प्रश्न: हटवादीपणाने स्मरण केले तर ईश्वरप्राप्ती होईल का?
उत्तर: गुरूदेवांनी खुलासा केला की एक भक्त त्यांचेकडे दर्शनाला आला. तो सतत स्मरण
करीत होता. परतूं थकलेला होता. गुरूदेवांनी त्याला थकण्याचे कारण विचारले. तो म्हणाला
मला ईश्वरप्राप्ती करावयाची आहे. म्हणून इतर गुरूंनी सांगितल्याप्रमाणे हटवादाने सतत
नामस्मरण करतो. गुरूदेवांनी त्याचे प्रथम नाव घेणे थांबविले. ईश्वरप्राप्तीसाठी हटवाद
नको. परतूं जाणीवपूर्वक निश्चय पाहिजे. ईश्वर स्मरणात प्रेम नसेल, ओलावा नसेल तर विनाकारण
त्रास का घेता? शरीर थकले तर आपल्याला समजते. जर मेंदू थकला तर थकवा निर्माण होतो.
जांभया येतात. उत्साह राहत नाही व झोप घ्यावीशी वाटते, आराम करावासा वाटतो. त्यावेळी
जरूर आराम करावा व निद्रा घ्यावी. नाव घेणे चांगले. तो तारणहार आहे. हेही खरे. परतूं
आपली पण काहीतरी जबाबदारी आहेेच ना. शरीर यंत्र व्यवस्थित सांभाळणे हे आद्य कर्तव्य
आहे. आपल्याला जे काही प्राप्त; करावयाचे आहे ते या शरीरामार्फत करावयाचे आहे. तेव्हा
योग्य आहार व योग्य आराम शरीराला दिला पाहिजे. तरच बुद्धी तरतरीत राहील व शरीरीत शक्ती
राहील. जर मेंदू थकल्यानंतरही त्याचेकडून काम करवून घेण्याचा प्रयत्न केला तर भ्रमिष्ट
व्हाल व वेडसर व्हाल. तेव्हा असा हटवादी व अनाठायी विचार नको. व्यवहारात देखिल वागतांना
अनावश्यक बाबतीत निष्कारण काथ्याकूट नको. त्यामूळे मेंदूला क्लेश होतात. अनावश्यक विचारांमूळे
सुविचार डोकावू देखिल शकत नाही. ईश्वर उपासना करताना जर काही दोष उत्पन्न होत असेल
तर ताबडतोब लक्ष देऊन सुधारणा करा. ह्या बारीक सारीक गोष्टी लवकर लक्षात येत नाहीत.
(खंड २)