आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न. भक्ती कशी करावी?


उत्तर. प. पू. महाराजांनी खुलासा केला कि, मारुती सारखी भक्ती असावी. श्री रामचंद्रांनी रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर मारुतीचा बहुमान करण्याचे ठरविले. त्यावेळी त्यांना गळ्यातील सुंदर मोत्याची माळ काढून दिली. मारुती शेजारच्या झाडावर बसून एक एक मोती फोडून पाहू लागला. शेजारून एक कुत्सित टिकाकार जात होता. त्याने विचारले, हे काय करतोस? ह्या मोतीची मला किंमत नाही. मला तर माझा राम पाहिजे. त्याने पुन्हा विचारले कि ह्या मोतीमध्ये राम काय पाहतोस? तुझ्या हृदयात तरी राम आहे का? मारुतीच्या नसानसातून रामभक्ती ओसंडून जात होती. त्याने ताबडतोब दोन्ही हातांनी स्वतःची छाती फाडून दाखविली, तेव्हा राम दिसले.
आजकालच्या माणसाला मोत्याची माळ बक्षीस दिली असती तर त्याने ती विकून घर, शेतीवाडी घेतली असती व छाती फाडून दाखविण्याचा प्रसंग आला असता तर रक्त व मांसच बाहेर पडले असते. दुसरे कांही नाही. मारुतीची रामाच्या ठिकाणी इतकी गाढ भक्ती होती की, मारुतीने छाती फाडून दाखविताच तेथे रामांना प्रकट व्हावे लागले व मारुतीच्या शब्दाचा मान ठेवावा लागला. जशी भक्तांना देवाची गरज व आठवण असते तशी देवांनाही भक्ताची आठवण ठेवावी लागते. परंतु हे सर्व केव्हा? जर मन श्रद्धाळू असेल, देवावर असीम भक्ती असेल तरच ही शक्ती अनुभवण्यासाठी हाच मार्ग योग्य होय. वीज लावण्यासाठी बटनाचा उपयोग होतो हे बरोबर आहे. बटन दाबले, लाईट लागला आपले काम झाले. वीज कोठे निर्माण होते, कोण निर्माण करतो, वीज कशी निर्माण होते, त्यासाठी किती खर्च होतो, हा विनाकारण काथ्याकूट कशाला. मनांत श्रद्धा ठेवा व भक्तीभाव वाढवा. तुम्हांला देखील विधायक शक्तींचा अनुभव येईल. (खंडः २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy