प्रश्न: धर्म आपले रक्षण केव्हा करील?
उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक व्यक्तीने धर्मामध्ये
उल्लेख केल्याप्रमाणे नीती नियमाने आचरण ठेवावे. धर्म ही मुख्य बाब आहे. विज्ञान ही
साह्यभूत बाब आहे. केवळ विज्ञानाचा उपयोग नाही. धर्माशिवाय विज्ञान काय आहे ते समजणार
नाही. धर्म आचरल्याने मनुष्यामधील पशूभाव कमी होतो. समाजाप्रती कर्तव्ये काय काय आहेत
हे लक्षात घ्यावे. आचार कसा पाळावा, माणसाचे हृदय कसे आहे? जर कठोर हृदय असेल तर मृदू
कसे बनवावे हे सर्व धर्मामध्ये सोप्या भाषेत सांगितलेले असते व प्रत्यक्ष तसे आचरण
केल्याने जाणीवपूर्वक लक्षात येते. विज्ञान काय काय करते? तर अगोदर अस्तित्वात असलेल्या
गोष्टी उजेडात आणते. त्यावर प्रकाश पाडते. त्याचा कार्य कारण संबंध दाखविते. धर्म व
विज्ञान हे एकमेकांना पूरक आहेत. खरे बुद्धीमान विद्वत्तेने परिपूर्ण असलेले विज्ञानी
देखील धर्म मानतात. ते नास्तिक नसतात. जे विज्ञानी नास्तिक आहेत ते धर्म न मानता कोणतीतरी
अज्ञात शक्ती हे सर्व काम करते म्हणून मानतात. वैज्ञानिकांना देखील काही वेळा शोध लागल्यानंतर
त्यावर जास्त विचार करुन खोल जाता येत नाही. उदा. तांबडा व पांढरा रंग एकत्र केला की,
गुलाबी रंग निर्माण होतो. येथ पर्यंत खुलासा देतात. परंतु निसर्गामध्ये अगोदरच गुलाबी
रंग कसा निर्माण होतो ह्याचा ते खुलासा देऊ शकत नाही. मानवाची बुद्धी तोकडी पडते. परमेश्वर
मनुष्याला जन्माला घालताना अफाट बुद्धीमत्ता देऊन पाठवितो. वैज्ञानिकांनी कितीही मोठे
शोध लावले परंतु त्यांना बुद्धीची देणगी दिली कोणी? हे लक्षात घ्या. ज्या अफाट बुद्धीमान
ऋषीमुनींनी आत्म्याचा शोध लावला, त्यांचेच आपण वंशज आहोत. आपल्या बुद्धीमध्ये देखील
अनेक कप्पे आहेत. परंतु ते सर्व झाकलेले व बंद आहेत. ते कसे उघडावे हे फक्त धर्मच सांगू
शकतो. त्यासाठी देवावर नितांत श्रध्दा ठेवा. पूर्ण विश्वास ठेवा. नित्य चिंतन व मनन
करीत जा. असे केल्यानेच हळूहळू प्रगती होऊन अनेक झाकलेल्या कप्यांपैकी एक एक कप्पा
उघडत जाईल व बुद्धीची तेजस्विता वाढेल. स्वतःला विज्ञानी समजणारे बी. ए., एम. ए. पास
झालेले व काही डॉक्टर झालेले माझ्याशी धर्माविषयी वाद घालतात. पुस्तकांचा अभ्यास केल्यामुळे
त्यांना वाद घालता येतो. परंतु वाद घालता येतो म्हणून बुद्धीची चमक व हुषारी स्पष्ट
होत नाही. वाद विवादामुळे शेवटी मन दुखःच निर्माण करते. जेथे आपली पूर्ण श्रद्धा आहे
अशा देवांवर व धर्मांवर कोणी टीका करु लागले तर मी सहन करीत नाही. मी त्यांना सटकावतो.
आम्ही ईश्वरावर व धर्मांवर पूर्ण विश्वास व श्रद्धा ठेवणारी माणसे आहोत. आम्हाला ईश्वर
दर्शन झालेले आहे. हे आम्ही अनुभवलेले आहे. म्हणून आम्ही त्यावर पूर्ण विश्वास ठेवतो.
इतर कोणीही आम्हाला ईश्वरावर विश्वास ठेवण्यास सांगितले नाही किंवा हे शिकण्यासाठी
कोणाचे दारात गेलो नाही. मी पाहिले आहे अनुभवलेले आहे. ज्या मार्गांनी आम्ही गेलो तोच
मार्ग आम्ही तुम्हाला दाखवित आहोत.
वैदिक धर्म हा सत्य आहे. पूर्वी जसा होता तसाच तो आजही आहे. काही लेखक म्हणतात की,
द्वापार युगासाठी धर्म वेगळा, सत्य युगासाठी धर्म वेगळा व कलीयुगासाठी धर्म वेगळा.
ह्या सर्व मानसिक कल्पना आहेत. कली युगामध्ये धर्मनिष्ठ माणसे व धर्म जाणणारे कमी राहतील.
सामान्य लोकांचा कल भोगवाद व इतर गोष्टीकडे जास्त राहील हे खरे. केवळ धर्माबद्दल आस्था
असणारे लोकच जास्त असतील. द्वापार युगात धर्मालाच श्रेष्ठ मानणारे व धर्म जाणणारेही
जास्त होते. सत्य युगात लोक प्रामाणिक होते. थोरा मोठ्यांच्या वचनाला किंमत देत होते.
ह्याचवेळी रामायण व महाभारताचा काळ होता. वैदिक धर्म अबाधित आहे व अबाधितच राहणार आहे.
धर्म हीच एकमेव तारणारी शक्ती आहे. जोपर्यंत तुमचे मनामध्ये धर्माविषयी श्रेष्ठ भावना
नाही तोपर्यंत धर्म तुमचे रक्षण करीत नाही. जेव्हा आपण धर्मामध्ये दाखविलेली कर्तव्ये
पार पाडू व धर्माविषयी मनात उत्तम भाव ठेऊ तेव्हांच धर्म आपले रक्षण करील. हे एक दुस-यावर
अवलंबून आहे. तुम्ही जर धर्माचे पालन केले नाही तर धर्म तुमचे रक्षण कसे करील? आजकाल
१० हजारापैकी ९९९९ लोकांची कल्पना अशी आहे की, आपण देवांचे काही केले नाही तरी देव
आपले रक्षणच करील. ही कल्पना चुकीची आहे. फक्त मी एकटा ह्या गोष्टीला विरोध करुन सांगेन,
अगोदर धर्मात दाखविलेले आपले कर्तव्य पार पाडा व नंतरच त्यांचेकडून रक्षणाची अपेक्षा
करावी. देवांनी अवतार का घेतला? मूळ समजून लक्षात घ्या. मूळ धर्म कसा आहे? बाहेरच्या
अनेक धर्मांचे आक्रमण ह्या वैदिक धर्मावर झाले. इतर सर्व धर्मलयाला गेले तरी आपला धर्मच
कसा टिकला? हे सर्व लक्षात घ्या. त्याची परंपरा लक्षात घ्या. भारतामध्ये अजूनही साक्षात्कारी
पुरुष जन्मास का येतात? ह्याचा अभ्यास करुन, मी रोज तुम्हाला थोड थोड शिकवितो त्याचे
मनन व चिंतन करा. म्हणजे तुमचे कल्याण होईल व धर्म साहाय्य करील. (खंड २)