|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||


आपली भाषा निवडा: घरपोच ग्रंथसेवा


प्रश्न: एक गृहस्थ आई वडीलांचे श्राद्ध १ महिन्यानंतर करणार होता. त्याला ४/५ वेळा स्वप्नात दोन वृद्ध स्त्रिया दिसल्या व त्यांच्या नावाने श्राद्ध करावयास सांगायच्या. सर्वांचे श्राद्ध केल्यानंतर स्वप्नात यायच्या बंद झाल्या, असे का घडले?


उत्तर: प. पू. महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जे अतृप्त आत्मे असतात ते नेहमी जिवंत व्यक्तीला त्यांच्या स्वतःच्या इच्छापूर्ती करवून घेण्यासाठी छळत असतात. स्वास्थ्य लाभू देत नाहीत. वरील उदाहरणातील अतृप्त आत्मे चांगले असतील की त्यांनी स्वप्नात येऊन विनंती केली. आपली धर्म परंपरा फार प्राचीन व पुरातन आहे. १०-१५ हजार वर्षांपूर्वीची परंपरा म्हणजे नवीन परंपरा समजावी. ३०-३५ हजार वर्षांपूर्वीची परंपरा म्हणजे पुरातन समजावी. आपल्या ह्या हिंदू धर्मापासून अनेक निरनिराळ्या शाखा निघालेल्या आहेत. त्यांनी प्राचीन परंपरेतील काही कडक नियम सैल केले, काही गोष्टी गाळल्या व स्वतःचा पंथ किंवा मार्ग नवीन नावाखाली चालू केला. वरील प्रश्नांबाबत नवीन पंथ ह्याविषयी काहीही खुलासा देऊ शकत नाही किंवा उपायही सुचवू शकत नाही. आपली जी प्राचीन परंपरा आहे त्यांची शक्तीपूर्वी जशी जास्त होती तशी आजही आहे. आपण ह्या दोन्ही विचारसरणीमधून सुवर्णमध्य काढावा व जेणेकरुन सौख्य निर्माण होईल, आनंद मिळेल, ते स्विकारावे व आत्मसात करावे. जर तुमची मान्यता असेल की आमच्यात हे सांगितले नाही, हे करीत नाही, ही तुमची चूक आहे. वस्तुस्थिती तुम्ही नाकारु शकत नाही. घराण्यातील अतृप्त आत्मे त्रास देतात ही हकीगत आहे. ते तुम्ही नाकारु शकत नाही. तुम्ही स्वतः होऊन तो त्रास कमी करु शकत नाही. हा उपद्रव कमी करण्यासाठी भरपूर आत्मबळ साठविले पाहिजे. हा मार्ग नवीन पंथात सांगितलेला नाही. त्यासाठी तुम्हाला आमच्या सारख्यांचीच भेट झाली पाहिजे तरच तुमच्या प्रश्नांचा खुलासा होऊ शकेल व बाहेर निघण्याचा मार्ग सापडू शकेल. आमच्या मूळ धर्माच्या परंपरेपासून जे नवीन पंथ निराळे निघाले आहेत ते लोक, असे का घडले? ह्याचा खुलासा देऊ शकत नाही. कारण त्यांची तेवढी कुवत व क्षमता नाही. अशा प्रश्नांना उत्तरे देण्याचे शक्यतो टाळतात. कारण मूळ धर्मच त्यांना समजलेला नसतो.
तुम्ही कोणताही धर्म स्वीकारा; परंतु जीवनात सौख्य का नाही, जीवन सुरळीत का चालत नाही, प्रत्येक प्रश्नांची उकल झाली नाही तर तो धर्म अपूर्णच आहे हे समजावे. हा धर्म स्विकारला तर समाज काय म्हणेल, काही लोक समाजाला भितात. समाज कंटकांकडे दुर्लक्ष करा. समाज तुम्हाला रस्त्यावर चालू देणार नाही व घोड्यावरही बसू देणार नाही. तुम्ही कसेही वागले तरी ते टीकाच करणार. जो धर्म आपले कल्याणच करणार असेल तो आपण स्विकारावा व त्या धर्मातील नियमाप्रमाणे चालावे. आपल्या जीवनात, संसारात, घराण्यात जे काही दोष व अडथळे आहेत ते दूर करण्याकरीता सर्व शक्तीनिशी तोंड दिले पाहीजे. सर्वबाजूने प्रयत्न करावे म्हणजे उद्धार निश्चित होईल. युद्धात काही नाही तरी बॉम्ब, विमान, बंदुका, गोळे, गोळ्या सर्वांचाच वापर करावा लागतो. सर्वांचा वापर करता आला पाहिजे. शत्रुपक्ष जर बंदुकीने गोळ्या झाडत असेल व आपण केवळ काठीने प्रतिकार करु म्हटले तर आपला टिकाव कितपत लागेल? म्हणून सर्व बाजूने शक्ती प्राप्त करणे आवश्यक आहे. ह्या न दिसणा-या शत्रुंना हतबल करण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे. संसारात सौख्य मिळत नसेल, कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नसेल त्याने धर्मशास्त्राचा आधार ठेऊन घराण्याचे दोष घालविणे आवश्यक आहे. यश न मिळण्याचे कारणही दूर करावे. संतती नाही, संपत्ती नाही, कुलपरंपरा नष्ट होण्याची वेळ आली असेल तर हे मोठाले अडथळे दूर करणेच आवश्यक आहे. मनुष्याचा स्वभाव अनेक पैलूचा आहे. कोण केव्हा कसा वागेल सांगता येत नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आनंदी स्वभाव दाखवितो. परंतु गेल्यानंतर तो बदलतो व उपद्रव देऊ लागतो. ह्या संगतीत आल्यावर तुम्ही काय शिकाल? अधिकाधिक सेवा कशी करता येईल? भाव कसा शुद्ध ठेवता येईल? मन निःसंशय कसे करता येईल? आपल्याला योग्य मार्गदर्शन कसे मिळेल? तुमच्या जीवनात अनेक न सुटणारे प्रश्न असतात ते तुम्हाला सोडविता येत नाहीत. ते ईश्वर कृपेने सुटतील. तुमची स्वतःची शक्ती तोकडी पडते त्यासाठी देवाची मदत घ्यावीच लागते. तेव्हा आम्ही जो उपदेश करतो त्याचे चिंतन व स्मरण करा. नित्य नामःस्मरण करा. देव निश्चित सहाय्य करतात. (खंड २)


।। श्री गुरुदेव दत्त ।।