प्रश्न: उपासना करीत असताना अन्न कमी घ्यावे का?
उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ह्या मार्गात अन्नावरची वासना
आपोआप कमी होते. त्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. वासना कमी करण्यासाठी
तृप्तीतूनच गेले पाहिजे. मनावर दबाव आणून, भूक असताना देखील सक्तीने कमी खाणे हा शरीराच्या
दृष्टीने गुन्हा आहे. शरीराला पोषण दिलेच पाहिजे. शरीराला त्रास न देता नकळत दर पंधरवड्यांनी
अन्न रोजच्यापेक्षा अल्प प्रमाणात कमी घेत घेत प्रमाण कमी करावे. एकदमच कमी अन्न ग्रहण
केले तर शरीराला उपद्रव होईल. शरीराला पूर्ण माप दिले पाहिजे. जगण्यासाठी जीवन शक्ती
टिकवायची असते. जर तुम्ही मनावर सक्ती करुन ८ दिवस अन्न कमी खाल्ले तर पुन्हा ९ व्या
दिवशी जेवण करताना शरीर दुप्पट अन्न मागते व मागे झालेली हानी भरुन काढते. तुम्ही पोटभर
जेवण घ्या. खाणे कमी पडू देऊ नका. जसजशी तुमची अध्यात्मिक प्रगती होईल तसे तुमचे शरीराला
आपोआप अन्न कमी लागेल. शरीर कमीव्हावे म्हणून जाणीवपूर्वक अन्न कमी खाणे चूक आहे. शरीर
वाढणे किंवा कमी होणे तुमचे हातात नाही. अन्न खाण्याची तुमची ऐपत आहे, शक्ती आहे, तुम्ही
पोटभर खा. जीवन शक्ती टिकवा. देह टिकवा. रोज थोडा व्यायामही करा. देह टिकविणे महत्वाचे
आहे. आपल्याला जे काही मिळवायचे आहे ते ह्या देहामार्फतच प्राप्त करावयाचे आहे. देहाकडे
दुर्लक्ष करुन कसे चालेल?
आपला देह हा अन्नमय पिंड आहे. त्याला अन्न द्यावेच लागते. तुम्ही आमची बरोबरी करु नका.
आमचा देह हा वरद पिंड आहे. आमचे जेवण लहानमुलापेक्षाही कमी आहे. हा देह परमात्म्याच्या
इच्छेचा देह आहे व त्यानेच तो घडविलेला आहे. तुम्ही मात्र जेवणाची तृप्ती होईपर्यंत
जेवावे. तृप्तीनंतरच वैराग्ययेते हे महत्वाचे आहे. लक्षात घ्या तुम्हाला जी उपासना
दिली आहे ती जर तुम्ही आचरण करीत राहाल तर निश्चितच चांगला परिणाम दिसेल. अध्यात्म
शक्तीवाढली तर अन्न आपोआप शरीराला कमी लागते. (खंड २)