प्रश्न: महापुरुष सिद्धीकडे कोणत्या नजरेने पाहतात, सिद्धीचे महापुरुषाच्या जीवनात
कोणते स्थान आहे?
उत्तर: महापुरुष सिद्धी प्राप्त होणे हे दुय्य्म समजतात, परंतु सिद्धीचे नियंत्रण
करणे अतिशय महत्वाचे आहे. सिद्धी ही जीवनातील प्राप्ती नव्हे. जसे आपण अन्न खातो तेव्हा
मांस व रक्त निर्माण होते तसेच उपासना करीत असताना सिद्धी आपोआप प्राप्त होतात. सिद्धी
म्हणजे एक प्रकारचा अडथळा आहे, त्यामुळे नाश होण्याचा संभव निर्माण होतो. सिद्धी प्राप्ती
मूळे अहंकार निर्माण होतो. एखाद्याला वाक् सिद्धी प्राप्त झाली व त्याचा वाह्यात उपयोग
करू लागला तर त्याचे अध:पतन होते, ईश्वर प्राप्ती हे उपासनेचे ध्येय असले पाहिजे, सिद्धी
प्राप्ती नव्हे.
सिद्धी प्राप्त झाली तरी महापुरुष त्याचा कोठेही बोभाटा करत नाही. देखावा करीत नाही.
सिद्धी प्राप्त झाल्याने सिद्ध पुरुष होऊ शकत नाही. सामान्य चमत्कार करून नमस्कार मिळविणे
हे थोर पुरुष करीत नाही. मातीचे कुंकू करणे, दगडाची खाडीसाखर करणे या सर्व उपसिद्धी
आहेत. जे निर्माण झाले आहे तेच काढून दाखविणे म्हणजे चमत्कार नव्हे, ते महत्वाचे नाही,
अशाने साधकाची उन्नती होत नाही. साधुपुरुषाने अशा भानगडीत पडू नये. नमस्कार करवून घेण्यासाठी
साधूत्व नसते. क्षुद्र देवतामुळे सिद्धी प्राप्त होऊ शकतात. या देवतांना मांसाहार लागतो.
या देवता लवकर प्रसन्न होत असतात. मंगलकारक देवता लवकर प्रसन्न होत नाही. अनंतकाल तपश्चर्या
केल्यानंतर त्या देवता प्रसन्न होत असतात. त्यास बैठक श्रेष्ठ लागत असते.
क्षुद्र देवता पिशाच्चच्या स्वरूपाच्या असू शकतात, त्यांची शक्ती मानवी शक्तिपेक्षा
मोठी असते. त्यांचाकडून उपद्रव होण्याची शक्यता असते. खंडाळ्याच्या घाटामधील शिंगरोबा
त्याचेच उदाहरण आहे. आपणांस उपद्रव होऊ नये म्हणून घाटामध्ये अनेक लोक श्रीफळ व पैसे
टाकत असतात. अशा देवतांना विरोध करावयाचा नाही. मंगलकार्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून
असे करणे भाग आहे. केदारनाथच्या घाटांत अशा देवता नाहीत. आपले गुरुदेव केदारनाथाला
गेले असताना त्यानां केदारनाथच्या घाटात अशा क्षुद्र देवता कोठेही आढळल्या नाही. गुरुदेव,
मराठे यांच्या गाडीत बसून नगरला निघाले होते. वैशाखी अमावस्या होती. संध्याकाळची वेळ
होती. गाडी घाटात बंध पडली. गाडी का बंद पडली हे समजू शकले नाही. गाडीवर नाचल्यावर
गाडी हालावी तशी गाडी हालत होती. गुरुदेवांना काय कारण आहे ते लगेच समजून गेले. ते
म्हणाले की विशिष्ट वेळ जाऊ द्या म्हणजे गाडी आपोआप सुरु होईल. क्षुद्र देवता घाटामध्ये
असा अडथळा आणू शकतात. त्यांना बळी लागत असतो. त्यांना श्रीफळ अर्पण केले की ते प्रसन्न
राहतात. गुरुदेव मराठेंना म्हणले की मी होतो म्हणून थोडक्यात मिटले नाही तर रात्रभर
बसावे लागले असते.
काही पिशाच्चं शक्ती महापुरुषांचे संरक्षण करीत असतात. वासुदेवानंद सरस्वती रस्त्याने
एकटे जात होते. त्या साधुपुरुषांची गंमत करावी म्हणून एका बैलगाडीवानाने बैलगाडी सरळ
त्याच्या अंगावर घातली. तेवढ्यात ती बैलगाडी बैलासकट रस्त्याच्या कडेला फेकली गेली.
त्या साधुमहात्म्याचे सामर्थ्य पाहून गाडीवान शरण आला व क्षमा याचना करू लागला.
सिद्धी आपणहून करणे वेगळे व आपण इच्छा व्यक्त करून सिद्धीकडून करवून घेणे हे वेगळे.
वासुदेवानंद सरस्वतीच्या उदाहरणांत सिद्धीने आपणहून टेंबे स्वामींचे रक्षण केले त्यांतच
त्या साधुपुरुषाचे थोरपण आहे व महत्व आहे. (खंड २)