुदेवांची जागरुकता ही तंत्रकुशल इंजिनिअरला
लाजवणारी आहे. ही स्थाने परमपूज्य गुरुदेवांनी स्वत:च्या कठोर उपासनेच्याद्वारे उभी
केली. महत्वाचं म्हणजे यासाठी कोणतंही आर्थिक पाठबळ गुरुदेवांना नव्हतं. राजकीय पाठिंबा
कधीच स्वीकारला नाही. मोठे देणगीदार कधीच जवळ केले नाहीत. सरकारी अनुदान नाही. केवळ
लोकाश्रयावर हे सर्व उभं केलं! वेदकार्याची माहिती भक्तांकडून घरोघरी पोहोचवून देणगी
दिल्यास पावती देऊनच धर्मकार्यासाठी निधी स्वीकारण्याची शिस्त परमपूज्य गुरुदेवांनी
घालून दिलेली होती.
धर्मानिष्ठेबाबत सांगायचं तर एक प्रसंग पुरेसा आहे. महाराष्ट्रात एक प्रसिद्ध गायक
होते. ते मद्यपान करुन शास्त्रीय संगीत गात असत. शास्त्रीय संगीत हे सामवेदाचे स्वरुप
आणि ह्याचा उच्चार मद्यपान करुन करणे हे त्यांना कधीच मान्य होणारे नव्हते. म्हणून
गुरुदेवांनी त्यांची गाणी ध्वनीफितीवर (कॅसेटवर) सुद्धा कधीच ऐकली नाहीत. याचाच अर्थ
अधर्माचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सुद्धा कधीच समर्थन केले नाही.
संन्यस्त जीवन जगताना संन्यस्त धर्माचे तेज वृद्धिंगत होईल, गुरुपरंपरेचे श्रेष्ठत्व
अधिक वाढेल असेच आचरण त्यांनी केले. अधर्माचरणाला आणि अधर्मी व्यक्तीला त्यांनी कधीच
पाठिंबा दिला नाही. याऊलट वेदविद्या संवर्धनाचे कार्य त्यांनी गुरुवाक्य प्रमाण मानून
प्रतिकूल परिस्थिती येऊनही सांभाळले! तसेच वेदविद्येचे प्रतिकूल परिस्थितीत जतन करणाऱ्या
घनपाठी ब्राह्मणांचा भरघोस दक्षिणा देऊन सत्कार केला, आजही तो केला जातो. आयुष्यभर
हे असिधाराव्रत त्यांनी प्राणाहून जास्त जपले.
१९७४ साली श्री दत्तदेवस्थान ट्रस्ट हा ट्रस्ट अवघ्या १०० रुपयांवर स्थापन केला. आपल्या
ट्रस्टचा व्यवहार पारदर्शी कसा राहील याबद्दल गुरुदेव नेहमीच दक्ष राहिले. त्याचे ट्रस्टी
कसे असावेत त्यांनी काय कार्य करावे? त्यांची पात्रता काय असावी? याबद्दल अचूक मार्गदर्शन
करुन कार्यवाहीची घडी घालून दिलीच शिवाय इतर अनेक धार्मिक संस्थानांची घडी गुरुदेवांनीच
बसवून दिली. तेथील ट्रस्टींना मार्गदर्शन देखील केले. हे करत असताना आपला ट्रस्ट हा
सर्वांना आदर्श आणि अनुकरणीय कसा ठरेल याचे निकष ठरवून त्यादृष्टीने अनेक नियम व परंपरा
सुरु केल्या. त्या सांभाळल्या! तसेच भक्तांमधे रुजवून वृद्धिंगत केल्या. आश्रमातील
काटेकोर शिस्त आणि पावित्र्य हा आजही चर्चेचा विषय आहे. संन्यस्त धर्माचे काटेकोर पालन,
प्रखर धर्माचरण, अखंडीत तपश्चर्या, दैनंदिन उपासनेच्या सांभाळल्या जाणाऱ्या वेळा याचेच
फलस्वरुप म्हणून श्री दत्तात्रेय निवासात "चिंतामणी पादूकांच्या" रुपात उमटलेले श्रीगुुरुचरण
होय! ही अलौकिकत्वाची साक्ष आहे. अखंड भारतवर्षाला आधारभूत ठरावी अशी ही विभूती आणि
हे धर्मक्षेत्र! याबद्दल आपणा सर्वांचीच भावना त्यागाची आणि निःस्पृहतेची असावी. या
चरणांचे दासानुदास बनून कसे राहता येईल, या स्थानाचा नावलौकिक कसा वाढेल यासाठी आपण
नेहमीच प्रयत्नशील राहणं आपलं कर्तव्य आहे. "ऐसा स्वामी पुन्हा होणे नाही" या त्यांच्या
वचनामागचं गांभीर्य जर आपण समजावून घेऊ शकलो तर या स्थानात येणं सार्थकी लागलं असं
मानायला हरकत नाही.
या स्थानाचा आणि परमपूज्य श्री गुरुदेवांचा अधिकार हा चारही पीठांच्या शंकराचार्यांनी
या स्थानास प्रत्यक्ष भेट देऊन गौरविला. परमपूज्य गुरुदेवांनी खडतर तपश्चर्येने निर्माण
केलेल्या श्री दत्तात्रेय निवासातील ईश्वरी अधिष्ठानाचे श्रेष्ठत्व त्यांनी ओळखले.
आपण सर्वांनी ह्या स्थानाचे दर्शन घेताना कृतार्थतेची भावना ठेवली पाहिजे. आपण भगवंताचे
ऋणी असले पाहिजे की, गेल्या अनेक जन्माच्या उपासनेचे फलित म्हणून या स्थानाशी आपला
संबंध जोडला गेला आहे.
या स्थानास गौरव प्राप्त करुन देणे आणि परमपूज्य गुरुदेवांचे वेदकार्य अखंड अविरत प्रतिपश्चन्द्रलेखेव
वृद्धिंगत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य समजले पाहिजे. तरच श्रीगुरुचरणांच्या प्राप्तीतून
समाधानाची भावना येईल. सद्गुरुंच्या दर्शनाने आपणा सर्वांना आनंद होतोच पण आपली प्रत्येक
कृती परमपूज्य गुरुदेवांना आनंददायी कशी ठरेल, आपली कर्तव्य भावना जागृत होऊन कालानुरुप
सेवा कशी घडेल यासाठीच असायला हवी. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रसंगानुरुप सेवेची
व्याख्या ठरविण्याचा विवेक गुरुदेवांनी द्यावा अशी प्रार्थना करावी. हे सर्व करताना
अज्ञान, असत्य आणि कलीच्या प्रभावापासून दूर राहण्याची सद्बुद्धी सद्गुरुंनी द्यावी
हीच त्यांच्या चरणी प्रार्थना!