प्रश्न: गुरुंचे आशीर्वाद कसे घ्यावेत?
उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, काही लोकांच्या वेड्या श्रद्धा
असतात. गुरुंचे दर्शन घेताना त्यांच्या पायांवर डोके ठेवून दर्शन घेतले तर आपले कल्याण
होते किंवा गुरुंनी आपल्या डोक्यावर हात ठेवला तर नशीब उदयाला येते. ह्या कल्पना चुकीच्या
आहेत. अशा रितीने बळजबरीने किंवा सक्ती करुन गुरुंचे आशीर्वाद घेता येत नाहीत. गुरुंनी
स्वतः मनापासून चिंतलेले व उत्स्फूर्त आशीर्वाद दिले तर भक्तांचे कल्याण होते. कोणत्या
भक्तांची पात्रता किती हे गुरुंना समजते. आशीर्वादघेण्याची तळमळ किती आहे का औपचारिकपणा
आहे ह्यांचे संपूर्ण ज्ञान गुरुंना असते. ज्यांना गुरुंचे आशीर्वाद मिळू शकले नाही
ते लोक एकत्र येऊन एक दुस-याचे सामुहिक रीतीने चांगले चिंततात व ज्यांचे वाईट करायचे
असेल त्यांचे वाईट चिंततात. उच्च स्थितीचे लोक नेहमी चांगलेच चिंततात व त्यांच्या चिंतनाने
भक्ताचे कल्याण होते. ही विधायक शक्ती अशा रीतीने काम करते. उच्च स्थितीचे लोक कधीही
कोणाचेही वाईट चिंतीत नाही. ज्यांना गुरुंचे आशीर्वाद प्राप्त झाले नाहीत, अशा पैकी
काही कनिष्ठ वृत्तीचे लोकांनी चांगले चिंतले तर चांगले होणार नाही. परंतु जर वाईट चिंतले
तर वाईट निश्चित होईल. चांगले चिंतताना कसे चिंतावे ह्याची त्यांना कल्पना नसते. केवळ
चांगली भावना काम करीत नाही. आशीर्वाद कसे व काय द्यावे, ह्याचे ज्ञान त्या सामान्य
लोकांना नसते. तुझे चांगले होवो एवढे शब्द म्हणजे आशीर्वाद नव्हे ही केवळ कल्पना केलेली
असते. परंतु तुझे वाईट होवो ही अंतःकरणातील वेदना असते व ही कैक दिवस इर्षेचे पोटी
मनांत दबा धरुन बसलेली असते. त्यामुळे केवळ कल्पना प्रभावी ठरत नाही. परंतु अंतरातील
वेदना प्रभावी ठरते. ९९ टक्के लोक वाईट चिंततात. मानवाने कोणाचेही वाईट चिंटू नये.
चांगले किंवा वाईट चिंतण्याचे अधिकार मानवाला दिलेले नाहीत. त्यासाठी आमच्या सारख्या
संत, सत्पुरुष व साक्षात्कारी लोकांची नेमणूक केलेली असते. आम्ही जेव्हां आशीर्वाद
देतो, तेव्हासोबत अदृश्य शक्ती कल्याणाकरिता देतो. तेव्हांच तुमचे कल्याण होत असते.
आपल्या धर्मामध्ये थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याची व वृद्धांच्या पाया पडण्याची पद्धत
ह्याच कारणासाठी अस्तित्वात आली आहे. शिष्टाचार सांभाळणे व थोरामोठ्यांचा योग्य मान
सन्मान ठेवावा हा हेतूही आहे. आशीर्वाद देताना गुरु मुखांतून नेहमी चांगलेच शब्द बाहेर
पडतात. प. पू. महाराजांनी स्वतःचे एक उदाहरण दिले. प. पू. महाराज कोल्हापूरच्या देवीचे
दर्शन घेऊन बाहेर पडत होते. गर्दी पुष्कळ होती. इतक्यात खेडेगावातील एक अडाणी बाई महाराजांचे
जवळ आली व विचारले की, ४-५ वर्षांपासून माझा मुलगा बेकार आहे. त्याला नोकरी लागेल का?
महाराजांनी उत्तर दिले की, मी काय सांगू? त्या बाईने प. पू. महाराजांना विनंती केली
की, तुम्ही फक्त हो म्हणा म्हणजे नोकरी लागेल असा मला विश्वास आहे. त्या मंदिरातून
त्यावेळी अनेकजण बाहेर पडत होते. परंतु इतर कोणाला अडविले नाही. परंतु मलाच का अडवले?
कोणाच्या केवळ होकाराने नोकरी मिळेल हे त्या अडाण्या खेडेगावाच्या बाईने बरोबर ओळखले.
पुष्कळ वेळेला भक्तांच्या आग्रहास्तव महाराज आशिर्वाद देतात व काही वेळेला भक्तांची
कामे होत नाहीत असे का? आशिर्वाद देणा-यांना अधिकार असतो म्हणून ते आशिर्वाद देतात.
परंतु घेणा-यांचा भाव तेवढा असावा लागतो. जर आशीर्वाद घेणा-यांचा तेवढा भाव नसेल तर
दोष घेणा-यांचा आहे, देणा-यांचा नव्हे. दूध घ्यायला जाताना चाळणी घेऊन गेले तर कितीही
सकस व शुद्ध दूध असेल तर चाळणीत किती दूध शिल्लक राहील? जर टीप कगदावर शाई पडली तर
टीप कागद ती सर्व शाई शोषून घेऊन पसरणार नाही आणि जर साध्या कगदावर शाई पडली तर शोषली
जाणार नाही. परंतु आजुबाजूला पसरेल. कोणाचे आशीर्वाद घेतल्याने कल्याण होते हे ओळखण्याची
पात्रता प्रत्येक भक्तात असावी. संतांचा, सत्पुरुषांचा, गुरुंचा अशीर्वाद मोठ्या श्रध्देने
घ्यावा व हा आशीर्वादच आपले कल्याण करील अशी दृढ भावना व विश्वास ठेवावा म्हणजे निश्चित
कल्याणच होते. (खंड २)