प्रश्न: देवांच्या मूर्तीची काळजी कशी घ्यावी?
उत्तर: प. पू . महाराजांनी खुलासा केला
की, तुमची श्रद्धा ज्या देवतेवर, ज्या रूपावर असेल ते तुम्ही घ्यावे व घरांत प्राणप्रतिष्ठा
करावी. मूर्ती भरीव असावी. मूर्ती कशाचीही चालते. धातू, पाषाण, शाडू माती कशाची चालेल.
मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अशा ठिकाणी करावी की, तेथे इतर कोणी प्रवेश करू शकणार नाही.
त्याचे वरच्या भागावर काही सामान ठेवू नये, केव्हा काय पडेल ते सांगता येणार नाही.
आपल्या एका भक्ताने अशीच गणपतीची एक मूर्ती घरात स्थापन केली. वरच्या भागांत फळी लावली
व त्यावर सामानाचे डबे ठेवले. एके दिवशी हे काही सामान काढत असतांना फळी सटकली व गणपतीच्या
मूर्तीवर पडली व शाडू मातीची मूर्ती बाजूला फेकली गेली व भंगली. दुसरे दिवसापासून ह्या
भक्तावर संकटाची मालिका सुरु झाली. नंतर हे माझ्याकडे रडवेल्या चेहऱ्याने आले व मला
संपूर्ण हकीकत सांगितली व माझ्यासमोर रडू लागले. मी मागे होतो म्हणून हे वाचले, नाहीतर
जीवनातून उठण्याचा प्रसंग आला होता.
ह्या भक्ताने अतिशय पश्चाताप व्यक्त केला व कसेही करून ह्या संकटातून वाचवा म्हणून
वारंवार विनंती करू लागले. मला दया आली. ह्या भक्ताला सांगितले की, तुम्हीच तुमच्या
हाताने तुमच्या थोबाडीत मारून घ्या, हलक्या हाताने नव्हे. त्यावेळी जे भक्त बसले होते
त्या प्रत्येकाला स्पष्ट ऐकू जाईल इतका आवाज आला पाहिजे. त्याप्रमाणे भक्ताने स्वतःच्या
थोबाडीत चार पाच वेळा मारून घेतले. नंतर देवांची माफी मागायला सांगितले. नंतर संकटे
येण्याचे थांबले. काहीतरी सौम्य शासन घडावे म्हणून त्या भक्ताला दोन वर्षे चरणांपासून
लांब ठेवले. दर्शनासाठी येऊ दिले नाही. आताही हे भक्त दर्शनाला आले की, दारातूनच पहातात,
महाराजांचा मुड कसा आहे? जर प्रसन्न वातावरण असेल तरच आत येऊन दर्शन घेतात. नाहीतर
बाहेरच्या बाहेर रवाना होतात. ह्या भक्ताला इतकी धास्ती भरली आहे की, विचारल्या शिवाय
माझ्याशी बोलत नाही. उत्तरे देतांना हो किंवा नाही ह्या शब्दांत बोलतात. जास्त बोलण्याची
हिंमत होत नाही.
दुसऱ्या एका भक्तांना त्रास होऊ लागला. त्याने मला विचारले की, ते गणपती भक्त आहेत.
रोज पूजा - अर्चा केल्याशिवाय घराचे बाहेर जात नाही. मला त्रास कां होतो. नेमकी चूक
कोठे आहे हे जाणण्यासाठी सर्व पुजा - विधी विचारला तेव्हा लक्षात आले की, हे भक्त दुर्वा
एक एक न वाहेत दुर्वांची जुडी देवाच्या डोक्यावर एकदम ठेवत असत. मी त्यांना नेमकी चूक
दाखविली व खुलासा केला की, असे करू नका. त्या भक्ताने युक्तीवाद केला की, ह्याने काय
होणार? देवांच्या अंगावर, डोक्यावरच ठेवतो ना? त्याने माझे ऐकले नाही व स्वतःचीच पद्धत
चालू ठेवली.
एका रात्री त्या भक्ताला स्वप्न पडले. त्यामध्ये घरांत स्थापन केलेली बाळ स्वरूप गणपती
मूर्ती दिसू लागली. घरात खेळता खेळता ती मूर्ती जिना उतरून बाहेर निघून गेली व जातांना
सांगितले की, मला तुझ्या घरात राहायचे नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच हे भक्त रडवेल्या
चेहऱ्याने दर्शनाला आले व रात्री पडलेल्या स्वप्नाची हकीकत सांगितली.
देव, जो पर्यंत घरात परत येत नाही, तोपर्यंत जेवणार नाही. जेवू नका. उपाशी राहा. तुम्हांला
सांगूनही तुम्ही काळजी घेत नाही. आता तुम्ही भोगा. त्या भक्ताने फार पश्चाताप केला.
फार काकुळतीने व आर्ततेने विनंती केली की कसेही करून संकटातून वाचवा. शेवटी मला दया
आली व देवांना विनंती केली की, देवा कितीही केले तरी आम्ही सामान्यच भक्त आहोत, आमचे
हातून चुका घडणारच. आपण त्या पदरात पाडून घ्या व माफ करा. कृपा करून ह्या भक्तांच्या
घरी पुन्हा गृहप्रवेश करावा. देवांनी माझी विनंती ऐकली.
दुसऱ्या दिवशी ह्या भक्ताला स्वप्न पडले की, त्याच बाळ स्वरूप गणपती हसत खेळात घरात
प्रवेश केला. जिना चढून वरती गेली व देवघरात सिंहासनावर विराजमान झाली. तेव्हा हे प्रकरण
मिटले.
पूजा करतांना एकदम दुर्वांची जुडी डोक्यावर न ठेवता एक एक दुर्वा चरणाजवळ वहावी व प्रत्येक
वेळेस ओम गणपते नमः असे म्हणत जावे. म्हणजे अनायसे देवाचे नावही आपल्या मुखाने घेतले
जाईल.
देवांना नैवेद्य दाखवितांना देखील देवांना हात जोडून, कळकळीने विनंती करावी, देवा आम्ही
क्षुद्र भक्त आहोत. जरी तुमचे पोट भरलेले असले तरीही आमचे आग्रहाखातर ह्या नैवेद्याचा
स्विकार करावा.
आपल्या मनात जर भाव चांगला असेल तर देव जरूर नैवेद्य स्विकारतात. जर भाव उत्कृष्ट असेल
तर तसे ते रूप दिसेल. जसे आरशात पाहिले तरच आपल्याला चेहरा दिसेल, जर भिंतीत पहिले
तर चेहरा दिसणार नाही. यथा देहे तथा देवे. देवांच्या मूर्तीकडे ती जिवंतच आहे असे मानून
तिची पूजा - अर्चा वगैरे केले पाहिजे. म्हणजे तुम्हाला चांगले अनुभव येतील. देवाच्या
मूर्तीकडे केवळ धातूची मूर्ती मानून कसेतरी दोन पळ्यांचे आचमन करून, दर्शन करून निघून
गेलात तर देव प्रसन्न कसे होणार? तेव्हा आपण आपल्या घरात जी मूर्ती स्थापन करू तिची
योग्य काळजी घ्या. ह्या मूर्ती कल्याणकारी असतात. (खंड ८)