आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपूजनाची परंपरा दैवी गुरूंच्या परंपरेतून निर्माण
झाली. या ज्ञानी गुरुंची परंपरा साक्षात परमेश्र्वराने निर्माण केलेली आहे. ईश्र्वराने सृष्टी
निर्माण केल्यावर मानवाला योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे असे जेव्हा भगवंताच्या
मनात आले तेव्हा परमेश्र्वराला प्रत्येक वेळेला अवतार घेणे शक्य नाही म्हणून त्याने गुरुरूपामध्ये
अवतार घ्यायला सुरुवात केली आणि मानवाला, भक्तांना योग्य असे मार्गदर्शन केले. एवढे करून
तो थांबला नाही तर मानवी अवतारामध्ये त्याने स्वतः गुरु केले. ही गुरुपरंपरा साक्षात शंकरांनी
निर्माण केली. ही परंपरा प्रत्यक्ष शिवापासून निर्माण झाल्यामुळे ह्या परंपरेला गुरुपूजनाचा
अधिकार आलेला आहे. जे परंपरेतील गुरु असतात ते शिवस्वरूप मानावे लागतात आणि त्यांचा अनुग्रह
आपण मस्तकी धारण करावा लगतो. ही गुरू-शिष्य-परंपरा नाना प्रकारच्या अवतारांनी, नाना
प्रकारच्या सिद्ध पुरुषांनी, साक्षात्कारी पुरुषांनी आजही चालू ठेवली आहे.
आपले जे हे स्थान आहे ते गुरुपरंपरेतीलच एक स्थान आहे. त्यास स्वतंत्र अशी परंपरा कुठेही
नाही, स्वतंत्र अशी तत्वप्रणाली नाही. ही गुरुपरंपरा परमेश्र्वराने सुरु केली आहे की ज्यांच्या
ठिकाणी श्रद्धेचा भाग आहे, भक्तीचा भाग आहे, सेवा, उपासनेचा भाग आहे त्यांच्या जीवनामध्ये निर्धास्तपणा
यावा आणि निर्धास्तपणा हाच आनंद आहे. गुरुपूजनानंतर किंवा गुरुसेवेनंतर आपल्या जीवनामध्ये आपण
सतत आनंदच अनुभवला पाहिजे. जे गुरूभक्ती करणार नाहीत, गुरुचे पूजन करणार नाहीत, गुरूंना
श्रेष्ठ मानणार नाहीत त्या लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण फार क्वचित येतो.
गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरूंचे पूर्णत्व पाहाण्याचा दिवस. आपल्या गुरुंनी त्यांनी
मानलेल्या गुरूंकडून आलेला उपदेश लोकांपर्यंत नेला आणी त्या उपदेशाच्या परंपरेतून परमार्थ
साधून ह्या परमार्थातून गुरूला पूर्णत्व आले; या पूर्णत्वामुळे आपण त्यांना शरण जाण्याचा
दिवस. आपण पारमार्थिक विचारांकडे जेव्हा जायला लागतो आणि परमार्थ आचरण्याची आपल्याला
बुद्धी होते त्या वेळेला गुरुंची भेट होते असा एक संकेत आहे. गुरुसेवा करायची म्हणजे काय
करायचे? तर आपल्या ह्या भारत देशामध्ये अनेक ग्रंथकार होऊन गेले, भाष्यकार होऊन गेले,
शास्त्रकार होऊन गेले, त्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. जे दुसऱ्यांना ज्ञान देऊ
शकतात, शिकवू शकतात अशा गुरुपरंपरेचे जे पुरुष आहेत त्यांची पण सेवा करण्याचा हा दिवस
आहे. तुम्ही लोकांनी हे ज्ञान प्राप्त करून कृतार्थता व्यक्त करण्यासाठी हा दिवस आहे.
आजची ही पौर्णिमा व्यास-पौर्णिमा म्हटली जाते. महर्षी व्यासांची परंपरा ही संन्याशांची
परंपरा आहे. जे संन्याशी आहेत त्यांची पूजा करण्याचा अधिकार आखिल मानवाला आहे. व्यास
ऋषींनी स्वतःच्या अनुभवावरून सामान्य माणसाला सुद्धा अनुभव मिळावा म्हणून स्वतःच गुरुपूजनाला
सुरुवात केली. आपल्या धर्माचीच अशी परंपरा आहे की, जो आपल्याला ज्ञान देईल किंवा आपल्याकडून
ईश्र्वराची सेवा करून घेईल अशांचे पूजन करणे; कारण हे ईश्र्वराचे रूप आहे. ही परंपरा तुम्हा
लोकांना पहायला सापडते, याचे मूळ कारण म्हणजे आमच्यासारखे जे अध्यात्म-पुरुष जन्माला येतात;
त्या अध्यात्म-पुरुषांच्या अनुभवांनी म्हणा, त्यांच्या संगतीत, उपदेशांनी म्हणा हे तुम्हा
लोकांच्या सुद्धा अनुभवाला येते.
गुरुपौर्णिमेनिमित्त शिष्याचे मुख्य कर्तव्य म्हणजे गुरुदर्शन, गुरुपूजन, उपदेशग्रहण.
ह्या दिवसाचे महत्व श्रेष्ठ मानायचे असेल तर गुरुपूजनाबरोबर उपदेशाचाही अवश्य उपयोग
करून घ्या. हे गुरुपूजन करताना आपल्या मनाला अत्यंत पवित्रता असली पाहिजे आणि आपलंमन
ह्या गुरुपूजनाच्या वातावरणाने भारावून गेले पाहिजे. तुम्ही हा विचार केला पाहिजे की, आपल्याला
जास्तीत जास्त सहवास कसा घेता येईल? दोन शब्द कसे ऐकायला मिळतील? ते दोन शब्द ऐकून आपल्याला
समाधान कसे करता येईल? आजचा जो दिवस आहे तो गुरुदर्शनापेक्षा सुद्धा गुरुभेटीचा दिवस
असतो. ज्या भक्तांच्या मनामध्ये, ज्या शिष्यांच्या मनामध्ये, अशी सतत भावना आहे की,
हा दिवस केव्हा येतो आणि त्या चरणांना मी केव्हा स्पर्श करतो! अशी भावना ज्यांच्या
मनामध्ये उत्कटपणे निर्माण झाली आहे त्या शिष्यांची पापे खरोखरीच नाहीशी होतात; मग त्या
शिष्यांचा दर्जा काय आहे त्याचा विचार ह्या ठिकाणी केला जात नाही.
आपल्यावर जो परिणाम होतो तो दर्शनानेतर होतोच पण उपदेशानेसुद्धा होतो. आजच्या दिवसाचे महत्व
म्हणजे प्रत्येकाने एक नियम करायचा असतो आणि तो नियम निरंतर कसा टिकवता येईल याची प्रत्येकाने काळजी
घेतली पाहिजे. मनुष्य म्हटला म्हणजे आपल्यामध्ये काय दोष आहेत, आपल्या विचारांमध्ये,
मनामध्ये काय कमतरता आहे किंवा उणेपणा आहे हे सगळ्यांना समजत असावे. दुर्गुणाचा एक विशेष
महत्वाचा भाग असा की, दुर्गुण हे प्रयत्नपूर्वक सोडावे लागतात. आपोआप सुटत नाहीत. आपण
पवित्र कसे होऊ याचा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि आपल्या ठिकाणी असलेले दोष,
गुरुपूजनाच्या वेळी म्हणजे चरणांवर डोके ठेवताना, कसे कमी होतील याची काळजी घेतली पाहिजे.
माझ्या कल्पनेप्रमाणे ज्यांनी ज्यांनी पूजन केलेले आहे, ज्यांनी चरणावर डोके ठेवलेले आहे त्यांच्या
अंतःकरणात हा भक्तीचा भाव उत्पन्न होणे आवश्यक आहे.