|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: गणपतीचा फोटो कसा विकत घ्यावा? तसेच स्थापना करण्याकरिता मूर्ती कशी असावी?


उत्तर: प. पू. महाराजांनी खुलासा केला की, हल्ली नवीन फॅशन प्रमाणे तुटक तुटक रेघांनी किंवा तुकडे जोडून गणपतीचा फोटो काढतात हे चूक आहे. वास्तविक पाहता फोटो काढतांना रेघ अखंड असावी. तुटक तुटक रेघांनी किंवा टिंबा टिंबाना जोडलेली नसावी.
सध्या सुधारलेल्या फॅशन प्रमाणे गणपतीच्या मूर्ती तयार करतात. काही ठिकाणी गणपतीचे डोक्यावर फेटा, काही ठिकाणी गणपतीला सुट पॅन्ट घातलेली मूर्ती तयार करतात. खरं म्हणजे हे गणपतीचे विडंबन आहे. जे लोक अशा अयोग्य प्रमाणात मूर्ती तयार करतात, विकत घेतात. अशांना लवकर, उशिरा शासन आहेच. हा परिणाम कोणाचे लक्षांत येत नाही.
शास्रीय आधाराप्रमाणे गणपतीची मूर्ती कशी असावी? आसनावर पद्मासन घातलेली, डोक्यावर टोप असलेली, प्रसन्न मुद्रा असलेली असावी. हाताने आशिर्वाद देणारी असावी. ह्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी.
हल्ली मुलगा गावांत किंवा बाहेरगांवी नोकरी करतो व नोकरी चालू असतानाच लग्न करतो. जर बाहेरगावाला नोकरी असेल आपोआप आईबापापासून वेगळा होतो. आणि जर गावातच रहात असेल तर स्वतंत्ररित्या जगतां यावे म्हणून आईबापा पासून वेगळा रहातो. मूर्ती कशी खरेदी करावी ह्यांचे वडिलधाऱ्यांपासून किंवा घरातून मार्गदर्शन मिळत नाही.
गणपतीच्या उत्सवासाठी सुशिक्षित नवरा बायको गणपतीची मूर्ती घ्यायला बाजारात जातात. नवीन व जगावेगळी मूर्ती खरेदी करून आणतात व १० दिवसांसाठी घरात स्थापन करतात. अशा घरात पुढे वर्षभर भांडणे होत राहतात. रोगराई होते. कटकटी होतात. ह्या कटकटी कां होतात? ह्यांचे नेमके कारण समजत नाही. हे जर कळले तर सुधारणा करता येईल.
वाघ, सिंह किंवा कोणत्याही प्राण्यावर बसलेल्या देवदेवतेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नको. कारण गणपती मूर्ती बरोबरच वाघाचीही प्राणप्रतिष्ठा होते, हे लक्षात येत नाही. पुढे हे फार त्रासदायक ठरते. काही ठिकाणी उभ्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करतात. असे करता येत नाही. देवतांना आवाहन करून बोलविले जाते. अशा देवतेला १० दिवस उभेच ठेवणार कां?
ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावयाची ती व्यवस्थित सिंहासनावर मांडी घातलेली व पद्मासन घातलेली असावी. काही ठिकाणी दीड मांडी घातलेली मूर्तीची स्थापना करतात, हे ही चूक आहे.
काल मुंबईचे एक गृहस्थ दर्शनाला आले होते. त्यांनी हौस म्हणून गणपतीची सुंदर मूर्ती आणून स्थापना केली व पूजा अर्चा सुरु केली. इतक्या सुंदर मूर्तीची सोंड चार दिवसांमध्ये आपोआप गळून पडली. भक्ताच्या मनात चरकले. काहीतरी अपघात घडला, त्याची ही खूण प्रचिती आहे की, पुढे मोठे संकट कोसळणार त्याची ही नांदी आहे. हे अपशकुन कां घडले? हे जाणता आले नाही म्हणून नगरला आमचेकडे आले.
मी त्यांना विचारले की, घरामध्ये स्रियांचे चार दिवस पाळतात का? त्याने युक्तिवाद केला की, हल्ली मुंबई मध्ये हे कोणी पाळत नाही, म्हणून तेही पाळत नाही. तुम्ही सुशिक्षितपणामुळे हे पाळत नसले तरी निसर्ग थांबला आहे कां? निसर्ग नियमाप्रमाणे स्रियांना पाळी येणारच. ती कोणालाही थांबविता येणार नाही. इतक्या सर्वांग सुंदर मूर्तीची सोंड आपोआप गळून कां पडली ह्याचे उत्तर तुमचे विज्ञान शास्र देऊ शकते कां?
तुमच्या हातून हा गंभीर अपराध घडलेला आहे व ह्याचे शासन होणारच. कशाप्रकारे होईल हे सांगता येत नाही. पुढे येणारे संतान असे येईल किंवा घरात कोणाचा अचानक मृत्यू येईल किंवा अन्य संकट येईल. नेमके काय शासन घडेल हे सांगता येत नाही.
महालक्ष्मी व गणपती बसतात. ह्या दिवसांत ह्या गोष्टी विशेष कटाक्षाने पाळावयाच्या असतात. इतके सुशिक्षित व डबल ग्रॅज्युएट भक्त माझ्या समोर रडायला लागले. आता रडून उपयोग नाही. तुम्हाला शासनच व्हायला पाहिजे. त्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही. हल्ली घराघरांत संस्कार राहिलेले नाहीत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे योग्य काय, अयोग्य काय हे शिकविणारा कोणी राहिलेला नाही. तेव्हा देवतेचा फोटो घेतांना किंवा मूर्ती विकत घेतांना योग्य काळजी घ्या. हल्ली सुशिक्षितपणाच्या नावाखाली घराघरांत विडंबन सांडते. कसेही मूर्तीचे रूप आणून बसवतात. मूर्तीचे रूप किती सुंदर व गोजीरवाणे असावे. ह्या मूर्ती खरोखर आनंद देणाऱ्या आहेत. परंतु त्यांचे १० दिवसांसाठी पावित्र्य व स्वच्छता सांभाळावी लागते. १० दिवसानंतर विधीपूर्वक विसर्जन करावे लागते. (खंड ८)


।। श्री गुरुदेव दत्त ।।