आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


पसायदानाचा अर्थ



आता विश्वात्मके देवे |
येणेवाग-यज्ञे तोषावे |
तोषोनि मज द्यावे पसायदान हे |


आता म्हणजे ज्ञानेश्वरी लेखन पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वर विश्वात्मक असा जो सर्व धर्मातीत देव त्याला विनंती करत आहेत कि त्याने ह्या वांग्मययज्ञाने प्रसन्न व्हावे आणि मला या प्रसादाचे दान द्यावे.

सर्व विश्व हेच माझे घर आहे, नव् हे आपणच सर्व विश्व जो बनला आहे अशा अत्मानुभूतीने संपन्न आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथाना त्यांनी विश्वात्मक हि उपाधी दिली आहे.

यज्ञ म्हणजे निष्काम भावाने केलेले कर्म अशी व्याख्या गीतेने केली आहे. गीतेवरील टीका हा वांग्मय यज्ञ आहे असे ते म्हणतात. या यज्ञाने प्रसन्न होऊन गुरुनी प्रसाद द्यावा असे ते म्हणतात...

जे खळांची व्यंकटी सांडो |
त्या सत्कर्मी रती वाढो |
भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे |


ज जेचा संबंध मागच्या ओवीशी आहे. मला या प्रसादाचेदान द्या कि, असा त्याचा अन्वय लावून येथून पुढे कोणत्या गोष्टी मिळाव्यात त्याचा उल्लेख आहे...

खल म्हणजे दुष्ट, व्यंकटी म्हणजे वाकडे पणा. सर्वप्रथम दुष्टांचे दुष्टपण सुटावे असे मागणे मागितले आहे. त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न होवो असे झाले म्हणजे कोणाशी त्याचे शत्रुत्व राहणार नाही.

सर्व प्राण्यांमध्ये मैत्रीचा व्यवहार होईल. मनुष्याच्या प्रवृत्तीला तो स्वतःच जबाबदार आहे, त्याने स्वतःच स्वताचा उध्दार करायचा आहे असे भगवंत येथे सुचवतात...

दुरितांचे तिमिर जावो |
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो |
जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात |


दुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणजे अंधार, पापरूपी अंधाराचा नाश होवो. सगळ्या विश्वाने स्वधर्मरूप सूर्याच्या प्रकाशात पाहावे मग सर्व प्राण्यांना ज्याला जे हवे असेल ते मिळेल.

पाप म्हणजे काय?

सत्व रज आणि तम या तीन गुणांच्या कमी -अधिक प्राबल्याने मनुष्याचे आचरण बनते. रज, तमच्या जोराने काम आणि त्यामुळे लोभ, मद, मोह, मत्सर हे शत्रूबलवान होतात, मानव पापाचरणास प्रवृत्त होतो. म्हणून स्वधर्म म्हणजे निश्कामवृत्तीने कर्माचरण. हा गीतेचा मुख्य विषय आहे. भागवतधर्माचे सारही हेच आहे.

स्वधर्म आचरणाच्या प्रकाशात सर्वाना पाहिजेते मिळेल असे ज्ञानेश्वर म्हणतात.

वर्षत सकल मन्गली |
ईश्वर निष्ठांची मांदियाळी |
अनवरत भूम्न्डली | भेटतुया भूता|


या पृथ्वीतलावर संपूर्ण मांगल्याचा अखंड वर्षाव करणारा ईश्वरनिष्ठांचा समुदाय सर्व प्राण्यांना भेटो .

श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो त्याचे समाज अनुकरण करतो. त्याच्या वागण्यातून सामान्यांना धर्म कळतो. त्याच्या हृदयातील ज्ञानदिपाच्या प्रकाशात योग्य मार्ग दिसतो. ईश्वरनिष्ठ आपल्या आत्मज्ञानाने पूर्णतया संसाराकडे पाठ फिरवून मुक्त झालेला असतो, पण समाज हिताकरता त्याने कर्मत्याग न करता लोकसंग्रह करीत समाजाचा एक घटक म्हणून जगले पाहिजे .याकरता श्रीकृष्णांनी स्वताचे उदाहरण दिले आहे .गीतेची हीच शिकवण आहे समाजातील सर्वांचेच आचरण शुध्द झाले पाहिजे, तरच ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे मोठा समूह तयार होईल. हे श्री ज्ञानदेवांचे मागणे आहे.

चला कल्पतरूंचे आरव |
चेतना चिंतामणीचे गाव |
बोलते जे अर्णव | पीयूषांचे |


ईश्वर निष्ठांचे वर्णन करण्यासाठी येथे ज्ञानेश्वरांनी तीन काव्यमय उपमा दिल्या आहेत.

जे चालणारे कल्पतरूंचे बगीचे आहेत सजीव अशा चिंतामणीचे गाव आहेत अमृताचा बोलणारा समुद्र आहेत. चल म्हणजे चालणारा. कल्पतरू म्हणजे जेमागाल ते देणारे झाड. पण त्याच्याकडे आपल्याला जावे लागते, तर सज्जन मात्र कल्पतरू तर आहेतच, शिवाय तेच स्वतः तुमच्याकडे येतात. शिवाय ते कल्पतरूप्रमाणे एकच नाहीत, तर त्यांची बागच आहे. चिंतामणी म्हणजे जे चीन्ताल ते देणारा दगड. संतही जे चीन्ताल ते देतात म्हणून ते चिंतामणी आहेत, शिवाय ते सजीव असल्याने देताना योग्य व अयोग्य याचा विवेक बाळगतात, आणि चिंतामणी प्रमाणे ते दुर्मिळ नाहीत, तर त्यांचे समूह आहेत. अमृताचा एक थेंब अमरत्व देतो, संत हे अमृताचा बोलणारा सागर आहेत म्हणून ते सार्या समाजाला अमर करू शकतात.

चंद्रमे जे अलांछन |
मार्तंड जे तापहीन |
ते सर्वाही सदा सज्जन | सोयरे होतु |


येथे संतांची तुलना चंद्र आणि सूर्याशी केली आहे.

जे डाग नसलेले चंद्र आहेत, उष्णता नसलेले सूर्य आहेत, असे सज्जन सर्वांचे सोयरे, नातेवाईक होवोत अशी प्रार्थना ते करतात.

संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. चंद्र चांदण्याचा वर्षाव करून अंधार नाहीसा करतो, तसेच संत स्वधर्म आचरणाने पापाचा अंधार नाहीसा करून मंगलतेच्या चांदण्याचा वर्षाव करतात, चंद्रावर डाग आहेत, पण संतांचे चारित्र्य निर्मल आहे.

सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो, पण तो दाहक आहे, संत ज्ञानाचा प्रकाश देतात पण ते दाहक नाहीत.

अशाप्रकारे गीतेतील तत्वज्ञानाचे मूर्त स्वरूप असे जे संत, त्यांचे श्रेष्ठत्व श्री ज्ञानेश्वर वर्णन करतात.

किंबहुना सर्वसुखी |
पूर्ण होऊनी तिह्नी लोकी |
भजिजो आदिपुरुषी | अखंडित |


स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकातील सर्वांनी सर्व प्रकारे सुखी होऊन त्यांनी आदिपुरुषाची अखंडित भक्ती करावी अशी प्रार्थना ज्ञानेश्वर करतात.

दुष्ट पुरुषाची दुर्बुद्धी नाहीशी होऊन त्याला सत्कर्मात रती उत्पन्न होईल. पापाचा अंधार नाहीसा होऊन स्वधर्माचा सूर्योदय होईल. ईश्वर निष्ठांचे समूह मांगल्याचा वर्षाव करतील. चारित्र्यवान पुरुष सर्व प्राणिमात्राचे सोयरे होतील. असे आदर्श समाजचित्र सुखी जीवनाचा मार्ग आहे. समाजाचे सर्व घटक सदाचरणी झाल्याशिवाय सर्व सुखी होणार नाहीत.

आदिपुरुष म्हणजे परमात्मा. जो हे जाणतो कि परमात्माचे सर्वत्र अस्तित्व आहे, तो स्वतः त्याच्याशी एकरूप होतो. भक्त आणि भगवंत यात भेद उरत नाही. या आदिपुरुषाची पूजा करावी स्वकर्म -कुसुमानि. हेच त्याचे भजन होय.

आणि ग्रंथोपजीविये |
विशेषी लोकींइएये |
दृष्ठादृष्ठविजयेन | होआवेन जी |


आणि विशेषतः या जगात हा ग्रंथ ज्यांचे जगण्याचे साधन, आधार झाला आहे, त्यांना दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही विजय मिळोत.

गीतेत कर्मयोग आणि भक्ती हे परमात्म्यापर्यंत सर्वाना पोहोचण्याचे जे मार्ग सांगितले आहेत त्यासाठी साधनेची, ज्ञान किंवा योग मार्गातील तपस्येची गरज नाही. आपले सामान्य जीवन जगताना गीतेने सांगितलेल्या सत्वगुण युक्त मार्गाने चालले आणि परमात्म्याचे सतत नामस्मरण केले, तर या जीवनात म्हणजे दृष्ठ आणि मरणोत्तर म्हणजे अदृष्ट असे दोन्ही विजय लाभतील असे श्री ज्ञानेश्वर म्हणतात. जीवनात आणि जीव्नोत्तर नैतिकतेने विजयी होणे ह्याला भारतीय तत्वज्ञान जे महत्व देतेतेच त्याचे वेगळेपण आहे.

तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो |
हा होईल दान पसावो |
येणेवरे ज्ञान देओ | सुखिया झाला |


तंव्हा विश्वाचे राजे म्हणले "या प्रसादाचेदान मिळेल ." या वरामुळे ज्ञानेश्वरांना आनंद झाला.

श्री निवृत्तीनाथ गुरुयांना येथे विश्वाचा राजा म्हणून संबोधिले आहे .ते म्हणाले कि हि ग्रंथरचना करताना ज्ञानेश्वरांनी जे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश ठेवला तो सफल होवो. या मराठी भाषेच्या नगरी ब्रह्म विद्या इतकी सर्वांपर्यंत पोहोचो कि जग सुखमय होवो श्रोत्यांनी मन एकाग्र करून या ग्रंथाचे श्रवण केले आणि त्याप्रमाणे आचरण केले तर ते सुखी होतील हे ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा पूर्ण होवो. अशा रीतीने या वाकयज्ञाचा उद्देश पूर्ण झाला म्हणून ज्ञानेश्वरांना आनंद झाला.

।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy