आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


"गुरुपौर्णिमा (२०२०)"


 || श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम: ||

गुरुपौर्णिमेचा सोहळा म्हणजे आम्हा गुरुभक्तांसाठी पर्वणीच! हे आजवरचे अनेक सोहळे हृदयात साठवलेले आहेत, जे आजही डोळ्यांसमोर प्रत्यक्षरित्या उभे राहतात. लक्ष्मी मंडपावरील सभागृहात हसतमुख आसनस्थ प. पू. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींचे गुरुपौर्णिमेचे तेज काही औरच! डाव्या बाजूला दर्शनासाठी पुरुषांची तर उजव्या बाजूने स्त्रियांची रांग, अगदीच शिस्तबद्ध. समस्त पुरुष भक्तांसाठी आजचा दुग्धशर्करा योगच, अमृततुल्य पर्वणी, साक्षात सद्गुरुचरणस्पर्श!!! साक्षात भगवान शिवस्वरूप, ज्यात श्री लक्ष्मी-नारायण स्थित आहेत, नील कांतीने ज्यांची प्रभा उजळली आहे अश्या पवित्र गुरुस्वरूप ईश्वराचे चरणस्पर्श मिळणे, ह्यापेक्षा भाग्योदय तो कोणता!

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा | गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: || 

स्त्रियांना सद्गुरुचरणस्पर्श प्रत्यक्ष नसला तरीही सद्गुरूंच्या कृपाकटाक्षातून कुणीही सुटणे अशक्यच! हा ही एक प्रकारचा "कृपास्पर्शच" होय!

त्या दिवशी वातावरण निराळेच भासायचे! सुर्यदेवांपासून, वारा, पक्षी, झाडे, आकाश सा-यासा-यांना जणू ह्या सोहळ्यात सहभागी व्हावे असे वाटत असावे. त्यात निर्जीव गोष्टीही जणू सजीव होऊन गुरुदर्शनाचा आनंद घेत असणार. वातावरणातील ताजेपणा, फुलांचा मंद सुगंध, अष्टगंध-केशर-अत्तराचा परिचित सुगंध, सा-यांच्या मनातील ओसंडणारा उत्साह, भक्तीभाव, गुरुदर्शनाची ओढ सारसारं ह्या सोहळ्याचा भाग असायचे.

खर सांगू, हे झालं सारं बाह्य वर्णन! पण अंतर्मनात डोकावून मनात हा सोहळा साजरा करणे, हे गुरुदेवांना अपेक्षित असावं. आजच्या या कोरोना प्रतिबंधित काळात हेच उपयोगी पडणार आहे, जणू गुरुभक्तांची परीक्षाच म्हणा ना! यावर्षी नगरवारी नाही हा विचार बुद्धीने मान्य केला पण अश्रूंनी जणू डोळ्यातून हृदयाकडे जाणारा मार्गच अडवला. कारण आजवर वर्षानुवर्षे हा सोहळा याची देही याची डोळा नगरला अनुभवत आलो आहोत.

पण यावर्षी मात्र परीक्षाच! काय हरकत आहे...

आजवर आपल्या गुरुदेवांनी आपल्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, मौनातून जे शिकवलं ते आचरणात आणून त्यांना गुरुदक्षिणा अर्पण करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. "गुरु हे तत्व आहे” हे साक्षात सद्गुरूंच मुखोद्गत आशीर्वचन आहे. हे तत्व स्मर्तुगामी आहे, चराचरात सामावलेलं आहे, तुम्हां आम्हांत, सद्गुरूंच्या ज्ञानगंगेत अवतरीत आहे. मात्र आपण हे तत्व नगरपुरतं मर्यादित ठेऊन त्या तत्वास मर्यादा घालणे योग्य नाही. आपल्या गुरुंच दर्शन घेणं, त्याचं गुणवर्णन करणे, गुरुदक्षिणा अर्पण करणे, त्यांना अपेक्षित असा संकल्प करून त्यात सातत्य ठेवणे, स्वतःला व स्वत्वाला गुरुचरणांचे दर्शन घडविणे, हेच गुरुमाऊलीला अपेक्षित आहे ना!

तुझा महिमा वर्णावयासी | शक्ती कैसी आम्हासी | मागेन एक तुम्हासी | कृपा करणे गुरुमूर्ती ||

मग ह्या वर्षी गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंच्या अपेक्षा पूर्ण करत थाटामाटाने साजरी करावयाची, असा प्रथम संकल्प करूयात. आपला देह, आपलं मन हेच आपलं नगर. ह्या मनस्वरूपी मंदिरात गुरु विराजीत आहेत, त्यांना मनोभावे पूजावं, दर्शन घ्यावं. ह्या सोहळ्यात आपले सद्गुरू व आपण ह्याखेरीज दुसरं कुणीही नाही, घाई-गर्दी नाही, आपलं समाधान होईपर्यंत ह्या अंतरचक्षूमध्ये गुरुमूर्ती साठवावी. त्यांच्या चरणांना मानसगंगेने स्नान घालावे, अष्टगंघ-केशर-अत्तरयुक्त लेपनाने त्यांचे कोमल चरण आच्छादावे, त्यावार हळुवार सुवासिक फुले, तुळस-बेलपत्र वाहावे. बाकी काही भौतिक वस्तू अर्पण केल्या नाहीत तरी मनातील असूया, ईर्ष्या, राग, लोभ, मत्सर, अहंकार जरूर अर्पण करावा. कारण गुरु हे एकमेव असं स्थान आहे कि जेथे ह्या गोष्टी मुळासकट स्विकारल्या जातात व त्यांचा निचराही येथेच शक्य आहे. आपणांस अंतर्बाह्य शुचिर्भूत करून संस्काराचे बाळकडू गुरूच देऊ शकतात. त्यांचे आशीर्वाद ह्या एका जन्मापुरते मर्यादित नसून असे अनेक जन्मांना व्यापून टाकणारे असतात.

हि एक प्रकारची मानसापुजाच! जी खरतर आपण दैनंदिन उपासना म्हणून करणे अपेक्षित आहे. पण गुरुपौर्णिमा विशेष म्हणजे यात काही असेल तर ते म्हणजे सद्गुरुदर्शन व गुरुदक्षिणा! सद्गुरुदर्शन हा वरवर एक शब्द दिसत असला तरी सद्गुरूंचे आपल्याला, आपल्या आत्म्यास दर्शन घडले आहे का हे तपासणे होय. सद्गुरूंचे दर्शन देहरूपाने घडणे हे परम भाग्यच!!! कितीतरी जन्मांची पूर्वपुण्याई एकवटून आल्याने अशा ईश्वरानुग्रहित, वरदपिंड, दत्तावतारीत सद्गुरूंचे चरण आपणास लाभातात व तेही आईप्रमाणेच आपणास हृदयाशी कवटाळतात. परंतु त्यांचे हे दयेने जवळ करणे, हा त्यांच्या कृपाशिर्वादाचा भाग आहे. एक भक्त, शिष्य म्हणून त्या दयेला पात्रतेचे स्वरूप देणे, सद्गुरूंच्या मौनातून त्यांना अपेक्षित असं आचरण करून गुरु-शिष्यातील दरी कमी करणे, आपल्या आचार-विचारातून आपल्या गुरूंची महती इतरांना जाणवून देणे, त्याहीपलीकडे शिष्याची गुरुतत्वाशी एकरूप होण्याकडे वाटचाल हीच खरी गुरुदक्षिणा असावी!!!

गुरूंच्या देहाचे दर्शन हि आपल्या भक्तिमार्गाची सुरुवात आहे, नव्हे हे सगुण उपासनेच माध्यम आहे व ते तितकेच महत्वाचेही आहे. पण यापुढील वाटचाल सगुणाकडून निर्गुणाकडेही करता आली पाहिजे. आपणा सर्वांना गुरुदेवांनी केवढ अभय दिलय कि 'माझा फोटो जेथे असेल तेथे मी आहे.' ह्या स्मर्तुगामी परमेश्वररूपी गुरूंचे दर्शन देहापुरते मर्यादित असूच शकत नाही. हे दर्शन त्यांच्या ज्ञानगंगेतून, त्यांच्या सवयी, सगुण-निर्गुण उपासना, कर्मकांडांतून, श्रीगुरुनृसिंहसरस्वती यांच्या दृढ भक्तीतून, यथा देहे तथा देवे ह्या आचरणातून होत असते. ह्या सर्व दैवी गोष्टी आपण आत्मसात करून ह्या जन्माचे सार्थक करणे हि गुरुदक्षिणाच ठरेल.

विश्वव्यापक तूंची होशी | ब्रह्माविष्णू व्योमकेशी | धरिले रूप तू मानुषी | भक्तजन तारावया ||


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy