प्रश्न: सत्पुरुषांच्या सहवासात भक्तामध्ये बदल कसा होतो?
उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, परिसाचा स्पर्श लोखंडाला
झाल्यानंतर लोखंडाचे सोने बनते. तसे तुम्ही येथे येऊन, स्वतःच्या जीवनाचे सोने करुन
घ्या. स्वउद्धार करुन घ्या. सामान्य साधकांना सत्पुरुष किंवा महापुरुष ह्यांचा लाभ
लवकर होत नाही. त्यातल्या त्यात ईश्वर अनुग्रहित गुरु अतिदुर्लभ गोष्ट आहे. तुमचे महाभाग्याने
ते तुम्हांला लाभलेले आहे. शिष्यांना हे खरे ज्ञान होण्याची आवश्यकता असते. ईश्वर अनुग्रहित
गुरुंना सांभाळण्याचे काम तुमचे आहे. मनुष्याची गफलत येथेच होते. मनुष्य गांगरुन जातो.
महापुरुष निघून गेल्यानंतर भक्तांना लक्षात येते की, आपण त्यांची सेवा करु शकलो नाही
व मनात हुरहुर निर्माण होते. परंतु तेव्हां वेळ निघून गेलेली असते. सत्पुरुषांचे सहवासात
आल्यानंतर स्वतःचे जीवन निर्मळ कसे करावे? ही मुख्य जबाबदारी तुमची आहे. जीवनाकडे पाहण्याचा
दृष्टीकोन बदलला पाहिजे. जीवनाला विशिष्ट व चांगले वळण लावले पाहिजे. येथे स्थिर झाल्यानंतर
काहीतरी जाणण्याची शक्ती निर्माण झाली पाहिजे. तुमची जिज्ञासूवृत्ती जागृत झाली पाहिजे
तरच येथे रोज येण्याचे सार्थक होईल. मी नित्याने तुम्हांला काहीतरी शिकवितो. तुमचे
वागण्यात, बोलण्यात, चालण्यात सर्व ठिकाणी चांगला बदल होणे आवश्यक आहे. तसे घडले नाही
तर तुमचे येथपर्यंत येण्याचे श्रम व वेळ वाया गेले असे समजावे. (खंड २)