आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: आशिर्वाद कोणाचे घ्यावेत?


उत्तर: प. पू. महाराजांनी खुलासा केला की, ज्यांच्या दर्शनाने आपण पवित्र होणार आहोत अशा व्यक्तिंचे पूर्व आयुष्य माहिती असणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीमध्ये त्याग व ज्ञान किती हे तपासले पाहिजे. अशा व्यक्तीचे पूर्व आयुष्य चांगले असेल तर संन्यास घेतल्यानंतर उर्वरीत आयुष्य अधिक उज्वल बनते. सर्वसंगपरित्याग, कशातही मोह नसणे, कोणत्याही मायेत न अडकने वगैरे. संन्यास म्हणजे आता उरलो उपकारा पुरता अशी भावना असावी. संन्यासी जीवन हे लोक कल्याणाकरीता व धर्म जागृती करण्याकरिताच असते. संन्यास घेणाऱ्या व्यक्तीचे पूर्व आयुष्य तपासले पाहिजे. जर चांगले नसेल तर अशा व्यक्तीच्या पाया पडणे, नमस्कार करणे वगैरेचा दोष आपल्याला लागतो, त्यांना नाही. योग्य गुरूंच्या केवळ आशिर्वादानेच लोकांचे भले होते व उद्धार होतो. अशाच व्यक्तींचे आशिर्वाद घ्यावेत. अंधश्रद्धा म्हणजे तरी काय? जे लोक पूर्व आयुष्य तपासत नाही, इतर लोक दर्शनासाठी जातात, त्यांचे सोबत जाणे, इतर नमस्कार करतात म्हणून नमस्कार करणे, हा अंधश्रद्धेचा गर्भितार्थ आहे. जगद्गगुरु शंकराचार्यांच्या दर्शनाला जाताना अंधश्रद्धा म्हणणार नाही, कारण शंकराचार्यांचे आयुष्य लहानपणापासून तपासले जाते व स्वच्छ व शुद्ध चारित्र्य असणाऱ्यांना त्या पिठावर योग्य तो संस्कार करून अधिकार देतात.
आशिर्वाद देणाऱ्यांना अधिकार असतो, कारण ते स्वयंसिद्ध असतात. घेणाऱ्यांनी स्वतःची शक्ती वाढवावी. म्हणजे निश्चित कल्याण होते. "अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने" भगवंत जेव्हा कृपा करतात तेव्हा कृपेचा ओघ येत असतो. मनुष्याला तर फक्त दोनच हात दिलेले आहेत. तो दोन हातांनी किती घेऊ शकेल?
तुम्ही जेव्हा आमचे आशिर्वाद मागता, तेव्हा तुमचे कल्याण होते का नाही, हे तपासा. जर कल्याण होत नसेल तर दोष तुमच्या स्वतःचा आहे. कारण ह्याच आशिर्वादाने दुसऱ्याचे कल्याण व भरभराट होते. तुमचे कल्याण का होऊ नये? तुमचे दोष दूर करा. पुष्कळ लोक रिक्षा घेऊन आमचेकडे येतात व सांगतात की, महाराज मला लवकर आशिर्वाद द्या. माझी कोर्टात तारीख आहे. कशाची तारीख आहे, कोर्टात कसले काम निघाले? आशिर्वाद कोणत्या कारणासाठी पाहिजे? ह्याची पूर्व पिठीका अगोदर सांगून माहिती देणे आवश्यक असते. तुमचेच उद्योग तुम्हांला नडतात. मला का म्हणून मध्ये ओढता? व झटपट आशिर्वाद मागता? आशिर्वाद कोणत्या कामासाठी मागावे ह्याचेही तारतम्य असावे.
आशिर्वाद देणारे जसे श्रेष्ठ असावे लागतात तसे घेणारेही तेवढ्याच पात्रतेचे असावे लागतात. एका पात्रांतून दुसऱ्या पात्रांत टाकताना दुसरे पात्रही तेवढ्याच पात्रतेचे असावे लागते. नाहीतर दिलेले आशिर्वाद वाया जातात. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy