आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: बाहेरगांवी गेल्यानंतर नित्याची उपासना करावी का?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पुस्तक वाचनाने वरवरची माहिती मिळते, ग्रंथ वाचकांना थोडी अधिक माहिती मिळते. उपासनेने व चिंतनाने मन शांत होते. केवळ वाचन केल्याने मन कधीही शांत होत नाही व मनातील शंका कधीही संपत नाही. तात्पुरती एक शंका संपते व दुसरी निर्माण होते. आपले दैव उणे आहे, हे प्रत्येकांना कळून चुकले आहे. आपण दैवावर मात करुन, पूर्ण माप पदरात पाडण्यासाठी निष्ठेने, दृढ विश्वासाने प्रयत्न केला पाहिजे. उपासनेमध्ये कधीही खंड करु नका. ज्या गुरुंनी तुम्हांला उपासना सांगितलेली आहे ते ईश्वर अनुग्रहित आहेत हे विशेष लक्षांत ठेवा. जेंव्हा आम्ही मार्ग दाखवितो तेंव्हा तुम्ही तुमची प्रगती होते की नाही, ती योग्य रीतीने करवून घेणे, जर होत नसेल तर योग्य वेळी सुचना देऊन प्रगती करवून घेण्याची जबाबदारी आमचेवर पडते. आम्ही दाखविलेल्या मार्गानेच तुम्ही उपासना करावी. कोणत्याही कामाचा प्रारंभ करतांना कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून जसे आपण गणपतीची पूजा करतो, तसेच आत्मचिंतन करण्याचे अगोदर “सोऽहमचा” जप थोडा वेळ करुन नंतर उपासना करावी. उपासना संपल्यानंतर तुम्हांला जे वाचन वगैरे करावयाचे असेल ते करावे. परंतु आत्मचिंतनाशिवाय दुस-या कोणत्याही गोष्टीला महत्व देऊ नये. काही लोकांना त्यांची पात्रता व क्षमता पाहून केवळ “सोऽहम” चा जप करावयास सांगितलेले आहे. सुरुवातीला ५-१० मिनिटे करुन हळू हळू ही वेळ वाढवावी. जर ही वेळ १/२ तासापर्यंत पोहोचली असेल तर जप संपल्यानंतर आनंदवाटला पाहिजे. मनाचा थकवा व शीण गेला पाहिजे, तरच उपासना बरोबर चालली आहे समजावे. बाहेरगांवी जर आपण नातेवाईकांकडे किंवा मित्राकडे गेलो असू तरी उपासनेमध्ये खंड पाडू नये. सातत्य टिकवावे. बाहेरगावी जर हॉटेलमधे उतरण्याचा प्रसंग आला असेल तर तेथे मात्र गुरुचरित्रांचे पारायण करु नये कारण त्याठिकाणी काल पर्यंत काय काय गोष्टी घडलेल्या असतील त्याची आपल्याला कल्पना नसते. त्या जागेत पावित्र्य नसते. अशावेळी केवळ अवतरणिका वाचावी. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy