प्रश्न: मंदिरे बांधून त्यात गुरुंची मूर्ती बसवावी का?
उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गुरुंची मूर्ती बसवू नये.
भक्तांनी गुरुंकडे पाहताना मूर्तीद्वारे पाहण्यापेक्षा परंपरेतून त्यांच्याकडे पाहावे.
गुरुंचे नेहमी स्मरण करावे. मूर्तीरुपाने गुरुंकडे पाहू नये. ज्या व्यक्तीचा देहविलय
झाला आहे, असे श्रेष्ठ गुरु आकारातून निराकारात गेले आहेत. निराकार ही केव्हाही श्रेष्ठ
स्थिती मानली जाते. अशा वेळी निराकारातून पुन्हा आकारातआणणे म्हणजे खालच्या पायरीवर
आणणे झाले. म्हणून आमचे म्हणणे असे की, त्यांनी नंतर गुरुंची मूर्ती बनवू नये व स्थापन
करु नये. परंतु त्यांचे स्मरणार्थ पादुका स्थापन कराव्यात म्हणजे त्यांचे कायम स्मरण
राहील. नदी कितीही मोठी असली तरी कोणीही तिला समुद्र म्हणणार नाही. मानवी रुपाला कोणीही
मानू नये. जर मानवी रुपाला भजले तर उलट प्रकार होईल. निराकारांतून आकारात आणल्यासारखे
होईल. एकदा नदी समुद्राला मिळाल्यानंतर समुद्रात तिचे स्वतंत्र अस्तित्व दाखविता येत
नाही. तसेच श्रेष्ठ पुरुषांचाआत्मा त्या दिव्य व प्रकाशमय परमात्म्यात विलीन झाल्यानंतर
वेगळा दाखवता येईल का? येणार नाही. म्हणून हयातीनंतर गुरुंच्या मूर्ती स्थापन करु नये.
(खंड ८)