आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: प्रपंच हा अध्यात्म मार्गातील अडथळा आहे का?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ईश्वर प्राप्तीसाठी उद्या जर कोणी १०८ मण्यांची माळ ओढीत बसला तर काहीही प्राप्त होणार नाही. जर ईश्वर प्राप्ती करावयाची असेल तर अनंतकाळ तपश्चर्याच करावी लागते. जर साधावयाचे असेल तर याच मार्गाने गेले पाहिजे. मनुष्याला कंटाळा येऊ नये म्हणून ईश्वराने मनुष्याच्या मागे प्रपंच लाऊन दिला आहे. तपश्चर्या करता करता वैफल्याची भावना येऊ नये म्हणून देवांनी या प्रपंचाची योजना केली आहे. हे देवांनी फार मोठे कार्य केले आहे. भा म्हणजे ज्ञान, भारत म्हणजे ज्ञान प्राप्त करुन देणारा देश होय. पूर्वी ऋषी मुनींनी लग्ने कार्ये केली. त्यांनाही मुले बाळे झाली होती. परंतु उपासनेने मनावर ताबा मिळवला होता. तपश्चर्या करता करता वैफल्याची भावना नको म्हणून संसार व प्रपंच मागे लाऊन दिला. ईश्वर प्राप्ती हे अतिशय अवघड व अती कष्टाने साध्य होणारे आहे. या मार्गात कंटाळा, वैताग किंवा वैफल्याची भावना निर्माण होणे योग्य नाही. इंद्रीय दमन कशा पध्दतीने करावे? कशा अवस्थेतून जावे लागते? याची संपूर्ण माहीती असावी. लाकूड पक्के बसविण्यासाठी स्क्रूची व्यवस्था केलेलीअसते. नंतर लाकडाला काहीही गडबड करता येत नाही. एकदा स्क्रू पक्के फिट केल्यानंतर लाकूड जरादेखील हलत नाही म्हणून पूर्वजांनी तपश्चर्येबरोबर प्रपंच लाऊन दिला. या अगोदर अनेक महापुरुष होऊन गेले. तुकाराम, नामदेव, एकनाथ, गोंदवलेकर वगैरे, हे सर्व अध्यात्म क्षेत्रात महान होते. या सर्वांनी प्रपंच केलेला आहे. प्रपंचात राहून देखील ईश्वर प्राप्ती होऊ शकते. या लोकांचे उदाहरण नजरेसमोर ठेवा. काही लोक प्रपंचाचा तिटकारा करतात हे चूक आहे. तुमच्या वाट्याला जे आले आहे ते भोगलेच पाहिजे. तेथून पळ काढता कामा नये. टेंबे स्वामींना देवांचा अनुग्रह झाला होता. ते देवांशी प्रत्यक्ष बोलत असत. त्यांनी विनंती केली की, "मला प्रपंच करवयाचा नाही. देवांनी उत्तर दिले की, मागील जन्माच्या ऋणानुबंधाप्रमाणे तुझ्या भाग्यात प्रपंच आहे त्याप्रमाणे तुला संसार करावा लागेल. ऋणानुबंध संपले की, तु संन्यास घे." विवाह झाला व पुढे त्यांना मुलगा झाला. अशा रितीने ते पितृऋणातून मुक्त झाले. अशा रीतीने ते सर्व ऋणानुबंधातून मुक्त झाले.
अध्यात्म साधना ही तुमच्या मुख्य गृहस्थाश्रमी जीवनाला उपसाधना आहे. या साधनेला तुच्छ मानू नका. तुम्ही कोणीही संसार त्याग करावयाचा नाही. बायको मुलांना सोडावयाचे नाही. परमार्थ साधनेत प्रपंच असलाच पाहिजे. म्हणजे परमार्थात अनेक वर्षे कष्ट केल्यानंतरही वैफल्याची भावना येत नाही. तुम्ही आमची बरोबरी करु नका. आम्ही वरदपिंड आहोत. जन्मापासून आम्हांला वैराग्य प्राप्त झालेले आहे. प्रपंचात असताना बायको, मुलाबाळांची काळजी घेणे तुमचे कर्तव्यच आहे. साखर व साखरेच्या पदार्थाच्या चवीत फरक आहे. प्रत्यक्ष साखर तुम्ही फारतर एक मुठभर खाऊ शकाल. कंटाळा येणार नाही. तसा प्रकार आहे. प्रपंच व परमार्थ अशी सांगड घातलेली आहे. प्रपंचात तिरस्कार नको, फक्त प्रपंचात पडू नका. याचा सरळ अर्थ असा घ्या. संसार-त्याग, वैराग्य असा वेडा वाकडा घेऊ नका. गृहस्थाश्रम हे जीवन जगण्याचे उत्तम साधन आहे. रसाळ व उत्तम रसाळ यात जो फरक आहे, तो लक्षात घ्या. ईश्वराचीच ही योजना आहे. हे तुम्ही फेटाळून लावू शकत नाही.
संसारात काही गोष्टी कशा हाताळाव्यात, हे न समजल्यामुळे काही लोक वैतागतात व म्हणतात; उगाच संसार केला यापेक्षा देवाची तपश्चर्या केली असती तर बरं झालं असतं. परंतु हे म्हणणे चूक आहे. ऋषीमुनींनी संसार केले होते. ऋषीमुनींना देखील पत्नीमुळेच देवाचे दर्शन घडले. अनुसुयादेवीचे उदाहरण नजरेसमोर आणा. संसारातील पतिव्रता तत्व तिने उत्तम रीतीने आचरल्यानंतरच तिच्या शब्दाखातर देवांना देखील अर्भके व्हावे लागले आणि म्हणूनच अत्रीऋषींना देवांचे दर्शन घडले. अगस्ती ऋषींनाही पत्नीमुळेच दर्शन घडले.
काही ब्रह्मचारी लोक जीवनात अतिरेक करतात. हा अतिरेक उपयोगाचा नाही. ते स्त्रियांशी बोलत नाहीत. स्त्रियांचे तोंड देखील पाहात नाहीत. हा वेडेपणाकाय कामाचा? शेवटी त्यांचा जन्म देखील आईच्या पोटीच झालेला असतो. कोणत्याही स्त्रीला मातेच्या समान पाहावे. प्रसंगी बोलावे लागते. तुम्ही व्यवहारात वागणारी माणसे आहात. ट्रेनमध्ये स्त्रियांच्या समवेत तसेच बसमध्येही प्रवास करावा लागतो. उगाच त्रागा करण्यात अर्थ नाही. त्रागा निराळा व वैराग्य निराळे. आपले मन पवित्र असले की बस. आपण आपला तोल जाऊ दिला नाही म्हणजे उत्तम साध्य झाले समजावे. ब्रह्मचर्याचे स्तोम माजवून अतिरेक करणारे स्त्रियांचे तोंडही पाहात नाहीत व भिक्षा मागून खातात; परंतु भिक्षेसाठी वाढलेले अन्न कोणीतरी स्त्रीनेच दिलेले असते. हे त्यांच्या लक्षात येत नाही. कोणत्याही स्त्रीला कमी लेखू नका. अध्यात्माचा विचार करताना स्त्री ही अडथळा नाही उलट पूरकच आहे हे लक्षात घ्या. (खंड ८)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy