आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


मूर्तीपूजा


|| श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः ||


Dattaguru


मूर्तीपूजेची संकल्पना -
ईश्वरी शक्ती मुळात “निर्गुण-निराकार” रुपात आहे. त्यामुळे तिचे चिंतन-स्मरण करताना मनुष्यजीवाला डोळ्यासमोर तिचे काहीतरी “प्रतिक” असल्याशिवाय ते करता येत नाही. मनुष्याचे मन नित्य सैरावैरा धावत असल्यानेच ते एकाग्र होण्यासाठी, तसेच ईश्वरी शक्तीविषयी वाटणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठीच भगवंताच्या मूर्तीची संकल्पना पुढे आली व पूर्वीच्या ऋषीमुनींनी तपश्चर्येच्यावेळी भगवंतांच्या अनुभवलेल्या एकेक रुपाची प्रतीके म्हणजेच मूर्ती त्यांच्या सांगण्यामधूनच निर्माण करण्यात आल्या. सामान्य मनुष्य निर्गुण-निराकार रुपाची कल्पनाच करू शकत नाही. त्याचमुळे तो अशारितीने प्रथम सगुणाची सेवा करून नंतर निर्गुणाकडे जाऊ शकतो. मूर्ती ही भावना व्यक्त करण्यासाठी एक महत्वाची “साधन” झालेली आहे. मूर्ती समोर एकाग्रपणे बसल्यावर भक्तांच्या “आंतरिक भावनेचा” उदय होऊ लागतो व त्याला त्यातूनच समाधान लाभते. म्हणून मूर्तीशी “यथा देहे, तथा देवे” या तत्वाने “एकरूप” होऊन सेवा केली पाहिजे. मूर्ती “प्राणप्रतिष्ठा” न करता पूजेत नुसती ठेवायची नसते. भक्ताने “भगवंताची मूर्ती” आपल्या प्राणापेक्षा श्रेष्ठ आहे अशा भावनेने मूर्तींची मंत्रयुक्त प्राणप्रतिष्ठा आपल्या भारतीय परंपरेनुसार करायची असते. तसेच “ईश्वरी अनुगृहीत गुरूंच्या” हस्ते मूर्ती स्थापन केल्यास ती मूर्ती “स्वयंभू” समजली जाते. त्याचमुळे इतरांनी मूर्ती स्थापन केली तर ती स्वयंभू होऊ शकत नाही. गणपती, श्रीमहादेव, देवी, यांच्या मूर्ती स्वयंभू असू शकतात. स्वयंभू म्हणजेच “जमिनीच्या उदरातून स्वतःच प्रकटलेल्या मूर्ती. स्वयंभू मूर्ती शक्तीसहित असतात व त्यांची नित्याने सेवा, पूजा-अर्चा करणाऱ्यांना त्या शक्तीचे अनुभव येत असतात. गंडकी पाषाण, शाळीग्राम, काळापाषाण यांमध्ये देव वास करीत असतो म्हणून क्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या मूर्ती त्यापासून तयार केलेल्या असतात. “संगमरवरी दगडाच्या” मूर्तीमध्ये देव वास करीत नाही, हेही लक्षात घेण्यासारखे आहे, हे विसरू नका. (अमृतकण क्र-२७२ / दि-८-९-२००२, पृष्ठ-४ व ५)

आपल्या धर्मातील मूर्तीपूजेचे श्रेष्ठत्व-
आपल्या सनातन वैदिक धर्माची स्थापना साक्षात भगवंतानेच केली असल्याने “धर्म” हे ईश्वराचे सगुण रूप म्हणजेच जीवंत रूप आहे. सामान्य माणसे “धर्म” म्हणजे “कर्मकांड” करीत राहणे असे समजतात. पण ते चूक आहे. “कर्मकांड” हे तसे पहिले तर ते एक कर्तव्यच आहे. हे कर्तव्य केल्यानेच धर्माचे रक्षण केले जाते व ईश्वरी शक्तीची अनुभूती येऊ लागते, याचाच अर्थ कर्मकांड हे ईश्वरी शक्तीकडे जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळेच या धर्मातच दैवी सामर्थ्य अनुभवाला येत असते, हे रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथातून सिद्ध झालेलेच आहे. प्रभू रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण यांनी स्वतः येथे येऊन इतरांचे संरक्षण केलेले दिसून येते. यांना कोणीही शत्रू मारू शकलेला नाही. इतर पंथांचा विचार केला तर प्रत्येक पंथाच्या संस्थापकाची हत्या झालेली दिसून येते. त्यामुळेच आपल्या श्रद्धा त्या शक्तीवर व त्या शक्तीने स्थापन केलेल्या धर्मावर चिरंतन राहिलेल्या आहेत. श्रीमाणिकप्रभूंच्या बाबतीतही असा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग घडला होता. श्रीमाणिकप्रभू हे नित्य सर्वपंथीयांना जेवण देत असत. एकदा इतर पंथीयांनी त्यांना जेवण देण्याची इच्छा व्यक्त केली. ती त्यांनी मान्य केली. परंतु इतर पंथीयांनी त्यांना जे जेवणाचे ताट झाकून आणले होते त्यात मांस, मटन इत्यादी आणले होते. श्रीमाणिकप्रभूंनी ते अन्न शुद्ध होण्यासाठी त्या ताटावर पाणी शिंपडले तेव्हा त्या ताटातील पदार्थांची गुलाबाची फुले झाली हे फक्त या धर्मातच घडल्याचे दिसून येते. ““माझ्या श्रीगुरूंनी म्हणजेच “श्रीनृसिंह सरस्वतींनी“ ६० वर्षाच्या वृद्धेला प्रथम कन्या व नंतर पुत्र दिल्याचे तुम्हाला माहीतच आहे. मी सुद्धा तसेच ६० वर्षापर्यंतच्या पात्र व्यक्तीला ते देऊ शकतो हे तुम्ही लक्षात घ्या.”” आपल्या या धर्माचे वैशिष्ट्य म्हणजे येथेच फक्त “न्याय व नीती” एकत्र दिसून येतात. तसेच केवळ आपल्या ह्या धर्मातच मूर्ती व मूर्तीपूजा दिसून येते. इतर पंथीयांत तसेच परदेशात भोगवादामुळे मूर्तीपूजेत अडथळे येत असतात. त्यामुळे ती माणसे मूर्तीला मानत नाहीत. मूर्ती नाहीत म्हणून त्यांच्याकडे मंदिरेही दिसून येत नाहीत. आपण मूर्तीला मानत असल्याने मूर्तीपूजेमुळे समाजावर बंधने येत असतात. त्यामुळेच आपल्या घरोघरी व मंदिरातूनही मूर्ती स्थापन करून पूजा केल्या जातात. मूर्तीपूजा करण्यासठी पात्रता व मनोधैर्य लागते व ते सर्वांपाशी नसते. (संदर्भ-अमृतकण १५/६/१९९६/ बैठक क्र-१९७)

