|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: एका भक्ताने प. पू. महाराजांना विचारले की, आज आमची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. कितीही प्रयत्न केले तरी सुधारत नाही. ज्योतिषी म्हणतात की, घराण्याचा दोष आहे. तो भोगावा लागेल. आमचे आजोबा, पणजोबांनी ज्या चुका करुन ठेवल्या त्या आम्हाला का भोगाव्या लागतात?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ह्या बाबतीत जाब विचारण्यासाठी आजोबा पणजोबांना खाली बोलावून आणणार आहात काय? तुमच्या शहाणपणाचा येथे काही उपयोग नाही. आजोबा, पणजोबांनी घेतलेले कर्ज व्याजासह नातवाला फेडावेच लागते ना? तसेच समजा. आमचेकडून योग्य मार्गदर्शन मिळवा. मागील सर्व दोष धुवून पुढचे पिढीला काहीतरी चांगला आदर्श राहील असे काही करा. विनाकारण मनात कुढत व तणतणत राहूनका. सत्पुरुषाची सेवा केली व त्यांचे आशीर्वाद मिळाले तरच घराण्याचे दोष फार लवकर घालविले जातात. अशा व्यक्तींचा जेव्हा उत्कर्ष होतो तेव्हा त्याला गर्व चढतो व हा माझ्याच कर्तृत्वाचा परिणाम आहे असे तो मानतो. परंतु हा उत्कर्ष त्यांच्या कर्तृत्वाचा नसून सत्पुरुषांच्या सहवासाचा आहे हे लक्षात घ्या. काही घराण्यात रेस खेळणारी, जुगारी व इतर वाईट धंदा करणारी मुले का निर्माण होतात? तर त्यांच्या मागच्या १०/१५ पिढ्यांमध्ये व्याज, बट्टा व सावकारीचा धंदा असेल, कोणत्या तरी विधवा बाईचे धन लुबाडले असेल किंवा लोकांना फसवून धन प्राप्त केलेले असेल किंवा लुटमारी, चोरी करुन धन प्राप्त केले असेल तरच अशी वाईट संतती निर्माण होते. कष्ट करुन, निती नियमाने वागून दोन पैसे प्राप्त करुन व्यवस्थित संसार चालविणे हे काही गैर नाही. असे करण्याने कोणताही दोष उत्पन्न होत नाही. अशी माणसे दोन वेळा पोटभर जेवण करणारे, घरात धार्मिक कृत्ये करणारे, नेहमी सुखी समाधानाने जीवन जगू शकतात. घरातील सर्व व्यक्तींचा धार्मिक ओढा असणे, मिळते जुळते घेण्याचा स्वभाव व सुखाने व समाधानाने जीवन घालविणे ह्यासाठी सत्पुरुषांचा सहवास असणे आवश्यक आहे. ही सत्पुरुषांची कृपाच म्हणावी. सहवासाने घराण्याचे व तुमचे कर्माचे दोष, भराभर कमी होतात. हे भक्तांना लक्षात येत नाही. एखाद्या कुटुंबाचा, घराण्याचा सर्वांगीण विकास होतो; आर्थिक फायदा होतो; बुद्धीत तेजस्वीपणा येतो व प्रगती वाढते. हे सर्व सत्पुरुषाच्या सहवासाचा परिणाम आहे हे निश्चित समजावे. तुम्ही जेव्हा आमच्याकडे मार्गदर्शन मागण्याकरीता येता तेव्हा तुम्ही फक्त तुमचे पुरताच संकुचित स्वार्थ घेऊन येता व स्वतःचा उद्धार करु इच्छिता. परंतु आम्ही जेव्हा तुम्हाला मार्गदर्शन करतो तेव्हा आम्हाला तुमचे घराण्याचे दोष धुवावे लागतात व नंतरच तुमची उन्नती शक्य आहे हे तुमच्या लक्षात येत नाही. तेव्हा जितका जास्त सत्पुरुषाचा सहवास मिळेल, त्यांची कृपा आपल्यावर लवकर कशी होईल ह्याचा विचार करा. सत्पुरुष म्हणून आम्हाला कोणी निवडून दिलेले नाही. सत्पुरुषाची परंपरा ही भक्तांनीच निर्माण केली आहे. त्यांनीच आमची नेमणूक तुमचेवर कृपा करण्यासाठी केलेली आहे. योग्य पात्रता पाहून कृपा करायची असते. तेव्हा तुम्ही तुमची पात्रता वाढवा. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।