आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न. एक व्यक्ती देवाचे कोणतेच काम करीत नाही परंतु आमचे नजरे समोर काही वर्षात पैसेवाला झाला. गाड्या उडवितो, बंगले बांधणे वगैरे चैन करतो. मी देवाचे एवढे करतो मला का काही प्राप्त होत नाही?


उत्तर. प. पू . महाराजांनी खुलासा केला कि आपण इतरांचे अनुकरण करतो हेच चूक आहे. कोणत्याही गोष्टीचे अनुकरण नको. आपल्या सारख्या सामान्य लोकांत हे दुष्ट चक्र आहे. अनुकरणाने काही प्राप्त न होता उलट नुकसान होते. कोणाला काय काय व किती किती मिळाले हे तपासण्यासाठी तुमची नेमणूक देवांनी केली आहे का? तुम्ही एक सामान्य भक्त आहात ह्याची जाणीव ठेवावी.
आपण कोणत्याही बाबतीत दुसऱ्यांची बरोबरी करू नये. आपण आपल्या मार्गाने जावे व आपली प्रगती साधावी. प्रत्येकाची सुखाची कल्पना निराळी असते. एखांद्या व्यक्तीला एका वस्तूत सुख मिळत असेल तर दुसऱ्याला त्या वस्तूने सुख प्राप्त होणार नाही. तुम्ही जरूर इच्छा ठेवावी परंतू ती मर्यादित असावी. विनाकारण मोठी अपेक्षा व महत्वाकांक्षा ठेवू नये. प्रत्येक गोष्टीसाठी देवापुढे संकल्प साकडे घालू नये. आपले दैव उणे आहे म्हणूनच आपण सामान्य घरी जन्म घेतला हे उघड आहे. जर आपले पूर्वसुकृत चांगले असेल तर करोडपतीचे घरी किंवा राजघराण्यात जन्म घेतला असता. आपल्या उणे असलेल्या दैवावर मात करण्यास शिका. ज्यांचे पूर्वसुकृत चांगले आहे त्यांना ह्या जीवनामध्ये सुख, समृद्धी प्राप्त होणार. त्यासाठी मनामध्ये दु:खी होऊ नये.
तुमची एक इच्छा पूर्ण झाली कि दुसरी निर्माण होते. दुसरी पूर्ण झाली कि तिसरी निर्माण होते. ह्यावर नियंत्रण घाला. आपल्या गरजा मर्यादित करा. खरे सुख समाधान भौतिक साधनात नाही. परंतू अध्यात्मात खरे सुख व समाधान आहे. अजून प्राप्त होत नाही म्हणून कुरकूर नको. येथे स्थिर व्हा. मी आपणांस रोज थोडा-थोडा उपदेश देतो ते लक्षात ठेवा. त्याचे चिंतन करा. आपण जी कास धरतो ती कोणत्याही परिस्थितीत सोडू नका. एका गुरुंकडून दुसऱ्याकडे जाण्याचे, आडवे तिडवे प्रयत्न करू नका अगोदरच दोषाच्या चिखलात पाय रुतलेले आहेत. जास्त हालचाल केली तर अधिकांत अधिक आंत रुताल व हळू हळू गळ्यापर्यंत दोषांच्या चिखलात अडकून जाल. मग बाहेर निघणे मुश्किल. आपण रोज चिंतन, मनन करून चिखलातून बाहेर काढणाऱ्याला बोलवावे. देव दयाळू आहे. चिखलातून बाहेर काढणारा येईपर्यन्त वाट पाहणेच योग्य होय. तोपर्यंत त्याला दया येईल. तो प्रसन्न होईल. आपल्यावर कृपा करील असे सतत प्रयत्न करीत रहावे.
मी तुम्हांस नेहमी उपदेश करीत आहे. तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आता तुम्ही स्थिर व्हा. चिखलातून बाहेर काढण्यासाठी देवांनी काही व्यक्तींची नेमणूक केलेली असते. मी तुम्हांला जे जे मार्गदर्शन करतो त्याप्रमाणे वागा. त्याप्रमाणे उपासना करा. शेवटी हेच तुमच्या हिताचे आहे.


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy