प्रश्न. गुरुचरित्र वाचावे का?
उत्तर. प. पू. महाराजांनी खुलासा केला कि, वेदांच्या मंत्रांमध्ये सामर्थ्य
असते. परंतु वेदांचे सर्व मंत्र संस्कृत भाषेत आहेत. श्री गुरु कृपेने आपल्याला मराठी
भाषेमध्ये गुरुचरित्र प्राप्त झाले आहे. ही सिद्ध वाणी आहे व मंत्राएवढेच सामर्थ्य
त्यांत आहे. कोणीही परस्पर गुरुचरित्र वाचू नये. योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच
गुरुचरित्र वाचावे.
वाचता येते म्हणून चरित्र वाचणे चुकीचे आहे. माझेकडे कैक लोक गुरुचरित्राचे पारायण
करण्यासाठी परवानगी मागतात. त्यांची पात्रता व क्षमता नसते. मी नकार देतो. गुरुचरित्र
ही सिद्धवाणी आहे. त्यातील शब्दांचा उच्चार कसा करावा हे गुरुंकडून समजून घेणे आवश्यक
आहे. राम राम चे ठिकाणी मरा मरा उच्चार केले, तर चालतील का? ईश्वर कधीही रागावत नाही,
हे जरी सत्य असेल तरी अश्या चुकीच्या उच्चारामुळे देवांनी सहन तरी किती करावे? अशा
चुकीच्या वाचनाने फळे कशी मिळणार? पुष्कळ लोक असमंजस पणामुळे परस्पर गुरुचरित्र वाचतात.
शास्त्रांचा आधार घेत नाही व फटके बसले म्हणजे धावतपळत येतात.
एका व्यक्तीने शेतामध्ये अग्नि होम हवन केला. कारण काय सांगितले, तर म्हणे अग्निहोम
हवनाने शेतात धान्य चांगले व दुप्पट पिकते. असे जर असेल तर प्रत्येकाने शेतात अग्नि
होम हवन करावे. नंतर महाराष्ट्रात अन्न धान्याचा दुष्काळ पडणार नाही. लोकांच्या कल्पना
किती चुकीच्या आहेत. ह्याचा खुलासा करताना प. पू. महाराजांनी सांगितले की, अग्नि होम
हवनाचा अर्थ काय? तो कोणी करावा, केव्हा करावा, त्याचे उद्देश काय आहे? त्यापासून काय
प्राप्ती होणार आहे? ह्या प्रत्येकाची माहिती शास्त्रात दिलेली आहे. ते कोणी पहात नाही.
शास्त्रांचा आधार कोणी घेत नाही.
तुम्हांला गोड पाण्याचा सतत उत्स्फुर्त वाहणारा झरा मिळालेला आहे. त्याचा तुम्ही फायदा
घ्या. परंतु काही लोकांना गटार मिश्रीत पाणी पिण्याची सवय लागलेली असते. त्याला कोण
काय करणार? प्रत्येकाला माझी भेट होणे शक्य नाही. आपल्याला जर योग्य गुरु भेटले नाही
तर इकडे -तिकडे जाऊ नये. घरी स्वस्थ बसावे व देवाचे नामस्मरण करावे. ईश्वराचा एक गुण
आहे. साधकाला त्याची पात्रता वाढेपर्यंत योग्य गुरूंची भेट होत नाही. तोपर्यंत साधकाला
खड्यात जाऊ देणार नाही. अयोग्य माणसांकडे जाऊ देणार नाही. ज्याचे अंत:करणांत दृढ श्रद्धा
असेल, त्या साधकाला बिनचूक मार्गदर्शन करतो व योग्य गुरुंची भेट घालून देतो. (खंडः
२)