आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: नशीबात जसे असेल तसे फळ मिळणारच आहे तर स्वतंत्र प्रयत्न करायची आवश्यकता काय?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या पूर्व सुकृतामुळे आपणाला मनुष्य जन्म मिळाला आहे. जनावराच्या जीवनापेक्षा मनुष्य जीवन केव्हाही उच्च दर्जाचे आहे. मनुष्याला वाचा, इच्छा व मन मिळालेले आहे. ह्यांचे मदतीनेच आपण ईश्वर प्राप्त करु शकतो. जनावरे केवळ खाण्याकडे म्हणजे कर्माकडे लक्ष देतात. आपण तसे करु नये. कर्म करीत असतानाच कर्तव्याकडेही लक्ष दिले पाहिजे. देवाप्रित्यर्थ कर्तव्य केले तर केव्हाही यश मिळण्याची शक्यता निर्माण होते. अजगरासारखे काम नको. अजगर स्वतः कधीही भक्ष्य शोधीत नाही. तो सुस्त पडून राहतो. त्याचेसमोर जर भक्ष्य आले तरच तो स्वाहा करुन टाकतो. त्याचे तावडीत जो येतो तो खेचला जातो. स्वतंत्र धडपड कधीही करीत नाही. तुम्ही सर्व प्रपंचवाईक व संसारी माणसं आहात. तुम्ही प्रयत्नांनीच सर्व मिळविले पाहिजे. जर थोडे प्रयत्न करुन मिळत नसेल तर हताश होऊ नका. प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. काही लोक यश मिळाले नाही म्हणून ज्योतिषाकडे धाव घेतात. त्यांचा दैवावर जास्त विश्वास असतो. ज्योतिषी जे भविष्य सांगतील त्यावर त्यांचा विश्वास अधिक असतो. भविष्यात चांगले दिवस लवकरच येतील हे वाक्य त्या ज्योतिष्याकडून वदवून घेतल्याशिवाय त्यांना समाधान वाटत नाही. ज्योतिषीही स्वतःची सुटका लवकर करुन घेण्यासाठी गि-हाईकाशी गुळमुळीत द्विअर्थी भाषा वापरतो. ज्योतिषाने जर सांगितले असेल की ३.१/२/ महिन्यानंतर तुमचा उदयकाळ आहे. तोपर्यंत ते स्वस्थ बसतील व उदयकाळ येण्याची वाट पाहतील. असे वागणे सर्वस्वी चूक आहे. तुम्ही ज्योतिषावर केव्हा अवलंबून राहावयाचे? जेव्हा प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही यश मिळत नाही, तेव्हाच ज्योतिषी भाष्याप्रमाणे कल्याण साधले जाणारआहे, ही कल्पना चुकीची आहे. ज्योतिष शास्त्र खरे आहे. त्यामुळे जीवनाची दिशा कळते. ज्यांचा ईश्वरावर विश्वास आहे त्याने यशाची काळजी करु नये. ज्याने ईश्वराची सेवा केली त्याची दखल घेतली जाते. त्याच्या यशाचे माप केव्हांतरी पदरात पडेलच. ज्यांचा ईश्वरावर विश्वास नाही जे नास्तिक आहेत त्यांनी मात्र स्वतःची काळजी घ्यावी. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।

Privacy Policy