नमस्कार कसा करावा
परमपूज्य गुरुदेव श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी “नमस्कार कसा करावा?”
या बद्दल केलेली हितगुज ....
देव आई-वडील व गुरु यांना सर्वांनी साष्टांग नमस्कार घालणे आवश्यक असते कारण त्यांचे
माणसावर कधीही न फेडता येण्यासारखे कायम ऋण असतात. साष्टांग नमस्कार करण्यामध्ये मोकळ्या
जागेची किंवा भक्ताची शारीरिक तक्रार असेल तर उभ्यानेच दोन्ही हात जोडून नमस्कार करावा
व अशावेळी दोन्ही हातांचे अंगठे उभे नसावेत तर ते खाली मिटलेले असावेत आणि मानही खाली
वाकलेली असावी. खाली गुडघ्यावर बसून नमस्कार करायचा असेल तर उजवा हात उजव्या पायावर
व डावा हात डाव्या पायावर ठेवून मग मस्तक पायावर टेकवावे. "जमिनीवर गुडघे व हात
टेकवून मस्तक ठेवण्याची पद्धत आपल्या धर्मात नाही."
नमस्कार करताना काहीजण स्वतःच्या तोंडात मारून घेतात, नाक घासतात किवा जोरात देवाच्या
नावाचा जयघोष करतात हे फार दिखाऊपणाचे असते. तसा दिखाऊपणा कोणीही करू नये. हल्ली नमस्कार
हा प्रकार कमी होऊन “हातवारे” करणे सुरु झाले आहे. त्यात लहान-मोठा हा
प्रकार पाहिला जात नाही. तसेच स्त्री-पुरुष हा सुद्धा भेद राहिलेला दिसत नाही.
गुरूंना साष्टांग नमस्कार घालण्याची “प्रथा”, “शिस्त” मी माझ्या
भक्तांना लावलेली आहे. साष्टांग नमस्कार म्हणजे “मी पूर्ण शरणांगत आलो आहे”
अशी भावना त्यामागे असते. चरणांना हात लावणे म्हणजे “चरणी शरण आलो आहे, आता आश्रय
द्यावा.”
स्त्रियांनी पुरुषांच्यासारखा कधीही साष्टांग नमस्कार घालायचा नसतो. त्यांनी गुडघे
टेकवून नतमस्तक केले तरी साष्टांग नमस्कार समजावा.
संदर्भ-अमृतकण,
|| भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ, मुंबई. ||
बैठक क्रमांक-२४०
दिनांक-२२-१-२०००