|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्नः पुष्कळ वेळेला दिवसभर प्रयत्न करुन एखाद्या अडचणीतून किंवा संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचत नाही. तो प्रश्न मनांत तसाच अनिर्णित रहातो. सकाळी उठल्यानंतर त्या प्रश्नाचे उत्तर सापडते व एकदम हायसे वाटून सुटलो एकदाचा असे वाटते. रात्रीतून आपल्याला उत्तर कसे सापडते? आपणतर झोपलेले असतो.


उत्तरः प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, प्रत्येक व्यक्तीला दोन मने असतात. एक स्थूल मन व दुसरे सुक्ष्म मन. आपल्या शरीरावर स्थूल मनाचे नियंत्रण असते. हात, पाय, डोळे, कान वगैरे अवयव आहेत, हे कधीही थकत नाहीत. आपले स्थूल मन थकत असते. म्हणून आपल्याला झोप येते. स्थूल मन व नेत्रांचा जवळचा संबंध आहे. आपण नेत्रांनी जे पाहातो त्याचे प्रतिबिंब स्थूल मनावर पडून मनात इच्छा, वासना निर्माण होतात व त्याप्रमाणे अवयवांना हुकूम सुटतात.
अंतरमन (सुक्ष्म) नेहमी शांत व स्थिर असते, ते कधीही विचलित होत नाही व होऊपण देऊ नये. ज्यांचे अंतरमन विचलित झालेले आहे असे लोक भ्रमिष्ट होतात व कालांतराने वेडे होतात. बाहेरून इतर लोकांच्या भाषणाचा, विचारांचा कितीही मारा होत असला तरी आपण आपले अंतरमन नेहमी शांत ठेवावे. अंतरमन शांत कसे असते व कसे शांत राहिले या विषयी प. पू. महाराजांनी एक सुंदर उदा. दिले.
समूद्रामध्ये नेहमी लहान, मोठे मासे, सुसरी, साप, कासव व इतर जलचर प्राणी नेहमी वास करून असतात. समुद्र कितीही खवळला, २५-५० फुट लाटा फेकीत किंवा किना-यावर आदळला तरीही त्यावेळेला समुद्रातील एकही जलचर प्राणी, मासा वगैरे किना-यावर फेकला जात नाही असे कां घडते? कारण तळाशी जेथे खोल पाणी असते तेथे समुद्र नेहमी शांत असतो. समुद्रातील जलचर प्राणी त्यावेळेला खोल पाण्यात जाऊन राहतात. कोणताही अंतिम निर्णय घ्यावयाचा असेल तर स्थूल मन, अंतरमनाला विचारुन निर्णय घेते. रात्री झोपतांना अनिर्णित प्रश्न मनाकडे सोपविला जातो व स्थूलमन झोपी जाते. निवांत वातावरणांत अंतरमन चारही बाजूंचा विचार करुन सर्व गोष्टी नजरे समोर ठेवून योग्य निर्णय घेते व जे काही संकट किंवा अडचण आलेली असेल त्यातून बाहेर निघायचा मार्ग शोधते. सकाळी जेंव्हा मनुष्य उठतो तेंव्हा आदल्या रात्री अनिर्णित राहिलेल्या प्रश्नांचे उत्तर त्याला मिळते. हे जे आहे त्याचे दुसरे नाव आहे बुद्धी. बुद्धी तुम्हांला साथ केंव्हा देईल व योग्य निर्णय घेण्याची पात्रता व शक्ती केंव्हा मिळेल? तर त्यासाठी रोज काहीतरी देवांचे व गुरुंचे चिंतन स्मरण करा. त्यांची सेवा करा. आपल्या मनामध्ये त्याची सतत आठवण राहिल असे करा. म्हणजे अंतरमन शांत राहून नेहमी मदत करेल. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।