प्रश्न: काही भक्तांची अवस्था अशी असते कि त्यांना जर प्रश्न निर्माण झाले तर भगवंत
त्याच्या स्वप्नात येतात व त्या भक्ताच्या प्रश्नांची उकल होत असते. हि जी अवस्था आहे
त्याला काय म्हणावे, हा साक्षात्काराचा एक प्रकार आहे की काय?
उत्तर: काही भक्तांची अवस्था उच्चं झालेली असते, त्यांना भगवंताचे दर्शन स्वप्नात घडत
असते. त्यांचा संवाद सुद्धा होत असतो. त्यांच्या प्रश्नांची उकल होते असते. परंतु हा
साक्षात्कार नव्हे. त्यांच्या तेवढ्याच प्रश्नांची उकल होत असते, बाकी प्रश्न तसेच
राहतात. जेव्हा साक्षात्कार घडतो तेव्हा अज्ञान गळून पडते, आनंदाच्या उर्मी निर्माण
होत असतात, संशय नाहींसे होतात. साक्षात्कारी पुरुषांना कोणतेच प्रश्न शिल्लक राहत
नाही. साक्षात्कारी पुरुषांना जो कोणी प्रश्न विचारत असेल तर प्रश्न संपताच ते पुरुष
त्यांना उत्तर देऊन त्याला निरुत्तर करतात. साक्षात्कारी पुरुषांना पुस्तकाचा आधार
घ्यावा लागत नाही. त्यांना पुस्तक वाचावे लागत नाही, त्यांचे ज्ञान उपजत असते. (साक्षात्कारी)
त्यांच्या बरोबर कोणीही वादविवाद करू शकत नाही. ते त्यांना लगेच गप्प करतात.
भक्तांना दृष्टांत होणे, स्वप्नात भगवंत येणे, त्यांचेशी संभाषण करणे हे शक्य आहे व
ते त्या भक्त्याचा दर्जावर अवलंबून आहे. फक्त स्वप्नात संभाषण होते म्हणजे साक्षात्कार
झाला असे नव्हे. (खंड २)