|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: जगामध्ये ईश्वर आहे का?


उत्तर: प. पू. महाराजांनी खुलासा केला की, कैक लोक पुस्तक वाचून परस्पर उपासना करतात. परंतु त्यांनी कोणत्याही संतांचा, सत्पुरुषांचा, गुरूंचा अनुग्रह घेतलेला नसतो. म्हणून त्यांची प्रगती होत नाही. अशा चुकीच्या मार्गदर्शनाने तुम्हांला शाश्वत सत्य समजले नाही, तर जगात ईश्वर नाही असे कसे म्हणता येईल? ज्यांना सत्य समजले आहे. त्यांचेकडे येऊन सत्य काय आहे, कसे प्राप्त करावे हे समजून घ्या. ज्या व्यक्तीला ईश्वर दर्शन झाले आहे. साक्षात्कार झाला आहे. त्याचे दर्शन घ्या. अशा व्यक्तीने कृपा दृष्टीने पाहिल्यास कल्याण निश्चितच होत असते.
तुमचे सुदैवाने तुम्हांला ईश्वर अनुग्रहित गुरु लाभलेले आहेत. तुम्हांला सतत स्वच्छ पाण्याचा वाहणारा झरा मिळालेला आहे. जो आनंद मला मिळाला तोच तुम्हांला मिळावा म्हणून तुम्हांला योग्य मार्गदर्शन करीत आहे.
आजकालचे जीवन अतिशय गुंतागुंतीचे झाले आहे. केव्हाही कोणतीही संकटे येतात. ज्यांना जीवनात प्रगती साधावयाची आहे, त्यांनी ह्या संकटातून, विपरीत परिस्थितीतूनच मार्ग काढावा लागतो. कांही संकटे/ दुःखे अशी असतात कि, आपणच ती निर्माण केलेली असतात. अशावेळी परमेश्वराची साथ मिळत नाही. रस्त्याने जाताना वाहन बिघडले तर दुरुस्त करून किंवा ढकलून कसेही करून घरी आणतो. रस्त्यातच सोडून देत नाही. तसेच जीवनात संकटे आली तर जीवन सोडून देत नाही. जीवनाचा त्याग करीत नाही. संकटावर मात करावयास शिका. तुम्ही आमचे सानिध्यात या म्हणजे ह्या गोष्टी तुमचे लक्षात येतील.
महाराजांनी एक सुंदर उदा. दिले, नगर मध्ये एका गृहस्थाने पुस्तकांत वाचून परस्पर रीतीने गायत्री मंत्राचा हवन चालू केला. त्याने एका फूलपात्रात अग्नि ठेवून गायत्रीमंत्राचा उच्चार करून त्या अग्नीवर चमच्याने तुपाची धार टाकली, असे कैक दिवस झाले, काहीच प्राप्त नाही म्हणून प. पू. महाराजांकडे सल्ला घ्यावयास आले. त्या गृहस्थाने सविस्तर माहिती सांगताना खुलासा केला की, मी नोकरी करणारा गृहस्थ आहे. बाहेरगावी फिरतीवर जावे लागते व तेव्हा पत्नी हवन करते. जेव्हा पत्नी हि बाहेरगावी जाते तेव्हा ऑफिसचा पिऊन हवन करतो.
प. पू. महाराजांनी खुलासा केला की, भगवंतांनी अखिल मानवाला देवधर्म करावयास परवानगी दिलेली आहे परंतु देवधर्म व धार्मिक कार्य करताना काही नियम व शुर्चिभूतपणा, पावित्र्य पाळणे अति आवश्यक आहे. तुम्ही धंदा, व्यवसाय व नोकरी करणारी माणसं आहांत, आवश्यक तो शुचिर्भुतपणा व आचार तुम्ही पाळू शकत नाही. ज्यावेळी धार्मिक कार्य असेल त्याचे कैक दिवसा अगोदर पासून खाणे, पिणे बंद पाहिजे, ब्रह्मचार्य पाळावयास पाहिजे. आचार सांभाळले पाहिजे. घरात कडक सोवळे पाळून व कामानिमित्त बाहेर गांवी गेल्यानंतर कोठल्याही हॉटेलात कांदे भाजी व इतर पदार्थ खावे, असे केले तर कसे चालेल?
गायत्री मंत्र कोणी व केव्हा म्हणावा, ह्याला नियम आहेत. यज्ञ कोणी करावा, ह्या प्रत्येकासाठी शास्त्रात नियम दिलेले आहेत. पावित्र्य पण सांभाळणे अति आवश्यक आहे. तोल गेलेली माणसे संपूर्ण उलथी पालथी पडल्याशिवाय थांबत नाही. मग कोणाचा सल्ला घेऊन थांबण्याची बुद्धी सुचत नाही.


।। श्री गुरुदेव दत्त ।।