मूर्ती कशा असाव्यात?
घरात देवपूजा होत नसेल तर मनुष्य स्वैर बनतो, बेफाम बनतो म्हणून नित्यपूजा करणे महत्वाची आहे. माझ्याही देहात ईश्वरी शक्ती प्रगटलेली असल्याने माझा फोटोही घरात/ पूजेत ठेवल्यावर तोही तुमच्या स्वैरपणावर नियंत्रण ठेवत असतो. नित्याच्या घरगूती पूजेबाबत मी तुम्हाला आजपर्यंत अनेकवेळा काही गोष्टी सांगत आलो आहे. त्याचा तुम्ही वरचेवर अभ्यास करा व ते तुम्ही सर्व पाळता का? हे तपासा!
उदाहरणार्थ- तुम्हाला देवघरात “भरीव मूर्ती ठेवण्यास सांगितले होते. कारण “भरीव” म्हणजे पूर्णत्वाला पोहोचलेले, त्या देवतेचे श्रेष्ठ स्वरूप असते. देवघरात देवाच्या तसबिरी किंवा टाक ठेवण्यापेक्षा “मूर्तीच” असाव्यात कारण मूर्तीमधूनच परमेश्वराचा वास “दृश्य होत असतो. पूजेमध्ये टाक असणे, ही सुद्धा कल्पनेचीच पूजा असते. पूजेमध्ये अभिषेक करायचा असेल तर त्यावेळी तेथे मूर्ती असावी. तसबिरीला केलेला अभिषेक उपयोगी येत नाही. त्याचप्रमाणे पूजेमध्ये शक्यतो उजवा शंख असावा आणि तसा नाही मिळाला तर डावा शंखही पूजेमध्ये चालतो. परंतु शंखीण मात्र घरात असू नये. शंखीण ही पसरट असते व तिला मुख नसते. त्यामुळे तिला लगेच ओळखता येते. उजव्या सोंडेचा गणपती तसेच शाळीग्राम ज्यांच्या पूजेमध्ये असेल तेथे पुरुषांनी खूप सोवळे सांभाळून, पवित्र राहून त्यांची पूजा करायची असते. आजही अनेक ठिकाणी तसे घडत नसल्याचे माझ्या लक्षात आले आहे. त्याचप्रमाणे गायत्रीजप कोणीही अधिकार असल्याशिवाय उच्चारूच नका. गायत्री जप करणाऱ्या पुरुषाला “पूर्ण शरीर असावे लागते." तोतऱ्या, कर्णबधीर व्यक्तींनी या मंत्राचे उच्चारण न करता केवळ स्मरण करावे, असे शास्त्र सांगते. घरातील पूजा ही पुरुषांनीच केली पाहिजे. परंतु काही ठिकाणी पुरुषांना वेळ मिळत नसल्याने स्त्रीयाच पूजा करताना दिसतात. अशा वेळी स्त्री गरोदर असेल तर तिने ५ व्या महिन्यापर्यंतच पुजेस बसण्यासाठी शास्त्राप्रमाणे परवानगी आहे, हे लक्षात ठेवा. (अमृतकण क्रमांक-२७४/१७-११-२००२, पृष्ठ क्रमांक-३.)

देवघरात कोणत्या मूर्ती असाव्यात?
तुम्ही सर्वजण संसारी, नोकरी- व्यवसायवाले असल्याने मी तुम्हाला कोणालाही फार मोठी, कडक उपासना करण्यास सांगितलेलेच नाही. त्याशिवाय पूजेमध्येही फार देव वाढविण्यास सांगितलेले नाहीत. सर्वांनी घरात पूजेमध्ये कमीतकमी १ शिवलिंग, १ बाळकृष्ण, १ गणपती,१ अन्नपूर्णा व कुलस्वामिनी यांच्या भरीव मूर्ती ठेवाव्यात असे सांगितलेले आहे. धातूच्या मूर्ती, पोकळ किंवा त्यात दुसरे धातू मिसळलेले/ भरलेले असण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो काळ्या पाषाणाच्याच मूर्ती पूजेमध्ये ठेवा. गणपतीची मूर्ती शास्त्राप्रमाणे तयार मिळू शकली नाही तर तशी बनवून घ्या. शास्त्र पाळण्याचा प्रयत्न कराच.
अमृतकण क्र-२७२ / दि-८-९-२००२, पृष्ठ- ५


Dev


श्रीदत्तात्रेय निवासातील मूर्तींची काळजी व परमपूज्य श्रीगुरुदेवांची दूरदृष्टी-
परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, "मला दूरदृष्टी असल्यामूळे आतापासून ह्या बाबत काळजी घ्यावी लागते. देवघरात मूर्तीची एकदा प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून इतर मूर्ती सोबत ह्याची पूजा-अर्चा व्यवस्थित चालू होते. पूजा अर्चा करणाऱ्याने मन लाऊन पूजा करावी. उगाच कोठेही काटकसर व कंजूषपणा करू नये तरच मूर्ती संतुष्ट होतील. आपल्या देवस्थानाबद्दल मी सांगतो कि देवाच्या सर्व मूर्ती, पादुका, दागिने, देवघरातील सर्व महत्वाच्या वस्तू या क्षीरसागर घराण्याच्या असाव्यात पूजा-अर्चा, केशर, कस्तुरी, अत्तर व इतर सर्व वस्तू ट्रस्टने पुरवाव्यात, हा खर्च ट्रस्टने करावा.
जर देवघरातील मूर्ती संतुष्ट झाल्या, तरच देवस्थानची भरभराट होईल. जी तुम्ही पहात आहात व अनुभवत आहात. देवघरातील देवावर व इतर कोण्याही वस्तूवर इतर कोणाचाही नको. ट्रस्टला पाहिजे तर त्यानी त्यांच्या मालकीच्या इतर मूर्ती विकत आणाव्यात व वरच्या हॉल मध्ये ठेवाव्यात. ट्रस्टने त्यांची पूजा करावी. परंतु परंपरागत देवाच्या मूर्ती, पादुका व इतर हे सर्व आमच्या म्हणजे क्षीरसागर घराण्याच्या ताब्यातच असाव्यात. दुसरे म्हणजे मी बालपणापासून मी ह्या सर्व मूर्तींवर मन लावून पूजा-अर्चा करींत आलो आहे. सर्व सोपस्कार व्यवस्थित चालू आहेत. म्हणून पुढे येथे क्षेत्र निर्माण होऊ शकेल.
जर ट्रस्टी लोकांनी त्यांच्या मालकीच्या नवीन मूर्ती विकत घेतल्या व इतरांकडून त्यांची पूजा-अर्चा चालू केली तर आमच्या एवढे कडक आचार व पावित्र्य तेथे राहणार नाही. त्यात देवत्व निर्माण होणार नाही. आज मी ट्रस्टी आहे, म्हणून कोणीही बोलू शकणार नाही. माझ्या गैरहजेरीत इतर कोणीही ट्रस्टी येणे शक्य आहे. ते लोक आमच्या घराण्यातील लोकांना सांगतील कि तुम्ही पुजारी नको, किंवा ब्राह्मण म्हणूनही नको. असे घडू नये म्हणून मी ही घडी घालून देत आहे. जर ट्रस्टच्या ताब्यात परंपरागत देव पादुका व इतर महत्वाच्या वस्तू गेल्या तर फार पंचाईत होईल म्हणून मी दूरदृष्टीपणा वापरून परंपरागत मूर्ती पादुका व इतर महत्वाच्या वस्तू क्षीरसागर घराण्याकडे राहतील अशी व्यवस्था करीत आहे.
जर कोणीही या परंपरागत देवांच्या मूर्तींची पूजा-अर्चा करू लागले तर तेवढे पावित्र्य व तेज या मूर्तीत राहणार नाही. नंतर कोणालाही त्रास होऊ नये म्हणून मी योजना करीत आहे.
बाहेरगावच्या एका प्रसिद्ध आश्रमात असा वाद निर्माण झाला होता. तेथे मंदिरातील मूर्ती ट्रस्टच्या मालकीच्या आहेत व ब्राह्मण फक्त पुजारी म्हणून आहेत. स्वामी हयात असताना त्यांकडील दिव्य शक्तीमुळे हे स्थान फार भराभर पुढे आले व प्रसिद्ध झाले. स्वामींचे महानिर्वाण झाल्यानंतर काही दिवसांनंतर ब्राह्मण पुजारी व ट्रस्टी मध्ये वाद सुरु झाला. ब्राह्मणांचे म्हणणे होते कि, स्वामींच्या हयातीपासून मागील कित्येक वर्षे परंपरेने ते लोक पूजा करीत होते. म्हणून देवत्व प्राप्त झालेल्या देवांच्या मूर्ती त्यांच्या ताब्यात रहाव्यात परंतु ट्रस्टींचे म्हणणे होते कि, मूर्ती त्यांच्या आहेत. त्यांनी मूर्ती खरेदी पावत्या दाखविल्या. केस कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टापर्यंत हा वाद गेला. पावत्यामुळे ट्रस्टच्या बाजूने निकाल दिला गेला.त्या ट्रस्टीने जुन्या ब्राह्मण पुजाऱ्यांना बदलून त्या ठिकाणी नवीन ब्राह्मण पूजारी नेमले. या पुजाऱ्यांना त्या मूर्तीबद्दल तेवढी आत्मीयता राहिली नाही. एका कार्यक्रमाप्रमाणे फक्त पूजा-अर्चा करून निघून जातात. या ठिकाणी जर घराण्यातील पूजारी असते तर स्वतःचे देव म्हणून आत्मीयतेने पूजा करतील. नवीन पूजाऱ्यांना मूर्तींची परंपरा व इतिहास वगैरे कशाचीही माहिती नाही.
आपल्या आश्रमात येणाऱ्या काही लोकांची अपेक्षा आहे कि, परंपरेचे देव व पादुका त्यांच्या ताब्यात असावेत. मी पुन्हा खुलासा करतो की, परंपरेचे देव व पादुका हे आमच्या क्षीरसागर घराण्यांकडेच राहणार आहे. हे लक्षात ठेवावे. ज्या घराण्यात माझा जन्म झालेला आहे. व्यवहार दृष्टीकोनातून या घराण्यात पूजा राहावी. म्हणून मी आतापासून घराण्यातील लोकांना तयार करत आहे. पूजा-अर्चा त्यांचेकडेच सोपविणार आहे. इतर कोणीही अपेक्षा करू नये. भविष्यात ज्यांना नवीन मंदिर स्थापन करावयाचे असेल त्यांनी वरील गोष्टींचा अवश्य विचार करावा व नीट व्यवस्था करावी म्हणजे भविष्यात वाद विवादाचे प्रसंग येणार नाहीत! (अमृतकण क्रमांक- १५३, ता. १५-१०-८४/ वेळ रात्री-८ ते ९ वा.)


Gurudev Low


इष्टदेवता/ ग्रामदेवता/विश्वदेवता- आपल्याकडे कुलदेवतेप्रमाणे “इष्टदेवता, ग्रामदेवता व विश्वदेवते”लाही मनुष्य जीवनात खूप महत्व आहे.
इष्टदेवता- ही खरे पाहता प्रत्येकाची वेगळी व स्वतःपुरतीच असते. भक्त जेव्हा कुलदेवतेशिवाय व ग्रामदेवतेशिवाय वेगळ्याच देवतेची मनापासून भक्ती करतो तेव्हा तिला “इष्टदेवता” म्हणतात.
ग्रामदेवता- ही गावातील सर्व समाजाची सर्वानुमते एकच देवता असते. गावातील सर्व व्यक्ती नित्याने तिचे दर्शन घेऊन उपासना करत असतात. अशी देवता गावाच्या वेशीवर किंवा गावाच्या बाहेर स्थापन केलेली असते व ती संपूर्ण गावाचे रोगराईसारख्या संकटांपासून संरक्षण करत असते. काही गावांमध्ये/शहरांमध्ये दोन-दोन ग्रामदेवता दिसून येतात. यातील एका देवतेचे स्थान गावाच्या वेशीवर नाहीतर गावाबाहेर संरक्षणासाठी असते तर दुसऱ्या ग्रामदेवतेचे स्थान गावाच्या-शहराच्या मध्यावर असते. ही देवता गावातील सर्वांना “ज्ञान-बोध” देत असते. म्हणून या दुसऱ्या ग्रामदेवतेला “ज्ञानदैवत” म्हणतात. ज्ञानदैवत हे गणपती, शिव इत्यादींच्या रुपात असते.
विश्वदेवता- कलियुगात, मनुष्याने ईश्वरी शक्तीला विसरू नये म्हणून पूर्वी ऋषीमुनींनी भारतात निरनिराळ्या ठिकाणी जाऊन, तपश्चर्या करून मंदिरे व क्षेत्रे निर्माण केली आहेत. त्यांना “विश्वदेवता” म्हणतात. त्यामुळेच तेथे ईश्वरी शक्तीचा वास कायम अनुभवायला येतो. या विश्वातील तेथे दर्शनाला येणाऱ्या सर्वांचे “रक्षण व पोषण” या देवता करत असतात म्हणून यांना “विश्वदेवता” म्हणतात. पूर्वीच्या काळी बहुतेकांच्या कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता एकच असत. पण हल्ली मात्र वेगळेच दृश्य दिसू लागले आहे. हल्ली खूप जणांना स्वतःची ग्रामदेवता व कुलदेवताही ठाऊक नसतात. प्रत्येकजण आपल्या इष्टदेवतांवर खूप श्रद्धा ठेऊन असतो. त्यामुळे निरनिराळ्या वाटणाऱ्या या सर्व देवता एकाच मूळ शक्तीची रूपे असतात, हेही तो विसरून जातो आणि तो खूप वेळा इतरांच्या इष्टदेवतांपेक्षा आपलीच इष्टदेवता श्रेष्ठ मानत राहतो, हे लक्षात घेण्यासारखे आहे. म्हणून याच्याच उलट, ज्या व्यक्तींची “कुलदेवता, ग्रामदेवता व इष्टदेवता” ही एकच असते ते खूप भाग्यवान असतात. कारण त्यांची संपूर्ण श्रद्धा-भक्ती एकाच देवतेपाशी स्थिर झालेली असते. (अमृतकण क्रमांक- २७८ / दिनांक- २३-०३-२००३/ पृष्ठ क्र-३)

मूर्तींचे साक्षीत्व-
हल्ली खूप मंदिरात संगमरवरी पाषाणाच्या भगवंताच्या मूर्ती दिसून येतात. परंतु अशा मूर्तीमधून भगवंताचे “साक्षित्व” येत नसते. भगवंताचे साक्षित्व अनुभवायचे असेल तर मूर्ती ही देवपाषाणाची म्हणजे काळ्यापाषाणाची असावी लागते. पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर एवढेच नाही, तर तिरुपती येथे सुद्धा भगवंताच्या मूर्ती काळ्या पाषाणाच्या असल्यानेच आजही तेथे भगवंताचे साक्षीत्व अनुभवास येते. संगमरवरी मूर्तीपेक्षा भरीव धातूच्याही मूर्ती पूजेसाठी योग्य असतात. आपल्या आश्रमातीलही मूर्ती काळ्या पाषाणाच्याच असल्याने येथेही साक्षीत्व अनुभवास येत असते. येथील मूर्ती पूजेच्या वेळी त्यांना अत्तर लावल्यावर ते अत्तर शोषून घेत असतात. काळा पाषाण हा गंडकी नदीमध्ये सापडत असतो त्यामुळे त्याला “गंडकी पाषाण" असेही म्हणतात. जो काळा पाषाण नदीमध्ये प्रवाहात तरंगतात दिसतो असाच पाषाण मूर्ती तयार करण्यासाठी योग्य समजला जातो. आपल्या देवस्थानातील मूर्तीं अशाच पाषाणापासून बनविल्या आहेत. त्यामुळे काही वेळा या मूर्ती पूजा झाल्यावर त्यांच्या स्थानापासून थोड्या थोड्या सरकलेल्या दिसतात. पाण्यात तरंगणाऱ्या काळ्या पाषाणापासून या मूर्ती बनवल्या आहेत त्यामुळे असे घडत असते. पूजा करताना किंवा नमस्कार करताना भक्ताने तेथील फुलांचा वास घेऊ नये तसेच त्याचा श्वासही मूर्तीवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. भगवंताची नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून स्थापन करायची असेल तर ती “उत्तरायण” चालू असताना करावी. दक्षिणायनाच्या काळामध्ये भगवंत विश्रांती घेत असतात. पूजेच्या वेळी आपण प्रत्येक देवाला फुले तसेच तुळस, बिल्वपत्र आणि दुर्वा वाहत असतोच. आपल्या देवस्थानातील पादुका या दत्तात्रेयांच्या असल्यानेच येथे “हरी व हर” एकत्र रूपाने आहेत. त्यामुळे या पादुकांचेवर तुळशीपत्राबरोबरच “बिल्वपत्रही” वाहीले तर चालते. (अमृतकण क्र-२१२/दि-२०-०९-१९९७/ पृष्ठक्र- ८)

टाक/ मृत व्यक्तींच्या मूर्ती-
अनेकजण आपल्या आई-वडिलांचे टाक करतात व त्यांची कायम आठवण राहावी, या भावनेने देवघरात ठेवतात. असे करू नका. प्रत्येकाला आपले आई-वडील श्रेष्ठ वाटणे स्वाभाविक आहे. ते जीवंत असेपर्यंत त्यांची भरपूर सेवा करा. पण एकदा मृत झाले की त्यांचा व तुमचा काहीही संबंध राहात नाही. नंतर ते तुम्हाला ओळखत देखील नाहीत. कोणी कोणी घराण्यातील कर्तबगार पुरुषांचे टाक करतात, तसेही करू नका. जर आमची अशा भक्तांशी भेट झाली तर आम्ही त्याला सांगतो व सुधारतो. पण आम्हाला प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याचे देवघर तपासता येणार नाही.
*पुष्कळ लोक तीर्थक्षेत्री गेल्यावर तेथील आठवण म्हणून टाक विकत आणून पूजेत ठेवतात, त्यांना वाटते देवाच्या नावाचे टाक आहेत, ते कशाला आपले वाईट करतील? परंतु ज्यांची आपण पूजा करणार, त्यांचे स्वरूप अगोदर व्यवस्थित तपासून पाहा, नाहीतर दणके बसतात.
*मृत व्यक्तींची मूर्ती किंवा टाक घरातील पूजेत ठेवू नका व मृत माणसांची समाधी बांधू नका. हे पुढे त्रासदायक ठरते. (अमृतकण क्र-८८ / दि-१-१०-१९८९/ पृष्ठ- ४ व ५)

काही घरांमध्ये पत्र्यावर देव/ देवींचे फोटो कोरलेले असतात. काही काळानंतर हे फोटो खराब होतात. पत्राही झिजतो. अशावेळी नवीन फोटो/ मूर्ती आणून रितसर स्थापना करून नंतर अगोदरचा पत्रा बाजूला काढून घेऊन नदीचे पाण्यात किंवा समुद्रात विसर्जन करावे. (अमृतकण क्र- ५५ /दि- ४-१-१९८७/पृष्ठ-१)

टीप- अतिशय जुन्या अमृतकणांमध्ये असलेली व सहज उपलब्ध न होणारी ही माहिती असल्याने या ठिकाणी सर्वांकरिता उपलब्ध करुन दिलेली आहे. मूर्ती पूजेवरील अधिक सखोल माहिती व मार्गदर्शन गुरुवाणी पुष्प १, पुष्प-२, पुष्प-४, पुष्प-९, पुष्प-१०, पुष्प-१५ तसेच सद्गुरु संवाद या ग्रंथात आहे. आपल्या दैनंदिन प्रापंचिक अडचणींचे कारण बहूतेकवेळा आपल्याच घरात/ देवघरात सापडते. सदर ग्रंथसंपदेतील परमपूज्य श्री गुरुदेवांच्या अमूल्य मार्गदर्शनाचा लाभ घेऊन चिंतामुक्त जीवन अनुभवावे.


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy