|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: एका धर्मामध्ये उल्लेख केला आहे की, संन्यास घेतल्यानंतर गुरुंनी अनवाणीच चालावे. कोणत्याच वस्तुचा संग्रह करु नये वगैरे. एका स्त्रीने १०-१५ मैल अनवाणी चालून देवाचे दर्शन घेतले. परंतु त्या बाईला नंतर त्रास झाला असे का?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, त्या धर्मामध्ये संन्यास घेतल्यानंतर अनवाणी चालावे हा नियम बरोबर असेलही परंतु भक्तानेही अनवाणी चालण्याचे कारण काय? भक्त तर संसारी आहेत. भक्ताने ही कृती केली म्हणजे गुरुंच्या पावलावर पाऊल ठेवून वागण्याचा प्रयत्न केला. विनाकारण गुरुंशी स्पर्धा नको. जे आचार सांभाळतात, त्याप्रमाणे आचरणही सांभाळतात त्यांनाच "आचार्य" म्हणतात. संन्याशाचे नियम निराळे असतात. तुम्ही संसारी व प्रपंचवाईक आहात. संन्याशाचे नियम तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करु नका. आपण अनुयायी आहोत. धर्म काय आहे हे समजून त्यांचे योग्य ते आचरण आपल्या जीवनात उतरवा. स्वामींचे सारखे आचरण आपण करु नये. स्वामी १५ दिवस किंवा १ महिना उपवास करतात. आपण तसे करु नये. प्रकृतीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. जर गुरुंनी तुम्हाला एक किंवा दोन दिवसांचा उपवास करावयास सांगितले असेल तर गुरु मुखातून आलेल्या शब्दाला जरुर मान द्यावा व त्याप्रमाणे शुद्ध आचरण ठेवून उपवास करावा. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।