कुकडेवाडा ते श्रीदत्तात्रेय निवास
परमपूज्य श्री गुरूदेवांचा बराचसा गौप्यकाळ हा कुकडेवाड्यात व्यतीत झाला. हा काळ अंदाजे
१५-१६ वर्षांचा असेल. ईश्वरीप्रचिती येऊन सुद्धा मौन धारण करून अत्यंत कठोर परिस्थितीला
सामोरे जाण्याचा हा काळ होता.
कुकडेवाड्यात गच्चीवर दोन खणांच्या खोलीत एका खणात देवघर व मग एक कोपरा गुरुदेवांकरिता
वापरला जाई. निम्म्या पुढच्या भागात चटयांवर दर्शनार्थी भक्तांना बसायची सोय होती.
एका वेळी फक्त ५-६ जण बसू शकत. अनेक भक्त दृष्टांत होऊन दर्शनाला येऊ लागले. हळूहळू
भक्त परिवार वाढू लागला. उत्सवाला जागा अपुरी पडू लागली.
या दिवसात एकदा एका वेदमूर्तींच्या रुपात अहमदनगरच्या सर्जेपुरा भागातील "दक्षिणामुखी
मारुतीराय" आले. गुरुदेवांनी त्यांना ओळखले "लवकरच आपण स्थलांतर
कराल." आता आपल्या कामाचा विस्तार खूप वाढणार आहे. विहिरीतून
थेट समुद्रात उडी घेतल्यासारखे होईल. "तुमची कीर्ती उदंड वाढणार आहे."
असा आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. समर्थ रामदासस्वामी, श्रीधर स्वामी आदी महाविभूतींनी
गुरुदेवांना भेट देऊन दर्शन दिले तेही कुकडे वाड्यातच!
काही भक्त मंडळी एकत्र येऊन विचार विनिमय करू लागली आणि शेवटी नगरच्या उत्तरेस सावेडी
भागात मोठी जागा घेऊन बांधकाम करायचे ठरले. देवांकरिता मधोमध स्वतंत्र देवघर, पुढे
दर्शनार्थी भक्त बसण्यासाठी हॉल, देवघराच्या डाव्या बाजूला एक खोली व स्वयंपाकघर आणि
उजवीकडे दुपारी गुरुदेवांना विश्रांतीला व भक्तांना भेटण्यासाठी छोटी खोली अशी सर्वसाधारण
रचना ठरली.ही वास्तू म्हणजेच "श्रीदत्तात्रेय निवास"
२३ मे १९७४ रोजी कुकडेवाड्यातून श्रीदत्तात्रेय निवासात देवांना पालखीतून नेण्यात आले.
त्या सुवर्णक्षणांची ही अमुल्य छायाचित्रे-