आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: नगरमध्ये काही वर्षांपूर्वी एक व्यक्ती विक्षिप्त रितीने वागत होती परंतु तोंडाने काही बोलत नव्हती. काही लोकांनी तिला संत मानून मरणोत्तर उदो उदो केला. त्याची ५/६ वर्षांपूर्वी समाधी बांधली. तेव्हां पासून तेथे नेहमी पूजा करणारा एक भक्त प. पू. महाराजांकडे आला व स्वतःची व्यथा मांडली व माझी प्रगती का होत नाही म्हणून विचारले.


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्या व्यक्तीला तुम्ही संत व सत्पुरुष मानून त्याची पूजा करीत होता ती व्यक्ती त्यापैकी कोणत्याच पात्रतेची नव्हती. पूर्व जन्माचे भ्रष्ट सत्पुरुष असावी. प्रत्येक भक्तानी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, ज्यांना आपण मानतो, ज्यांची मनोभावे पूजा करतो, साष्टांग नमस्कार करतो अशा व्यक्तींची काही वर्षे सेवा केल्यानंतर आपल्या जीवनात काही फरक झाला का? आपण ज्या उन्नत्तीची अपेक्षा करीत होतो ती झाली की अधोगती झाली? त्या व्यक्तीकडे जाणा-या कोणत्याच भक्तांची जर काहीच प्रगती नसेल तर ती व्यक्ती महान नाही हे समजावे. अशा व्यक्तींच्या पाया पडणेही दोष आहे.
सर्व सामान्य लोक अज्ञानी व श्रध्दाळू असतात. काही पुढारी लोकांना स्वतःचे विचार व महत्व वाढविण्यासाठी जागा पाहिजे असते. ते लोक अशा व्यक्तींचा मरणोत्तर उदो उदो करतील. समाधी बांधतील व मंदिरही बांधतील. सामान्य लोकांना थोर कशाला म्हणावे हे देखील कळत नसते. कैक लोक गतानुगत असतात. म्हणून लोक तेथे ओढले जातात व काही दिवसांनी निराश होऊन परत फिरतात. विवेक चुडामणीची केवळ पाटी पेन्ट करुन घरावर लावली म्हणजे विवेक चुडामणी होत नाही. त्यासाठी कठोर परीक्षा द्यावी लागते व पात्रता सिध्द करावी लागते. विवेक चुडामणी ही पदवी ह्या मार्गातील विशिष्ट स्थिती दर्शविते. तसेच संत महात्मा, सत्पुरुष, महापुरुष, साक्षात्कारी वगैरे ह्या मार्गातील प्रगतीचे टप्पे आहेत. वरील पैकी कोणत्याही पात्रतेची विशिष्ट व्यक्ती नव्हती म्हणून त्यांच्या चरणाशी व पूजा करणा-या व्यक्तीची जीवनात प्रगती झाली नाही हे लक्षात आले असेल. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy