प्रश्न: काळजी कमी कशी करावी?
उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मी तुम्हांला रोज जो थोडा
थोडा उपदेशपर बोध देतो, याचा तुम्ही विचार करा. त्यावर चिंतन करा म्हणजे काळजी कमी
होईल. जीवन सुटसुटीत कसे होईल? जीवनात आनंद कसा निर्माण होईल? हे बघा. जीवनातल्या काळज्या
कमी झाल्यानंतरच जीवनात आनंद निर्माण होईल. यासाठी सहजासहजी होणारे प्रयत्न करावे लागतात.
कोठेही अती करु नका. दुस-यांचे वैभव पाहून मनात ईर्षा ठेऊन अधिक कमविण्याची चिंता सोडा.
नाहीतर वाजवीपेक्षा जास्त शक्ती खर्च होते. अशा रीतीने शक्ती वाया घालवू नका. जेव्हा
काळजी जास्त व प्राप्ती कमी असं घडतं तेव्हा समजावं की, तुमची शक्ती या कामासाठी कमी
पडली. असे का घडले? तुम्हांला जास्त शक्ती मिळविता येत नाही. रात्री झोपल्यानंतर नैसर्गिकरित्या
जी झीज भरुन निघते, तेवढीच शक्ती व स्फूर्ती दुस-या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला प्राप्त
होते. यापेक्षा स्वतंत्र प्रयत्न करुन अधिक शक्ती प्राप्त करु शकत नाही. तुम्ही जप,
तप, ईश्वर साधना करता परंतु मन दुसरीकडे भटकत असते. यासाठी ईश्वरावर भार ठेऊन ईश्वराच्या
ठिकाणी मन एकाग्र कसे होईल? याकडे लक्ष द्या. तुम्हांला दर्शनाने जी शक्ती मिळते ती
अल्प असते. प्रत्येकाला आपली क्षमता किती हे कळत असते. वाजवीपेक्षा जास्त मिळविण्याच्या
मागे लागू नका. अनेक वर्षांची चिंता नको. दुस-या दिवशीची चिंता योग्य होय. तुम्ही अनेक
वर्षांची चिंता फार करता. त्यामुळे तुमची अमूल्य अशी शक्ती खर्च होते. या चिंतेच्या
मागे लागून अती परिश्रम, कष्ट, त्रास व काळजी करीत बसता. सरकारने तुम्हाला नोकरी दिली
व तुमची महिन्याची चिंता कमी केली. हे सरकारचे तुमच्यावर एक प्रकारचे उपकारच आहेत.
महिना सोडून वर्षाची चिंता करु नका. तुम्ही अशी विनाकारण चिंता करता याला कोण काय करणार?
देवांनी हे असे शिकविले नाही.
प्रत्येकाने आपल्या क्षमतेप्रमाणे प्रयत्न करुन मिळविण्याचे जरुर प्रयत्न करावेच लागतात.
तेवढ्याने यश मिळत असेल तर पुन्हा प्रयत्न करावयास हरकत नाही. परंतु जर इतके प्रयत्न
करुनही यश मिळत नसेल तर जास्त मागे लागण्यात अर्थ नाही. पळणारा हा लवकर दमतो. देव नेहमी
साथ देत नाही. एखाद्या दिवशी धंदा भरपूर असेल तर एखाद्या दिवशी कमी पण असेल. दैव फाजील
असते. याला उपाय म्हणजे ईश्वर स्मरण करावे. दैवाला लगाम फक्त ईश्वराचा लागतो. म्हणून
तुम्ही ईश्वर चिंतन करावे म्हणजे सर्व सुरळीत चालेल. जर जास्त चिंता करीत बसलात तर
त्याचा नाश होतो. हृदयाचा नाश व्हायला चिंता हेच प्रमुख कारण आहे. तुम्ही तुमच्या अमूल्य
जीवनाची नासाडी करु नका. जेवढी जास्त काळजी, तेवढे या व्यक्तीचे हृदय कमजोर व पुढे
हृदय झटका, हार्ट ॲटॅक हा ठरलेला आहे. होणारी झीज भरुन काढण्याचे साधन तुमच्याकडे नाही.
जे आहे त्यात आनंद माना व जीवनात समाधानी राहण्यास शिका. ईश्वर हे उत्तम साधन आहे.
तुम्ही कोणीही असा, गैरसमज करुन घेऊ नका की, आपण फक्त ईश्वर स्मरण करावे व बाकीचे तो
करुन देईल किंवा तोच लक्ष टाकेल. आपण लक्ष टाकू नये. असे कोणीही सांगू नये. तुम्ही
तुमच्या क्षमतेप्रमाणे प्रयत्न केलेच पाहिजेत. तो काय करील. तुमची चिंता कमी करील.
रथाला जरी ७ घोडे असले तरी या रथाची गती मर्यादित असते. एकाच घोड्याच्या गती एवढी असते.
रथांचे घोडे २ पुढे व ५ मागे असे चालत नसतात. टांगा किंवा रथाची दोघांची स्थितीसारखी
असते. कोणीही मागे चालत नाही. रथाला ७ घोडे शोभेसाठी असतात. सर्वांनी एकत्र चालले तरी
पुढे जाण्याची गती एका घोड्याइतकीच असते. आपण आपल्या मनाचा भाव स्थिर ठेवा. या पृथ्वीवर
काही विदुषक जन्माला आलेले असतात. त्यांचे काम म्हणजे स्वतः काही करावयाचे नाही व जो
कोणी काम करीत असेल त्याला त्रास देणे, अडथळा आणणे वगैरे. अशा लोकांकडे लक्ष देऊ नका.
आपल्या दृढ श्रध्देवर आघात करणा-यांचे ऐकू नका. (खंड ८)