आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


॥ श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ॥

॥ उपासना आदिशक्तीची ॥

नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून घरोघरी साजरा होणे आवश्यक आहे. आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदैवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्या घरावर व कुटुंबियांवर कृपाछत्र असावे आणि अदृश्य शक्तिंपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितले आहे.

नवरात्रोत्सवात आपण जगदंबेची उपासना करतो. जगदंबा ही आदिशक्ती आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्या ठिकाणी असलेली मूळ शक्ती एकत्र येऊन या जगदंबेचे म्हणजे आदिशक्तिचे रूप निर्माण झाले आहे. ह्याच आदिशक्तीने वेळोवेळी देवदेवतांना सहाय्य करून राक्षसांचा व दुष्ट प्रवृत्तींचा नाश केला आहे. ही आदिशक्ती अत्यंत प्रभावी आहे. तिची भारतात अनेक ठिकाणे आहेत. जरी ती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रूपांत वास करीत असली तरी देवीचे मूळ स्वरूप एकच आहे.

गुरूभक्ती व जगदंबेची सेवा एकच आहे. दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. याचा मला एक दृष्टांत झाला. मी श्री क्षेत्र गाणगापूरला गेलो व झरोक्यातून श्रीगुरूंचे दर्शन घेत असताना मला त्या ठिकाणी श्रीगुरूमूर्ती दिसण्याऐवजी एक सर्वांग सुंदर व लावण्यवती अशी स्त्री दिसली. क्षणभर वाटलेकी स्त्रियांना आत प्रवेश नसताना ही अशी आगळ्या वेगळ्या स्वरूपातील स्त्री कशी काय आत आली? काही काळ हे असे चित्र दिसल्यानंतर त्या स्त्रीचे रूपांतर श्रीगुरूंमध्ये झाले.

आपली भारतीय परंपरा ही शक्तीची उपासना करण्याची आहे. आजपर्यंतच्या अनुभवातून तरी भारतावर आलेली निरनिराळी संकटेया आदिशक्तीच्या सेवेतूनच दूर झाली आहेत. महाभारताचे युद्ध होण्यापुर्वी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दुर्गेचे स्मरण करण्यास सांगितले. आपण सामान्य लोकांनीही तिची पूजा-अर्चा केली पाहिजेव तिला प्रसन्न करून घेतले पाहिजे.

॥ शक्तिपीठ ॥
भारतात देवीची एकूण सोळा शक्तिपीठे आहेत. त्यांतील साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्रांत आहेत. कोल्हापूर, तुळजापूर, माहूर व वणी ही साडेतीन शक्तिपीठे समजली जातात. ही पीठे वेगवेगळ्या देवींची असली तरी मूळ शक्ती एकच आहे. जिज्ञासूदृष्टीने पाहायचे असेल तर जेथे देवीला शेंदूर असेल ते रूप पार्वतीचे समजावेव जेथे कुंकू लावले असावे ते लक्ष्मीचे रूप समजावे.

कोल्हापूरचे मंदिर श्रीयंत्रावर उभे केलेले आहे. मंदिराचे खांब मोजता येत नाहीत. कोल्हापूरची देवी शिवस्वरूप आहे. तिच्या मस्तकावर शिवलिंग आहे. तिच्या वरच्या दोन हातात गदा व ढाल आहे तर डाव्या हातात महाळूंग(एक प्रकारचे फळ) आहे. खालच्या उजव्या हातात भोजनपात्र आहे. कोल्हापूरच्या देवीचे लक्ष्मीचे व तुळजापूरच्या देवीचे दूर्गेचे रूप आहे. श्रीरामाला अरण्यात जात असताना ह्याच भवानी देवीने मार्गदर्शन केले म्हणून तिला 'रामवरदायिनी' म्हणतात. परशूरामालाही तिनेच मार्गदर्शन केले होते. शिवाजी महाराजांना भवानी मातेने तलवार दिली. या भवानी देवीची चलमूर्ती (मूर्तीची जागा बदलता येते) आहे. नवरात्रोत्सव झाल्यानंतर देवीला चार दिवस विश्रांतीसाठी बिछानाघरात झोपवतात.

माहूरची रेणुका देवी ही पार्वतीचेरूप आहे. इथे देवीचे सर्वांग नसून फक्त मुखवटा आहे. त्यामुळे देवीचे मुखपूजन होते. हे अतिशय पवित्र ठिकाण आहे.

वणीच्या देवीचे डोंगरामध्ये स्वयंभूरूप आहे. डोंगरात असल्याने तिचे दर्शन पूर्वी दूर्लभ होते, परंतु आता वाहनानेवर पर्यंत जाता येते. हे देवीचे पार्वतीचे रूप आहे. मार्कंडेय ऋषी काय बोलत होतेतेती कानाला हात लावून ऐकत आहे; अशी ती मूर्ती आहे. मूर्तीला अठरा भूजा आहेत. देवीला अठरा वाराचे पातळ लागते.

सगळ्या देवी या शक्ती देवता आहेत. मानव जातीचा उद्धार करण्यासाठीच त्या शक्तीने निरनिराळ्या काळांत तशी रूपे घेतली आहेत. खरे पाहता सर्व देवींचे रूप कुमारीकेचे आहे, याचा अर्थ त्या पाच ते आठ वर्षांच्या आहेत. परंतू आपण त्यांना मान देण्याच्या उद्देशाने सौभाग्यलंकार म्हणजेच साडी, मंगळसूत्र, जोडवी व खणा नारळाने ओटी भरत असतो. जर देवी कुमारीकेचे रूप आहे तर देवीला कुमारीकेची वस्त्र अर्पण केली तरी चालण्यासारखे आहे.

।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy