प्रश्न: जीवनात स्त्री गुरु करावेत का?
उत्तर: प. पू. महाराजांनी वरील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, महाराजांकडे एक
गृहस्थ आला. त्याने विचारले की त्यांनी एका स्त्रीला गुरुस्थानी मानलेले आहे. त्या
दिवंगत झालेल्या आहेत. मी रोज त्यांच्या फोटोची देवाप्रमाणे पूजा करतो. परंतु माझा
उत्कर्ष होण्याऐवजी अधोगतीच होते. उदा. माझ्या मुलाचे अंगावर कुष्ठ निघाले. दुस-या
भक्तांचे अंगावरही कुष्ठ निघाले. त्याशिवाय व्यवहारात सारखे अडथळे निर्माण होतात. संकटे
येतात, कोणतेच सहाय्य मिळत नाही, असे का?
प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, योग्य व्यक्तीला गुरु केले नाही,
त्याशिवाय त्याला देवांच्या मालिकेत बसवून उपासना, भक्ती वगैरे केली त्यामुळे त्याला
चांगले फळ मिळाले नाही. उलट देवांनी शासनच केले. ते गुरु संताच्या पात्रतेचे होते.
त्यांना संतांच्या मालिकेत बसविणे आवश्यक होते. गुरुंच्या मालिकेत बसविणे योग्य नव्हते.
गुरु कसे असावेत? सत्यप्रिय, निःस्वार्थी, परोपकारी, भक्ताचे कल्याण चिंतणारे व कल्याण
करणारे, धर्मनिष्ठ, धर्म परायण, परंपरा पाळणारे, शिस्तप्रिय व शास्त्र संमत नियमांचे
कडक आचरण व सांभाळणारे असावेत. जसे तुम्ही गुरुंना मानाल तसे अनुभव यावयास पाहिजेत.
जर तुम्ही गुरुंना देव मानाल तर खालीलप्रमाणे अनुभव यावयास पाहिजेत. प्रत्यक्ष मार्गदर्शन,
अप्रत्यक्ष स्वप्नात येऊन मार्गदर्शन व संकटाचे वेळी मदत, बाहेरगांवच्या व लांबच्या
भक्ताने अंतःकरणपूर्वक हाक मारली तर ताबडतोब हजर होणे, भक्तांना धीर देणे व भक्तांच्या
मनात आत्मविश्वास निर्माण करुन त्याला निर्भय बनविणे ही सर्व देव लक्षणे आहेत.
देवांनी देखील भक्तांच्या दर्जाप्रमाणे दर्शन द्यावे. उद्या जर एखादा भक्त म्हणेल की
देव पूजेच्या वेळी अथवा जेवणाचे वेळी एक कुत्रे, मांजर, पक्षी येऊन खिडकीवर बसले व
एकटक माझ्याकडे पहात होते. मला त्या स्वरुपात देवाचे दर्शन झाले, हे म्हणणे सर्वस्वी
चूक आहे. ह्या भाकडकथा आहेत. आपल्या दर्जाप्रमाणे, म्हणजे इतर कोणत्याही स्वरुपात दर्शन
नको, फक्त साधुपुरुषाचे दर्शन पाहिजे. देव जेव्हा भेटेल तेव्हा एका क्षणात तुमचेमध्ये
अमुलाग्र बदल होऊन जाईल. तुम्ही देवरुप होऊन जाल. देव स्वतःसारखा भक्तांना उच्च पातळीवर
नेतो. देव भक्ता सारखा खालच्या पातळीवर येत नाही. देव भक्तासारखा साधा बनत नाही.
बहुसंख्य लोक सामान्य व अडाणी आहेत, ते नुसते भाविक आहेत. कुठे व कोणत्या गोष्टीवर
विश्वास ठेवावा ह्यांचे ताळतंत्र नाही. सत्य काय आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा नाही.
म्हणून मी नेहमी तुमचेवर संस्कार करतो. तुम्ही पावित्र्य सांभाळा, शुचिर्भूतपणा पाळा,
एकनिष्ठ भक्त बना, खरे सेवक बना, देवांची मनोभावे सेवा करा. म्हणजे तुमच्यात चांगले
गुण येतील. आपल्या मनामध्ये देवाची मानसपूजा करा. म्हणजे तुमच्यात चांगले गुण येतील.
आपल्या मनामध्ये कोणताही चढा भाव नको. पाणी नेहमी उताराकडे वाहते व जसा उतार जास्त
तसे पाणी जोराने वाहते. गुरुंचे पावला वर पाऊल देऊन अनुकरण करु नका परंतु गुरुंचे गुण
आत्मसात करा. आपण जेथे दर्शनासाठी जातो त्यांचे गुणधर्म घेतले पाहिजेत. त्यांचे बोलणे,
चालणे, वागणे कसे आहेत, आचार किती कडक आहेत, ते गुण आत्मसात करावे. ज्यांनी भगव्या
कपड्यांचा वेष परिधान केला आहे त्यांचेच फक्त अनुकरण नको त्यांची शिकवण व गुण जरुर
घ्यावेत.
गुरु स्वतःच्या भक्ताला मदत कशी करतात? तुमची पात्रता वाढली तर तुमचे व्यवहारातील अडथळे
दूर करतात, रस्ता साफ करतात, आलेल्या संकटातून मार्ग दाखवितात व येऊ घातलेली संकटे,
अडथळे, भक्तांना जाणवू न देता बाहेरच्याबाहेर नाहीशी करतात. ज्या सद्गुणी मित्रांची
तुम्हाला गरज व आवश्यकता आहे अशा लोकांशी तुमचा संपर्क वाढवितात व मित्र बनवितात व
जे लोक तुम्हांला नेहमी त्रास देतात व भविष्यकाळातही अडथळे आणणार आहेत अशा लोकांना
सोईस्कररित्या दूर करतात ही सर्व ईश्वराची व गुरुंच्या कृपेची लक्षणे आहेत.
गुरुसेवा केल्याने लाभच होणार आहे. फायदा तो फायदाच राहतो. त्यात कसलाही तोटा नाही.
सरतेशेवटी तुमचे अंतःकरणात भक्ती किती आहे, त्याचेवर सर्व अवलंबून आहे. भाव चांगला
असेल तर अनुभवही चांगला येईल. शाईचे पॅड ओले असले तर शिक्का बरोबर उमटेल. तेथे भक्तीचा
ओलावा पाहिजे. (खंड २)