आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


पाद्यपूजा


।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।


हंसाभ्यां परिवृत्तपत्रकमलैर्दिव्यैर्जगत्कारणै-
र्विर्श्वोत्कीर्णमनेकदेहनिलयैः स्वच्छंदमात्मेच्छया।
तद्‍द्योतं पदशांभवं तु चरणं दीपाङ्कुरग्राहिणम्
प्रत्यक्षाक्षरविग्रहं गुरुपदं ध्यायेद्विभुं शाश्वतम् ||

“विश्वातील चराचरांची अनेकविध देहरूपी निलये म्हणजेच निवासस्थाने हीच हं व सः अशा वर्णांनी युक्त अशी जगदुत्पत्तीचे कारणच अशी दिव्य कमळे आहेत. त्यांच्या माध्यमातून ज्या गुरुचरणांनी हे विश्व स्वेच्छेने व आनंदाने व्यापले आहे व जे गुरुचरण शंभूचरणांप्रमाणे शाश्वत, दीपज्योतीप्रमाणे प्रकाश देणारे तेजस्वी आहेत, जे वैभवशाली प्रत्यक्ष मूर्तिमंत, अक्षर, दिव्यदेहच आहेत त्या गुरुचरणांचे आपण ध्यान करूया.”
ईश्वराने अव्यक्त रूप धारण केल्यावर त्यांच्यापुढे प्रश्न पडला की मानवी जीवाला सुख लाभण्यासाठी त्याला योग्य मार्गावर ठेवण्यासाठी काय करावे.? कारण त्याला जरी ज्ञान आणि बुद्धी दिली असली तरी कित्येक वेळा त्याच्या ठिकाणी संभ्रमावस्था निर्माण होईल अशावेळी ईश्वराची अव्यक्तशक्ती त्याला कसे मार्गदर्शन करेल? म्हणून भगवंतांनी पुन्हा मानवी स्वरुपात जन्म घ्यायचे ठरवले. त्याचप्रमाणे ते मानवी रुपात जन्म घेऊन गुरुपदावर आरूढ झाले व भक्तांना मार्गदर्शन करू लागले. तेव्हापासून सुरु झालेली ही संन्यासपरंपरा आजपर्यंत चालू आहे. ती कधी व्यक्त स्वरुपात तर कधी अव्यक्त स्वरुपात मानवाचे कल्याण करीत आहे. जेव्हा जेव्हा सृष्टीची घडी विस्कटते तेव्हा ही शक्ती मानव रुपात गुरुपदावर आरूढ होते व परत नीट व्यवस्था लावून देते आणि पुन्हा अव्यक्त होते. “दीपासी दीप लाविजे” अशी ही परंपरा अव्याहत चालू आहे. अनादिकालापासून ही परंपरा आहे. अनंतकाळाचा विचार केला तर या परंपरेतील गुरूंना प्रत्यक्ष शिवाचा अनुग्रह प्राप्त होणे ही परंपरा प्रत्यक्ष शिवापासूनच सुरु झाली.

गुरुरेव जगत्सर्वं ब्रह्माविष्णु शिवात्मकः |
गुरोःपरतरं नास्ति तस्मात्संपूजयेद्गुरुम् ||


Paduka


श्रीगुरु म्हणजेच ब्रह्मा, विष्णु, शिवात्मक! अर्थात् उत्पत्ती, स्थिति आणि लयात्मक सर्व जगत् आहे. गुरूंपेक्षा श्रेष्ठ असे काहीही नाही, म्हणून गुरूंचे योग्य पूजन करावे. श्रीगुरुंचे स्मरण, चिंतन सामान्य माणसाकडून कसे होईल याची चिंता सद्गुरूंना असते. प्रत्यक्ष भगवंताचा स्पर्श होण्यासाठी फार मोठी तपश्चर्या लागते. त्याचे नियम फार कडक आहेत. आचरण फार सांभाळावे लागते. पावित्र्य सांभाळावे लागते. कठीण परीक्षांना तोंड द्यावे लागते. सामान्य माणसाची तेवढी क्षमता नाही. मग अशा भक्तांना सद्गुरूंचा परिसस्पर्श व्हावा, त्यांच्याकडून गुरुचरणांचे पूजन व्हावे म्हणून आपल्या सद्गुरूंनी भगवंताची मिनतवारी करून मोठ्या मुश्किलीने पाद्यपुजेची परवानगी घेतली. श्रीगुरुचरण म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचे चरण. भगवंताने उन्मत्त अहंकारी बळीराजाला या चरणानेच ढकलले पाताळात तेव्हापासून या चरणांचे महत्व फार आहे. प्रभूरामचंद्राने पादस्पर्शाने अहिल्येचा उद्धार करून तिला शापमुक्त केले. श्रीरामांनी भारताला पादुका दिल्या व सांगितले की याला स्पर्श करत जा म्हणजे मला स्पर्श केल्याचा अनुभव येईल. श्रीगुरुंच्या चरणाचा धुलीकणही या संसारसागारातून तरुन जाण्यास आपल्यासाठी एखादा सेतू सारखा ठरतो. त्यांच्या चरणसेवेने पापापासून मुक्ती मिळते.

काशीक्षेत्रं तन्निवासो, जान्हवी चरणोदकम् |
गुरुर्विश्वेश्वरः साक्षात्, तारकं ब्रह्मनिश्चितम् ||

गुरु जेथे राहतात ते काशीक्षेत्र व त्यांचे चरणोदक हीच गंगा. गुरु हेच साक्षात विश्वनाथ व गुरु हेच तारक आहेत. म्हणूनच आपल्या सद्गुरूंनी अतिशय कठोर तपश्चर्या करून येथे ‘श्री दत्तात्रेय निवास’ निर्माण केले आहे. भक्तांना काशीमध्ये श्रीविश्वेश्वराचे दर्शन घेण्याचा आनंद दिला. इथे ईश्वराचे अधिष्ठान निर्माण करून लोकांना आश्रय दिला. हे शक्तीपीठ आहे प्रत्यक्ष आई जगदंबा प. पू. सद्गुरूंच्या आसनावर विराजमान झाली आहे. इथे प्रत्यक्ष श्रीगुरुंचे चरण उमटले आहेत. ही प्रसाद पाऊले प्रथम नृसिंह वाडीच्या पुजाऱ्यांनी पाहीली आणि ही भगवंताची खूण ओळखली. कारण नृसिंहवाडीला असेच चरण पाषाणावर उमटले आहेत. यातील एक चरण किंचित मोठे आहे. सन १९८२ मध्ये शृंगेरीपीठाधीश्वर जगद्गुरू अभिनव विदयातीर्थ महास्वामी महाराजांनी या पादुका पाहिल्या त्यातून निघणाऱ्या दिव्य किरणांची अनुभूती घेतली व त्या चिंतामणी पादुकांना त्रिवार नमस्कार केला. इथे ईश्वराचे अधिष्ठान आहे हे मान्य केले. प्रत्यक्ष जगद्गुरूंनी इथल्या गृरुस्वरूपाची ओळख जगाला सांगितली. या पादुका प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय आहेत.
सर्व भक्तांना पादुका पूजनाचा अनुभव घेता यावा, त्याद्वारे त्यांचे कल्याण व्हावे म्हणून परमपूज्य सद्गुरूंनी आपल्या आश्रमात चांदीच्या पादुका बनवून घेतल्या. त्यांना कोठेही डाग नाही. त्यामध्ये गाणगापूरच्या निर्गुण पादुकांचे कवच घातले आहे आणि त्या बनविताना विशेष काळजी घेतली आहे. परमपूज्य सद्गुरू जेव्हा दर्शन गृहात बसत तेव्हा समोरच या पादुका ठेवलेल्या असत. भक्त त्या पादुकांना हार घालत, त्यांच्यावर मस्तक ठेवून दर्शन घेत. त्या पादुकांची पूजा ते भक्तांकडून करून घेत असत. ते स्वतः व्यक्त स्वरूपात असल्याने स्वतःची पाद्यपूजा ते कधीही करवून घेत नसत. त्यांच्या गुरुपरंपरेचा ते अभिमान बाळगत व त्या परमगुरूंच्या पादुका असल्याने गुरूंच्या समोर नम्र शिष्य भावनेने राहात. इदं न मम या भावनेने ते सर्व त्या भगवंताचे आहे असे सांगत. हा एक आपल्यासाठी आदर्श आहे. परमपूज्य गुरुदेवांच्या चरणांमध्ये ईश्वराची शक्ती वास करून असल्याने ते अतिशय कोमल असतात. हा अनूभव आपल्या प्रत्येकाला पादुकांच्या पूजनाच्या वेळी येतो म्हणून आपण जेव्हा पादुकांचे पूजन करतो तेव्हा- हातातील अंगठी काढून ठेवावी. श्रीगुरूचरणांना ती टोचू नये याची काळजी घ्यावी. श्रीगुरुंच्या पादुकावर मस्तक ठेवताना चष्मा काढून ठेवावा. पादुकांची अतिशय मनोभावे पूजा करावी श्रीगुरुंच्या पादुकांचे पूजनाला जाण्यापूर्वी घरातील देवांना नमस्कार करावा. त्यांनाही त्यासाठी निमंत्रित करावे. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा. पाद्यपूजेसाठी उत्तमोत्तम पूजाद्रव्ये आणावीत. अत्तर, केशर, उदबत्ती उत्तम प्रतीचे असावे ज्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे त्यांनी सुवर्ण अर्पण करावे, रेशमी वस्त्र अर्पण करावे, सुकामेवा, पेढे, त्या ऋतूतील फळे आणावीत. सुगंधी पुष्पे मोगरा, जाईजूई, शेवंती, सोनचाफा, झेंडू, निशिगंध अशी फुले आणावीत. वास नसलेली तगर, कण्हेरी किंवा गलांड इत्यादी आणू नयेत. फुले सुकलेली किड लागलेली नसावी. तुलसी व्यवस्थित देठापासून खूडलेल्या असाव्यात. फुलांची टोचणारी देठे काढून टाकावीत. बेलाच्या पानाच्या मागील दांड्याजवळील टोके काढून टाकावीत. उद्देश हाच की फुले, तुळस, बेल वाहताना ते टोचू नये. कारण त्याचा त्रास प्रत्यक्ष श्रीगुरुंना होतो. ज्यांना पाद्यपूजा करायची आहे पण आर्थिक बाजू कमकुवत आहे त्यांनी दोन टवटवीत सुवासिक फुले आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. देव हा भावाचा भुकेला असतो. श्रीगुरूंची दृष्टी सगळ्यांकडे पाहताना सारखीच असते. ते सगळ जाणतात पण ज्यांची आर्थिक कुवत आहे त्यांनी मोकळ्या मनाने यथासांग पूजा केली तर भक्ताचे वैभव पाहून त्यांना आनंदच होतो. या पादुकांची सेवा आपण अतिशय मनोभावे करावी. आपल्या समोर प्रत्यक्ष सद्गुरू विराजमान आहेत आणि आपण प्रत्यक्ष त्यांच्या चरणांची सेवा करीत आहोत असा भाव ठेवावा. त्या चरणांमधून जी दिव्य किरणे बाहेर पडत असतात त्यामुळे आपल्यातील वासना गळून पडतात. पापबुद्धी नष्ट करतात यामुळेच श्रीगुरुचरण हे सर्व तीर्थांचे माहेरघर असे मानतात. गुरुचरणांच्या अंगठ्याला फार महत्व आहे. ईश्वरी दिव्य शक्ती ही गुरुचरणांच्या अंगठ्यातून नित्य प्रसरण पावत असते. म्हणून दर्शन घेताना अंगठ्याला स्पर्श करावा.


Sadguru Charan


पादुकांची पूजा करताना परंपरेतील सर्व गुरूंची पूजा करण्याचे भाग्य लाभते. कारण ही शक्ती जेव्हा अवतारामध्ये प्रत्यक्ष व्यक्त होते तेव्हा देह जरी वेगळा धारण केला तरी चरण तेच असतात. पूजा करताना श्रीगुरुंना शरण जावे व माझी पात्रता नाही परंतु आपण माझ्याकडून सेवा करून घ्या अशी प्रार्थना करावी. अत्यंत हळुवार भावनेने पूजा करावी. प्रत्यक्ष शिवाची ही परंपरा असल्याने तुमच्या कुलदैवतेचेही स्मरण करावे. जसे हत्तीचे चरण, त्यामध्ये सर्व चरण सामावले जातात. पादुकांची पूजा करताना प्रत्यक्ष श्रीगुरुंना स्पर्श होत असल्याने एक सात्विक आनंद मिळतो. तुम्ही काही मागितले नाही तरी परमपूज्य सद्गुरू जे योग्य ते देताततच. तुमचे अनेक प्रश्न मार्गी लागतात. संकटे आली तरी त्यातून तरून जाण्याची शक्ती प्राप्त होते. तुमच्या चित्ताला एक प्रकारचे समाधान लाभते.
पादुकांचे दर्शन घेताना त्यावर आपला श्वास सोडू नये व त्यावरील फुलांचा वासही घेऊ नये. स्त्रियांनी केस मोकळे सोडू नयेत तर व्यवस्थित बांधून ठेवावेत कारण ते संन्यासी आहेत आणि स्त्रियांच्या केसांचा स्पर्श त्यांना होऊ नये. शक्य असेल त्यांनी उंची रेशमी वस्त्रे घालावीत. ज्यांना स्जाक्य नाही त्यांनी नीटनेटके स्वच्छ धूतवस्त्र नेसावे. दर्शन घेताना लहान मुलांना सांभाळावे. अतिशय श्रद्धेने दर्शन घ्यावे. तुमची आर्थिक परिस्थिती नाही म्हणून पाद्यपूजा करू शकत नाही, इतरांसारखी रोख सेवा अर्पण करता येत नाही असा कमीपणा बाळगू नका. श्रीगुरुंना अवडंबर आवडत नाही. ते सर्व जाणतात. म्हणून आपण अवतरणिका वाचताना म्हणतो- "घेवडा उपटुनि दरिद्रियाचा कुंभ दिधला हेमाचा'' त्याचा प्रत्यय आपणाला नक्की येतो. आपण श्रीगुरूंची सेवा करण्याची त्यांची पूजा करण्याची दुर्दम्य इच्छा मनात ठेवली पाहिजे. तुमची परमपूज्य सद्गुरूंवरील पक्की श्रद्धा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करते. श्रीगुरूपादुकांचे पूजन केल्यावर मात्र सरळ स्वतःच्या घरी यावे. कारण ती जी किरणे आहेत. ती सद्गुरूकृपेची दिव्यकिरणे आपल्या बरोबर आपल्या घरी येतात.


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy