आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: मनुष्य संकटात असला म्हणजे देवाची आठवण करतो. देवांना दया येते व त्याला संकटातुन मुक्त करतात. मनुष्य देवांना विसरतो पुन्हा संकट आले म्हणजे देवाची आठवण करतो. असे का?


उत्तर: प. पू. महाराजांनी खुलासा केला कि, मनुष्याचा स्वभाव स्वार्थी असतो, जर मनुष्याचा स्वभाव जास्त स्वार्थी असेल तर देवांचे उपकार फार लवकर विसरतो. मनुष्यावर खरं निर्व्याज व निर्लोभ प्रेम करणार कोण आहे? हे त्याचे लक्षात येत नाही. भगवंतांनी अनेकवेळेला कृपेचा अनुभव देऊनही जर त्याची साशंकता कायम राहात असेल तर तो रजोगुणाचा प्रभाव आहे हे समजावे. रजोगुणाचे लक्षण आहे की, स्वार्थ वाढणे, मनाचा तोल जाणे, वारंवार रागावणे वगैरे. स्वार्थामुळे आपले कायमसाठी भले करणारे कोण आहे ह्याची जाणीव त्याला रहात नाही. कायमसाठी असा संशयी स्वभाव रहाणे, स्वत:हून स्वत:त बदल न घडविणे असे वागल्याने नाशाकडे झेप घेत असतो. कारण परमेश्वराची देखील सहन करण्याची मर्यादा असते.
सात्विकपणाचा भाव कसा असतो? संकटातून मुक्त करून कृपा अनुभव दिल्यानंतर त्याची साशंकता संपते. परमेश्वर आपला एकमेव आधार आहे असे मानतो व सतत मनाला तशी जाणीव करून देऊन स्वतः ईश्वराचे आभार मानतो व चिंतन स्मरण करतो.
तमोगुणाचा आविष्कार म्हणजे मनुष्याला संकटात देवांनी कृपा करून वाचविले, तरी तो म्हणतो की मी माझ्या कर्तृत्वामुळे निभावले, देव कुठे मदतीला आले होते? मी तर काही डोळ्यांनी पहिले नाही. तमोगुणाचे खास लक्षण म्हणजे काम साध्य होईपर्यंत देव मानतो काम साध्य झाले म्हणजे कसला परमेश्वर अन कोण देव? मी होतो म्हणूनच काम झालं म्हणून स्वत:ची टिमकी वाजविणं व एका क्षणात देव विसरणं. साधकांनी / भक्तांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की मनुष्याला स्वत:मध्ये जसा पाहिजे तसा बदल करून घेता येतो. तुम्हांला देवांचा अनुभव येवो अथवा न येवो. आपण नेहमी सात्विक गुणांची कास धरावी म्हणजे हळूहळू देवांची कृपा होते. (अमृतकण, २/०१/१९८३)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy