|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: रात्री झोपताना देवाचे स्मरण करुन का झोपावे?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पुष्कळ लोक सांगतात की रात्री झोपण्यापूर्वी अंतर्मनाला सूचना केली की ते रात्रभर ईश्वर चिंतन करीत रहाते, हे चूक आहे. अंतर्मनाला दिवसा जागृतावस्थेत देखील आपण सूचना देऊ शकतो. दिवसा देखील ईश्वर चिंतन मनातल्या मनात करु शकतो. जागृतपणी जर आपण अंतर्मनाला सूचना केली की, पहाटे ४.०० वाजता मला उठायचे आहे तर बरोबर पहाटे चार वाजता जाग येते. त्याशिवाय अमक्या गोष्टीची आठवण मी अमूक ठिकाणी जाईन तेव्हा द्यावी, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर अंतर्मन त्या गोष्टीची आठवण करुन देते. प्रत्येक वेळेला अंतर्मन आपल्या आज्ञा पाळील असे नाही. कारण आपली साधना कमी पडते. आपला जो आत्मविश्वास जागृत व्हावयास पाहिजे, तो झालेला नसतो. निद्रा घेण्यापूर्वी ईश्वर चिंतन किंवा नामस्मरण का करायचे? कारण रात्रीच्या वेळी दुष्ट व वाईट शक्तींचा प्रभाव जास्त असतो. दिवसा सूर्यप्रकाशात त्याचा प्रभाव नसतो. जेव्हा आपण झोपतो, झोप केव्हा लागते हे कोणीही सांगू शकत नाही. रात्री आपले शरीर अर्ध जागृत अवस्थेमध्ये असते. दुष्ट व वाईट शक्ती कदाचित अशा परिस्थितीमध्ये शरीरावर कब्जा घेऊ शकते. अशा दुष्ट शक्तींनी आपल्या शरीराचा कब्जा घेऊ नये; रात्रभर आपले रक्षण ह्या वाईट गोष्टींपासून व्हावे व आपल्याला निवांत रात्रभर झोप यावी म्हणून आपण झोपण्यापूर्वी प्रार्थना करा. ह्या जगामध्ये ईश्वर ही शक्ती सर्वात प्रभावी व मोठी आहे. ही शक्ती तुमचे रात्रभर संरक्षण करते. रात्रभर तुम्हांला निवांत झोप लागते. ही देवाची मोठी कृपाच आहे. सकाळी उठताच टवटवीतपणा अनुभवास येतो. आदल्या दिवसाचा थकवा व शीण उतरलेला असतो व उठल्यानंतर एकदम ताजेपणा (फ्रेश) व आनंदीपणा अनुभवास येतो. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।